शहापुरातील पाडय़ांवरील मतदार लोकसभा निवडणुकीबाबत अनभिज्ञ; मतदार पावत्यांसोबत ‘निरोप’ मिळण्याची प्रतीक्षा

नीलेश पानमंद-किशोर कोकणे

ठाणे : लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराची रणधुमाळी अवघ्या ठाणे जिल्ह्यात सुरू असली तरी शहापूर तालुक्यातील आदिवासी पाडय़ांमध्ये अजूनही सामसूम आहे. इथे ना उमेदवारांची चर्चा होतेय, ना घरोघरी प्रचार करत हिंडणाऱ्या कार्यकर्त्यांची फौज दिसतेय.. एवढंच काय, इथल्या मतदारांना राजकीय पक्षांचीही माहिती नाही. ‘मतदानाच्या दोन दिवस आधी आमच्याकडे पावत्या येतील आणि ठरावीक निरोपही. त्यानंतर फक्त चिन्ह पाहून मतदान करायचे, एवढेच आम्हाला ठाऊक!’, असे हे मतदार सांगतात.

देशभरात लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराची रणधुमाळी सुरू आहे. मतदारांपर्यंत पोहोचण्यासाठी उमेदवार मतदारसंघ पिंजून काढताना दिसत आहेत.  या कशाचाही मागमूस ठाणे जिल्ह्य़ातील ग्रामीण परिसरातील आदिवासी पाडय़ांवर मात्र दिसत नाही. ठाणे, पालघर जिल्ह्य़ातील ग्रामीण भागात आदिवासी समाजाची वस्ती काही लाखांच्या घरात आहे. ठाणे जिल्ह्य़ात शहापूर तालुक्यात या मतदारांची संख्या आजही निकालांवर प्रभाव पाडेल अशी म्हणता येईल. मात्र येथील बहुतांश मतदारांना निवडणुका, उमेदवार, मतदानाची तारीख याची माहितीही नाही. पाडय़ापासून लांबवर अंतरावर असलेल्या दुकानांमध्ये गेल्यास निवडणुका तोंडावर आल्या आहेत याची वर्दी मिळते. मात्र, त्यापलीकडे प्रचाराचे मुद्दे, निवडणुकांचे वातावरण याचा मागमूसही या वस्त्यांमध्ये नाही.

शहापूर तालुक्यातील वाशाळा येथील चिंध्याची वाडी, सुसरीवाडी आणि ढेंगळेवाडी यासह अन्य वस्त्यांवर निवडणुकांचे वातावरण दिसून येत नाही. या सर्वच वस्त्या भिवंडी लोकसभा मतदारसंघाच्या अखत्यारीत येत असून या मतदारसंघासाठी २९ एप्रिलला म्हणजेच आठ दिवसांनी मतदान होणार आहे. उमेदवारांना प्रचारासाठी शेवटचा आठवडा शिल्लक राहिला आहे. मात्र एरवी सुविधांच्या आघाडीवर वंचित असलेल्या या वस्त्यांवर उमेदवार, त्यांचे समर्थक, कार्यकर्ते असे कुणीही अजून फिरकलेले नाही. या वस्त्यांवर जाणाऱ्या रस्त्यांवर आणि वस्त्यांच्या वेशीवर उमेदवारांचे फलकही दिसून येत नाही. घराघरांत जाऊन मतदान पावत्या  वाटणाऱ्या कार्यकर्त्यांची फौजही या पाडय़ांवर दिसून येत नाही.

 

दुकानदारांकडून निरोप

निवडणुकांमध्ये आम्ही मतदान करतो आणि आता निवडणुका आल्या आहेत, हे गावकऱ्यांना ठाऊक आहे. त्यामागचे कारण रंजक आहे. वस्त्यांना लागून एक ते दोन दुकाने असून या दुकानदारांना राजकीय नेते निवडणुका असल्याचे कळवितात. त्यानंतर दुकानात खरेदीसाठी येणाऱ्या ग्रामस्थांना दुकानदार निवडणूक असल्याचे सांगतो. त्यामुळे आम्हाला निवडणुका असल्याचे कळते, असे गणेश हिलम आणि सचिन मिसाळे या ग्रामस्थांनी सांगितले. निवडणुकांच्या वेळेस उमेदवार कधी तरी येतात वस्त्यांवर; पण यंदा अजूनही उमेदवार वस्त्यांवर आलेले नाहीत, असेही ग्रामस्थ सांगतात. कोणकोणते पक्ष आहेत आणि कोणत्या पक्षातून कोण निवडणूक लढवीत आहेत, याविषयी मात्र ग्रामस्थांना काहीच सांगता येत नाही.