04 August 2020

News Flash

गृहनिर्माण संस्थांतील मतदार शोध निष्फळ?

मतदार याद्यांतील घोळ कमी करण्यासाठी निवडणूक आयोगाने प्रत्येक जिल्ह्यात मतदार यादी पुनर्परीक्षण कार्यक्रम सुरू केला आहे.

(संग्रहित छायाचित्र)

किन्नरी जाधव

१७ हजारपैकी जेमतेम ३ हजार सोसायटय़ांचा प्रतिसाद; सोसायटय़ांच्या स्वयंसेवकांच्या कामांत अडथळे

आगामी लोकसभा, विधानसभा निवडणुकांमध्ये मतदार यादीतील घोळ टाळण्यासाठी गृहनिर्माण संस्थांच्या स्तरावर मतदार नोंदणी तसेच दुबार मतदारांचा शोध घेण्याची निवडणूक आयोगाची मोहीम अपयशी ठरत आहे. ठाणे जिल्ह्यात आजघडीला १७ हजार ५१२ गृहनिर्माण संस्था अस्तित्वात असून त्यापैकी जेमतेम तीन हजार ५३ गृहनिर्माण संस्थांनी या कामी पुढाकार घेतला आहे. मात्र, या सोसायटय़ांतील स्वयंसेवकांच्या माध्यमातून केवळ २० हजार ५६६ मतदारांचे अर्ज जिल्हा प्रशासनाकडे आले आहेत. त्यामुळेच गृहनिर्माण संस्थांच्या माध्यमातून एक लाख मतदारांची नोंदणी करण्याचे जिल्हा प्रशासनाचे लक्ष्य अपूर्ण राहण्याची चिन्हे आहेत.

मतदार याद्यांतील घोळ कमी करण्यासाठी निवडणूक आयोगाने प्रत्येक जिल्ह्यात मतदार यादी पुनर्परीक्षण कार्यक्रम सुरू केला आहे. त्याअंतर्गत जिल्ह्यातील सहकारी गृहनिर्माण संस्थांची मदत घेऊन मतदार नोंदणी, नावातील दुरुस्ती आणि नावे वगळणे ही कामे करण्यात येत आहेत. गृहनिर्माण संस्थांमधील कार्यकारिणी पदाधिकारी व सदस्य याकामी पुढाकार घेतील, असे प्रशासनाने गृहीत धरले होते. या मंडळींच्या माध्यमातून मतदार नोंदणी अधिक अचूकपणे व जलदगतीने होईल, असाही अंदाज होता. मात्र, ठाणे जिल्ह्यातून या मोहिमेला फारसा प्रतिसाद मिळालेला नाही.

सध्या ठाणे जिल्ह्य़ात १७ हजार ५१२ सहकारी गृहनिर्माण संस्था आहेत. यापैकी जिल्हा निवडणुक कार्यालयाच्या वतीने ३ हजार ५३ गृहनिर्माण संस्थांमध्ये या पुर्ननिरीक्षण कार्यक्रम तसेच स्वयंसेवकांच्या कामाविषयी माहिती देण्यात आली आहे. ४८५ संस्थांमध्ये मतदान पुर्ननिरीक्षणाचे शिबिर आयोजित करण्यात आले आहे. केवळ २० हजार मतदारांचे अर्ज दाखल झाल्याने मतदारांची संख्या अतिशय कमी असल्याची खंत खुद्द जिल्हाधिकारी राजेंद्र नार्वेकर यांनी व्यक्त केली आहे. गृहनिर्माण स्वयंसेवक बैठकीतही जिल्हाधिकारी याविषयी असमाधानी दिसून आले. येत्या ३१ ऑक्टोबरपर्यत या कार्यक्रमासाठी पुढाकार घेतलेल्या स्वयंसेवकांपुढे नवे मतदार हूडकून काढण्याचे आव्हान पेलावे लागणार आहे.

गृहनिर्माण संस्थांच्या अडचणी

* निवडणूक आयोगाने मतदार नोंदणीची जबाबदारी गृहनिर्माण संस्थांतील स्वयंसेवकांवर टाकली असली तरी, त्यांना या कामांत अनेक अडथळय़ांना तोंड द्यावे लागत आहे. ‘गेल्या वर्षी रहिवाशांचे अर्ज भरून अधिकाऱ्यांकडे जमा केले होते. मात्र, अजूनही त्या रहिवाशांना मतदान कार्डाचे वाटप करण्यात आलेले नाही,’ अशी माहिती एका स्वयंसेवकाने दिली.

* एका गृहनिर्माण संस्थेत रहिवाशांची संख्या जास्त असल्यास प्रत्येक घरातील मयत, भाडेकरू, स्थलांतरित यांच्याविषयीची माहिती त्या संस्थेच्या स्वयंसेवकाकडे नसते. त्यामुळे सर्व रहिवाशांपर्यंत पोहचणे अशक्य होते.

* अनेकदा पुर्नविकासासाठी दुसऱ्या ठिकाणी वास्तव्यास गेलेल्या रहिवाशांचे नाव नेमके कोणत्या मतदार यादीत घ्यायचे याविषयी साशंकता असते, त्यामुळे या मोहिमेत अडथळे येत असल्याचे स्वयंसेवकांनी सांगितले.

* गेल्या वर्षी यासारखीच मोहिम राबवण्यात आल्याने संबंधित स्वयंसेवकांचे संपर्क क्रमांक प्रशासनाकडे आहेत. असे असले तरी या स्वयंसेवकांच्या बैठकीसाठी कोणतेही आमंत्रण देण्यात आले नाही. केवळ सहकारी गृहनिर्माण संस्था पदाधिकाऱ्यांच्या वतीने फेसबुकवर याची माहिती देण्यात आली होती. त्यामुळे ज्या स्वयंसेवकांना काम करण्याची इच्छा आहे, तेच स्वयंसेवक या बैठकीत आले होते, अशी माहिती एका स्वयंसेवकाने दिली.

येत्या एक जानेवारी रोजी प्रसिद्ध केली जाणारी मतदारयादी महत्वाची ठरणार आहे. सहकारी गृहनिर्माण संस्थांकडून याकामी अपेक्षित प्रतिसाद मिळालेला नाही. त्यामुळे येत्या काळात गृहसंस्थांच्या प्रतिनिधींच्या बैठका घेण्यात येत आहेत.

– राजेंद्र नार्वेकर, जिल्हाधिकारी

स्वयंसेवकांना अर्ज भरून घेण्यासाठी अडथळे निर्माण होत आहेत. त्यासाठी निवडणूक कार्यालयातर्फे स्वयंसेवकांच्या प्रशिक्षण शिबिराचे आयोजन होणे महत्त्वाचे आहे. या शिबिरात समस्यांचे निराकरण केले जाईल.

– सीताराम राणे, अध्यक्ष, ठाणेजिल्हा सहकारी गृहनिर्माण संस्था फेडरेशन

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 24, 2018 2:01 am

Web Title: voter search in housing societies is ineffective
Next Stories
1 मलवाहिन्या देखभालीला स्थगिती
2 पालिका तोटय़ात, ठेकेदार फायद्यात
3 ग्राहक प्रबोधन : प्रवाशाशी हीन वर्तन भोवले
Just Now!
X