23 September 2020

News Flash

विठ्ठलवाडी आगाराचे उन्हाळी सुट्टीतील नियोजन कोलमडले

विठ्ठलवाडी आगार उपलब्ध बसची संख्या पाहून कोकणात उन्हाळी सुट्टीत जादा बस सोडण्याचे नियोजन करते.

कोकणात गाडय़ा सोडण्याच्या वेळापत्रकाला ठाणे आगाराकडून विलंब; सुट्टीचा हंगाम सुरू झाल्याने गोंधळ
कोकणात उन्हाळी हंगामात जादा बस सोडण्याचे वेळापत्रक दरवर्षी राज्य परिवहन महामंडळाच्या ठाणे विभागाकडून विठ्ठलवाडी आगाराकडे पाठविले जाते. त्याप्रमाणे विठ्ठलवाडी आगार उपलब्ध बसची संख्या पाहून कोकणात उन्हाळी सुट्टीत जादा बस सोडण्याचे नियोजन करते. या वेळी ठाणे विभागातून बस सोडण्याचे वेळापत्रक आले नसल्याने सुट्टीचा हंगाम सुरू झाला तरी विठ्ठलवाडी आगाराला कोकणात सोडण्यात येणाऱ्या बसचे नियोजन करणे शक्य झालेले नाही.
विद्यार्थ्यांच्या परीक्षा संपल्या आहेत. १५ एप्रिलपासून कोकणातील कुटुंब सुट्टीसाठी गावी जाण्यास सुरुवात करतील. त्यामुळे ठाणे विभागाने कोकणात जादा बस सोडण्याचे वेळापत्रक लवकर विठ्ठलवाडी आगाराला पाठवून द्यावे, असे आवाहन प्रवाशांकडून केले जात आहे. दरवर्षी एक महिना अगोदर हे वेळापत्रक पाठविले जाते. या वेळी प्रथमच ठाणे विभागाला बसचे वेळापत्रक पाठविण्यास दिरंगाई झाली आहे. त्याचा फटका बदलापूर ते दिवादरम्यान राहणाऱ्या कोकणातील प्रवाशांना बसण्याची शक्यता आहे, असे कोकण प्रवासी संघटनेचे अध्यक्ष मुरलीधर शिर्के यांनी सांगितले.
कोकणात जाणारे अनेक प्रवासी दिव्याहून कोकण रेल्वेने कोकणात जातात. कोकणातील रेल्वे स्थानकापासून आगार २० ते ३० किलोमीटर दूर असतात. रेल्वे स्थानकापासून आगारापर्यंत जाण्यासाठी रेल्वे स्थानकाजवळचा रिक्षाचालक चाकरमान्यांकडून १५० रुपयांपासून ते ७०० रुपये भाडे उकळतो. अनेक वेळा रेल्वे स्थानकापासून आगारापर्यंत जाण्यासाठी रिक्षा किंवा खासगी वाहन उपलब्ध नसते. मुंबईमध्ये राहणाऱ्या कोकणवासियांचे त्यामुळे हाल होतात. हा त्रास वाचविण्यासाठी बदलापूर, कल्याण, उल्हासनगर, डोंबिवली, दिवा, कोपर, विठ्ठलवाडी, अंबरनाथ परिसरात राहणारा कोकणवासी आपल्या गावी राज्य परिवहन महामंडळाच्या बसने जाण्याचा प्रयत्न करतो. यामुळे प्रवास सुखाचा होतो आणि कुटुंबीयांची व सामानाची चढउतार करावी लागत नाहीत. त्यामुळे प्रवासी बसच्या प्रवासाला सर्वाधिक प्राधान्य देतात.
विठ्ठलवाडी ठिकाण बदलापूर ते दिवादरम्यानच्या कोकणवासीयांना मध्यवर्ती असल्याने विठ्ठलवाडी आगारातून सुटणाऱ्या बसने अनेक प्रवासी वर्षांनुवर्ष कोकणात जाण्याला प्राधान्य देतात, असे शिर्के यांनी परिवहन महामंडळ अधिकाऱ्यांच्या निदर्शनास आणले आहे.

प्रवासी संघटना वरिष्ठांना भेटणार
विठ्ठलवाडी आगारातून दरवर्षी एप्रिल, मे महिन्यात रत्नागिरी, दापोली, कणकवली, गुहागरदरम्यान जादा बस सोडण्यात येतात. घरात मोठा गोतावळा असलेली कुटुंब बसने प्रवास करण्यास प्राधान्य देतात. या वेळी सुट्टीकालीन बस उपलब्ध नसल्याने चाकरमान्यांमध्ये नाराजी व्यक्त केली जात आहे. महामंडळाला जादा बसमधून महसूल मिळत असूनही जादा बसचे नियोजन करण्यात व्यवस्थापन का कमी पडत आहे, असे प्रश्न चाकरमानी उपस्थित करीत आहेत. खासगी वाहनचालकांचा नफा होण्यासाठी ही खेळी करण्यात येत आहे की काय, असाही प्रश्न यानिमित्ताने उपस्थित केला जात आहे. विठ्ठलवाडी आगारातून कोकणात जाण्यासाठी गुहागर मार्गावरील चिंद्रावळे (गराटेवाडी) ही एकमेव बस सध्या सुरू आहे, असे मुरलीधर शिर्के यांनी सांगितले. कोकणात जाणाऱ्या सुट्टीकालीन बस लवकर सुरू कराव्यात यासाठी आपण महामंडळाच्या वरिष्ठांना भेटणार आहोत, असे प्रवासी संघटनेचे शिर्के यांनी स्पष्ट केले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 9, 2016 3:41 am

Web Title: vithalwadi depot management collapse in summer vacation
Next Stories
1 स्कायवॉक खुला, पण रेल्वे पूल बंद
2 सर्वधर्मियांसोबत हिंदू नववर्षांचे स्वागत
3 ढोलताशांच्या गजराने बदलापूर दुमदुमले!
Just Now!
X