अनेक जुने-नवे मतदार मतदानापासून वंचित

बदलापूर : भिवंडी लोकसभा मतदारसंघाचा भाग असलेल्या बदलापूर शहरात सकाळपासून मतदारांचा उत्साह दिसून आला. अंबरनाथमध्येही रांगा लागल्या होत्या. मात्र, मतदार याद्यांमधील घोळ निस्तरण्यात अद्याप निवडणूक यंत्रणेला पुरेसे यश आलेले नाही. निवडणूक आयोगाचे ओळखपत्र असूनही यादीत नाव नसल्याने अनेक नवमतदारांना मतदानास मुकावे लागले.

बदलापूरमधील विविध मतदान केंद्रांवर सकाळपासून मतदारांनी गर्दी करण्यास सुरुवात केली होती. कात्रप भागातील एका मतदान केंद्रावर सकाळी मतदान यंत्र बंद पडल्याने मोठी रांग लागली होती. मात्र दर निवडणुकीप्रमाणे या निवडणुकीतही मतदार याद्यांचा घोळ समोर आला. तरुण मतदार मतदानासाठी केंद्रावर येत होते. मात्र निवडणूक आयोगाने ओळखपत्र देऊ नही यादीतून नाव वगळल्याचे तिथे आल्यानंतर अनेकांच्या लक्षात आले. त्यामुळे त्यांचा हिरमोड झाला. अनेक जुन्या मतदारांची नावेही यादीतून वगळल्याने मतदारांत संताप होता. निवडणूक आयोगाच्या संकेतस्थळावरून केंद्र स्तरावरच्या अधिकाऱ्यांचे चुकीचे क्रमांक मिळत असल्याने मतदारांच्या संतापात भर पडत होती.

मतदारांना निवडणूक आयोगाकडून मतदानासंदर्भातील चिठ्ठी देण्यात न आल्यामुळे सकाळी मतदान केंद्रांबाहेर गोंधळाचे वातावरण होते. नव्या मतदारांना कोणत्याही प्रकारची ओळखपत्रे, चिठ्ठी वाटण्यात आली नाही. त्यामुळे ही यंत्रणा सदोष असल्याचा आरोप राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या आशीष दामले यांनी केला आहे.

मतदानाच्या दिवशी बहुतांश मतदार सुटीचा आनंद घेत घरात दूरचित्रवाणी संचापुढे ठिय्या मांडतील अशी भीती व्यक्त होताच अंबरनाथमधील केबलचे संचालक अनिल गायकवाड यांनी शहरातील सर्व टीव्ही केबल यंत्रणा दुपारी ३ वाजेपर्यंत बंद ठेवली होती.

गेल्या आठवडाभरापासून वाढलेल्या उन्हाचा फटका मतदारांना बसताना दिसत होता. भिवंडी लोकसभा मतदारसंघातील बदलापूर, वांगणी आणि अंबरनाथ तालुक्यातील ग्रामीण भागात बहुतांश मतदान केंद्रांबाहेर छप्पर नसल्याने मतदारांना उन्हात रांगेत उभे रहावे लागत होते.

‘आपलं ठरलंय’ जोरात

भिवंडी लोकसभा मतदारसंघात खासदार कपिल पाटील यांच्यावरील शिवसैनिकांची नाराजी मतदानाच्या दिवशीही पाहायला मिळाली. अनेक शिवसैनिक मतदानाला जाण्यापूर्वी  ‘आपलं ठरलंय’ या संदेशाची उजळणी करताना दिसत होते.