मतदारसंघ ठाणे

ठाणे : ठाणे शहर, वागळे इस्टेट आणि घोडबंदर परिसरातील मतदान केंद्रांबाहेर सोमवार सकाळपासूनच लांब रांगा लागल्या होत्या. या रांगा कासवगतीने पुढे सरकत असल्याने मतदान केंद्रावरील गर्दी दुपापर्यंत कायम होती. त्यात वाढलेल्या तापमानामुळे रांगेत उभे राहिलेले सर्वच जण घामाघूम झाले होते. मात्र, त्यांच्यातला मतदानाचा हक्क बजावण्याचा उत्साह कमी झालेला नव्हता. तरुणाईपासून ते ज्येष्ठ नागरिकांपर्यंत अशा सर्वामध्येच मतदानाचा उत्साह दिसून आला. लुईसवाडी आणि श्रीरंग भागात मतदान यंत्रामध्ये बिघाड झाल्यामुळे मतदारांना रांगेत ताटकळत उभे राहावे लागल्याचे प्रकार घडले.

ठाणे लोकसभा मतदार संघाच्या निवडणुकीसाठी सोमवारी मतदान झाले. त्यासाठी मतदार संघातील ठाणे शहर, वागळे इस्टेट आणि घोडबंदर परिसरात मतदान केंद्र उभारण्यात आली होती. शहरातील शाळांमध्ये ही मतदान केंद्रे उभारण्यात आली होती. या केंद्रांवर सोमवारी सकाळी ७ वाजल्यापासूनच नागरिकांनी मतदानासाठी गर्दी केली होती. या केंद्राजवळील शंभर मीटर परिसरात वाहतुकीला बंदी घालण्यात आली होती. या शंभर मीटर अंतरापासून ते मतदान केंद्रापर्यंत पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. शंभर मीटर परिसरातून एखाद्याने वाहन नेण्याचा प्रयत्न केला तर पोलिसांकडून ते वाहन अडवून पुन्हा माघारी पाठविले जात होते. तसेच मतदाराशिवाय अन्य व्यक्तींना या केंद्राच्या परिसरात प्रवेश दिला जात नव्हता.

वाघबीळ, हिरानंदानी इस्टेट या भागातील मतदान केंद्रावर मतदारांच्या लांब रांगा लागल्या होत्या. त्यामध्ये तरुण आणि ज्येष्ठ नागरिकांचा समावेश होता. अशीच काहीशी परिस्थिती ठाणे शहर, वागळे इस्टेट आणि कोपरी भागातील मतदान केंद्रांवर पाहावयास मिळाली. गेल्या काही दिवसांपासून तापमानात वाढ झाल्यामुळे प्रचंड उकाडा वाढला आहे. दुपारच्या वेळेत उन्हाचा पारा वाढल्यावर हा उकाडा अधिक जाणवतो. त्यामुळेच सकाळच्या वेळेत मतदान करण्यासाठी नागरिक घराबाहेर पडले असावे, अशी शक्यता व्यक्त केली जात होती.

आयुक्तांसमोर घोषणाबाजी

आयुक्त संजीव जयस्वाल हे त्यांच्या पत्नीसह मतदानाचा हक्क बजावण्यासाठी हिरानंदानी इस्टेट येथील मतदान केंद्रावर गेले होते. या केंद्रावर मतदान प्रक्रिया संथ गतीने सुरू होती. त्यामुळे रांगेत असलेल्या मतदारांनी आयुक्त जयस्वाल यांना त्याकडे लक्ष देण्याची मागणी केली. मात्र, ते पुढे निघून गेल्याने नागरिकांनी त्यांच्याविरोधात घोषणाबाजी करून नाराजी व्यक्त केली. या घटनेची चित्रफीत समाजमाध्यमांवर प्रसारित झाली.

अखेर ग्रामस्थांचे मतदान

विविध कारणांवरून वाघबीळ ग्रामस्थांनी मतदानावर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला होता. त्यानंतर निवडणूक विभागाने ग्रामस्थांची समजूत काढून त्यांना मतदान करण्याचे आवाहन केले होते. असे असतानाच शिवसेनेचे उमेदवार राजन विचारे यांची प्रचार रॅली अडविण्याचा प्रकार वाघबीळ गावात घडला होता. यामुळे वाघबीळ ग्रामस्थांच्या भूमिकेकडे सर्वाचे लक्ष लागले होते. सोमवारी सकाळी ग्रामस्थ मतदानासाठी घराबाहेर पडले नव्हते. दुपारनंतर मात्र ग्रामस्थांनी मतदान केले. मतदानाचा हक्क बजावण्याचे संदेश आम्हाला मिळाले आणि त्यामुळे आम्ही मतदानाचा हक्क बजावला, असे एका ग्रामस्थाने सांगितले. परंतु हे संदेश कुणी दिले, याविषयी त्यांनी बोलणे टाळले.