दृष्टिहिनांना भेडसावणाऱ्या या समस्यांची जाणीव सामान्य नागरिकांना व्हावी, त्यांच्या मनामध्ये दृष्टिहीन व्यक्तींबद्दलच्या संवेदना जागृत व्हाव्यात या उद्देशाने ठाण्यातील विवियाना मॉल आणि झेव्हियर्स रिसोर्स सेंटर फॉर व्हिज्युअली चॅलेंज्ड (एक्सआरसीव्हीसी), सेंट झेव्हिअर्स महाविद्यालय मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने ‘अंत:चक्षू द आय विथइन’ या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. येथे येणाऱ्या नागरिकांच्या डोळ्याला पट्टी बांधून त्यांना मॉलमधील खरेदीचा अनुभव देण्यात आला. या कार्यक्रमास ठाण्यातील नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.
सध्याच्या वेगवान जगामध्ये वावरत असताना दृष्टिहीन व्यक्तींना अनंत अडथळ्यांना सामोरे जावे लागत असते. घरातून बाहेर पडल्यानंतर रस्ते, पदपथ, रेल्वे स्थानके, दुकाने आणि मॉल्समध्ये अशा व्यक्तींना अनेक समस्या उद्भवत असतात.
अंत:चक्षू या कार्यक्रमाच्या निमित्ताने विवियाना मॉलमध्ये खास दृष्टिहीन विभागाची निर्मिती करण्यात आली होती. या विभागामध्ये प्रवेश करणाऱ्या व्यक्तीच्या डोळ्याला पट्टी बांधून त्यांना तेथे प्रवेश देण्यात येत होता. त्या भागातील विशेष दुकानांमध्ये स्पर्शावरून खरेदी करण्याची संधी देण्यात आली होती. खाण्याचे स्टॉल्स, खेळण्याच्या साहित्यांची येथे व्यवस्था करण्यात आली होती. सुमारे ४५ ते ६० मिनिटे स्वयंसेवकाच्या मदतीने ग्राहकांना हा अनुभव देण्यात येत होता.
या वेळी शेठ डेव्हलपर्स अ‍ॅण्ड रिअल्टर्स इंडियाचे व्यवस्थापकीय संचालक अश्विन शेठ, एक्सआरसीव्हीसीचे संचालक डॉ. सॅम तारापोरवाला, ठाण्याचे महापौर संजय मोरे उपस्थित होते. या वेळी अश्विन शेठ यांनी उपस्थितांशी संवाद साधला. दृष्टिहीन व्यक्तींना शॉपिंगचा पुरेसा आनंद देण्यासाठी विवियाना मॉल सदैव प्रयत्नशील असून अंत:चक्षू कार्यक्रम सादर करणारा विवियाना हा पहिला मॉल असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
दृष्टिहीन व्यक्तींना स्वतंत्रपणे, स्वावलंबी वृत्तीने आणि आत्मविश्वासाने खरेदी करता यावी असा प्रयत्न या उपक्रमाच्या माध्यमातून करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. तर डॉ. सॅम तारापोरवाला यांनी अंत:चक्षू उपक्रमाची संकल्पना स्पष्ट केली. नागरिकांमध्ये जागृती निर्माण होण्यासाठी अशा उपक्रमांची गरज असल्याचे तारापोरवाला म्हणाले.

विवियानात मदत केंद्र..         
विवियाना मॉलच्या वतीने दृष्टीहीन व्यक्तींसाठी विविध सुविधा दाखल करण्यात आल्या आहेत. त्यामध्ये मॉलच्या प्रत्येक स्ट्रॉलबाहेर ब्रेल लिपीतील स्टिकर्स लावण्यात आले असून त्यामाध्यमातून दृष्टीहिन व्यक्तींना दिशादर्शन केले जाते. तर श्राव्य पध्दतीने मॉलमधील प्रत्येक फ्लॉअरची माहिती करून देणारा मार्गदर्शक प्रकल्प सुध्दा सुरू करण्यात आला आहे. याशिवाय मॉलमध्ये एक विशेष मदत केंद्र सुरू करण्यात येणार असून त्याला आय बॅंक असोसिएशन ऑफ इंडिया यांचा पाठींबा असणार आहे. या केंद्रामध्ये नेत्रदानाबद्दल जागृती करण्यात येणार आहे, अशी माहिती विवियाना मॉलच्या वतीने स्पष्ट करण्यात आली आहे.

parenting tips
मुलांच्या उन्हाळ्याच्या सुट्टीचा ‘असा’ करा सदुपयोग
Smartphone
‘डेटा’ग्रस्त समाज.. : समाजभानाचं हरपणं..
personality of jacob rothschild
व्यक्तिवेध : जेकब रोथशील्ड
nagpur university vc subhash chaudhari suspends by governor
लोकजागर : ‘चौधरी’ असण्याचा गुन्हा!