मतदारसंघ कल्याण

कल्याण : कल्याण लोकसभा मतदारसंघात सकाळच्या सत्रात जाणवणारा मतदानाचा उत्साह दुपारी बारानंतर ओसरला. मतदान केंद्रांवर सकाळी रांगा लागल्याचे चित्र असताना दुपारी मात्र, कोणत्याही रांगेविना मतदार आपला हक्क बजावून परतत होते. सुरुवातीला राजकीय पक्षांच्या कार्यकर्त्यांनी मतदारांना केंद्रांपर्यंत आणण्याचे प्रयत्न केले. मात्र, दुपारच्या उन्हामुळे अनेकांनी बाहेर पडणे टाळल्याने मतदानाचा टक्का वर सरकूच शकला नाही.

वाढत्या तापमानाची शक्यता गृहीत धरून अनेक मतदार सकाळी सात वाजताच मतदानासाठी बाहेर पडले. त्यामुळे सकाळच्या सत्रात मतदान केंद्रांवर चांगली गर्दी दिसून येत होती. यामध्ये ज्येष्ठ नागरिकांसह नवमतदारांचाही उत्साह दिसून येत होता. ही गर्दी पाहून यंदा कल्याण मतदारसंघातील मतदानाचा टक्का पन्नाशी गाठेल, असा अंदाज होता. परंतु, सकाळी अकरानंतर गर्दीला ओढ लागली. दुपारी १२ ते तीनदरम्यान मतदान केंद्रांवर फारशी वर्दळ नव्हती. दुपारी तीननंतर उन्हे कलू लागली तशी मतदारांनी मतदान केंद्रांची वाट धरली. मात्र, मधल्या तीन तासांत घसरलेल्या मतदानाचा एकूण सरासरीवर परिणाम झाला.

डोंबिवलीत मतदार पावत्या नसल्याने अनेक मतदारांना आपला हक्क बजावण्यासाठी धावपळ करावी लागली. २७ गावांच्या हद्दीतील मतदान केंद्रांवर मतदानासाठी गर्दी ओसंडून वाहत होती. या भागात बाबाजी पाटीलसमर्थक कार्यकर्ते, महायुतीचे डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या पत्नी, महापौर विनिता राणे आपल्या मतदारांवर लक्ष ठेवण्यासाठी तळ ठोकून होते. भोपर येथून श्रीकांत यांच्या पत्नी कार्यकर्त्यांशी संपर्क ठेवून होत्या. उल्हासनगरात तर सकाळी ११ पर्यंतही मतदानाची टक्केवारी खालावलेलीच होती. मुंब्रा-कळवा भागात मात्र मतदानात उत्साह दिसून आला. येथे महिला वर्ग आघाडीवर असल्याचे दिसून आले. शिवसेनेचा बालेकिल्ला असलेल्या कल्याण पश्चिममध्ये कार्यकर्तेही तुरळक दिसत होते.

डोंबिवलीतील टिळकनगर शाळा, पत्रीपूल कुष्ठ वसाहत येथील मतदान यंत्रे बंद पडली, पण ती तात्काळ दुरुस्त करून सुरू करण्यात आली. खिडकाळी येथील मतदान यंत्र काही काळ बंद पडले होते. कल्याण पूर्व येथील जरीमरी नगर शाळेतील १० यंत्रे बंद पडल्याने येथील मतदान प्रक्रिया थांबली होती. त्यामुळे दुपापर्यंत येथे रांगा कायम होत्या.