ठाणे महापालिकेचा व्होल्वो कंपनीसोबत सामंजस्य करार

ठाणे शहरातील सार्वजनिक आणि खासगी वाहतूक व्यवस्थेचे सर्वेक्षण करून त्यांच्या सक्षमीकरणासाठी आवश्यक उपाययोजना तयार करण्यासाठी व्होल्वो बस कॉर्पोरेशन इंडियाने मदत करण्याचा निर्णय घेतला आहे. ‘मेक इन इंडिया’ उपक्रमांतर्गत आयोजित उपक्रमाच्या निमित्ताने एकत्र आलेल्या उद्योजकांच्या कार्यक्रमामध्ये रविवारी महापालिका आयुक्त संजीव जयस्वाल आणि व्होल्वो बस कॉर्पोरेशन इंडियाचे अध्यक्ष आकाश पसी यांच्यामध्ये हा सामांजस्य करार झाला. या वेळी स्वीडनचे पंतप्रधान स्टीफन लोफवेन, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उद्योगमंत्री सुभाष देसाई, व्होल्वोचे आंतरराष्ट्रीय अध्यक्ष तसेच मुख्य कार्यकारी अधिकारी असणारे मार्टिन लुंडस्टेड आणि ठाण्याचे महापौर संजय मोरे यांची विशेष उपस्थिती होती. या करारामुळे भविष्यात व्होल्वो कंपनीचे सहकार्य मिळू शकणार आहे.

ठाणे शहराच्या वाहतूक व्यवस्थेचे सर्वेक्षण करणे, तसेच ती सक्षम करणासाठी उपाययोजना करण्याची गरज ठाणे शहरासाठी महत्त्वाची ठरणार असून ती पूर्ण करण्यासाठी महापालिका प्रशासनाच्या वतीने हा करार करण्यात आला आहे. या कराराच्या निमित्ताने वोल्वो कंपनीच्या वतीने ठाणे शहरातील सार्वजनिक आणि खासगी वाहतूक व्यवस्थेचे सर्वेक्षण करण्यात येणार आहेत. तसेच भविष्यात काय करायला हवे? याविषयी उपाययोजना सुचविण्यात येणार आहेत. यामध्ये सद्य:स्थितीमध्ये होणारे प्रदूषण कमी करणे, ग्रीन हाऊस गॅस उत्सर्जन कमी करणे, ध्वनिप्रदूषण कमी करणे आदी गोष्टींचा ऊहापोह या सर्वेक्षणात करण्यात येणार आहे. ‘मेक इन इंडिया’ उपक्रमांतर्गत रविवारी हॉटेल ट्रायडंट, बांद्रा-कुर्ला कॉम्प्लेक्स येथे स्वीडनचे पंतप्रधान, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उद्योगमंत्री सुभाष देसाई, व्होल्वोचे आंतरराष्ट्रीय अध्यक्ष आणि मुख्य कार्यकारी अधिकारी मार्टिन लुंडस्टेड, महापौर संजय भाऊराव मोरे यांच्या उपस्थितीमध्ये ही प्रक्रिया पूर्ण करण्यात आली. महापालिका आयुक्त संजीव जयस्वाल आणि व्होल्वो बस कॉर्पोरेशन इंडियाचे अध्यक्ष आकाश पसी यांच्यासोबत सामंजस्य करारावर स्वाक्षरी केली. या वेळी अतिरिक्त आयुक्त सुनील चव्हाण आणि महानगरपालिकेचे इतर अधिकारी उपस्थित होते.

करारावर स्वाक्षरी करण्याची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर व्होल्वो हायब्रीड बसमधून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मान्यवरांसह महापौर संजय मोरे, महापालिका आयुक्त संजीव जयस्वाल आणि व्होल्वो बस कॉर्पोरेशन इंडियाचे अध्यक्ष आकाश पसी यांनी परिसरात एक फेरफटका मारला. ठाणे शहराच्या दृष्टीने महत्त्वाच्या ठरणाऱ्या या करारामुळे शहरातील वाहतूक व्यवस्थेत आमूलाग्र बदल घडेल, असा विश्वास महापालिका प्रशासनाच्या वतीने व्यक्त करण्यात आला आहे.

कराराची वैशिष्टय़े

  • व्होल्वो कंपनी शहरातील वाहतूक व्यवस्थेचे सर्वेक्षण करणार
  • शहरातील वाहतुकीचे सक्षमीकरणासाठी विविध पर्याय सुचवणे
  • सद्यस्थितीतील प्रदूषण कमी करण्यासाठी उपाय
  • ग्रीन हाऊस गॅस उत्सर्जन कमी करणे, ध्वनी प्रदूषण कमी करण्यासाठी प्रयत्न