News Flash

एसटीच्या मार्गावर पालिकेची बससेवा

वसई-विरार शहरातून एसटीने आपली सेवा बंद करण्याचे ठरवल्याने वसईत संतप्त वातावरण आहे.

एसटीची बससेवा बंद झाल्याने त्या जागी परिवहन सेवा देण्याची पालिकेने तयारी सुरू केली आहे.

पहाटेपासून मध्यरात्रीपर्यंत परिवहनची सेवा देण्याचा दावा

वसई-विरार शहरातून एसटीची बससेवा बंद झाल्याने त्या जागी परिवहन सेवा देण्याची पालिकेने तयारी सुरू केली आहे. पालिका परिवहनच्या बस फेऱ्या आणि वेळेबाबत नागरिकांनी शंका उपस्थित केली होती, मात्र पहाटे पहिल्या लोकलपासून अखेरच्या लोकलपर्यंत बससेवा सुरू राहील आणि प्रत्येक प्रवाशाला फायदा होईल, अशा प्रकारची वेळ असेल, असा दावा पालिका प्रशासनाने केला आहे.

वसई-विरार शहरातून एसटीने आपली सेवा बंद करण्याचे ठरवल्याने वसईत संतप्त वातावरण आहे. एसटी बंद केली तर सक्षम सेवा देणार कोण, असा प्रश्न उपस्थित झाला होता. एसटीने आपले मार्ग पालिकेला हस्तांतरित केले आहेत. या सर्व मार्गावर सेवा देण्याची तयारी पालिकेने केली आहे. शेवटच्या लोकलपर्यंत आणि पहाटेच्या पहिल्या लोकलपासून पालिका गावागावात परिवहन सेवा देईल, असे पालिकेचे अतिरिक्त आयुक्त संजय हेरवाडे यांनी सांगितले. आमची तयारी पूर्ण असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. परिवहन सभापती भरत गुप्ता यांनी एसटीपेक्षा अधिक चांगली सेवा प्रवाशांना देऊ , असा दावा केला आहे. ग्रामस्थांमध्ये पालिकेच्या परिवहन सेवेबाबत गैरसमज आहे. एसटी बंद झाली की खाजगी ठेकेदाराची परिवहन सेवा त्यात परिणामकारकतेने मिळणार नाही, असे ग्रामस्थांना वाटते. परंतु शेवटच्या लोकलपर्यंत आणि अगदी एक प्रवासी असेल तर नफ्या-तोटय़ाचा विचार न करता परिवहन सेवा दिली जाईल, असे त्यांनी सांगितले. निर्भय जनमंचच्या शिष्टमंडळाने सोमवारी जिल्हा नियंत्रक अजित गायकवाड यांची भेट घेऊन एसटी बंद करू नये, असे सांगितले. ज्या मार्गावर कमी प्रवासी असतील, तिथे मिनी एसटी चालवण्याची सूचनाही त्यांनी केली.

एसटी आगारावरून वाद

वसई-विरारच्या पश्चिम पट्टय़ात जाणाऱ्या बस नालासोपारा आगारातून सुटतात. एसटी बंद झाल्यानंतर हे आगार रिकामे होणार आहे. हे आगार गावात परिवहन सेवा देणाऱ्या महापालिकेला भाडेतत्त्वावर द्यावे, अशी मागणी भाजपाचे जिल्हाध्यक्ष राजन नाईक यांनी केली आहे. एसटीचे आगार पालिकेला मिळाले तर प्रवाशांचाच फायदा होणार आहे, असे त्यांनी सांगितले. मात्र निर्भय जनमंचने याला तीव्र विरोध केला आहे. अनेक जुन्या नेत्यांनी आंदोलने करून एसटीचे आगार मिळवले होते. आगार ताब्यात घेऊन ती जागा हडप करण्याचा डाव असल्याचा आरोप निर्भय जनमंचचे अध्यक्ष मनवेल तुस्कानो यांनी केला आहे. त्यामुळे आता या मुद्यावरून दोन गट पडले आहेत.

महापालिका परिवहनची तयारी पूर्ण झाली आहे. प्रत्येक बंद मार्गावर सेवा देणार असून तशा प्रकारची व्यवस्था करण्यात आली आहे.

-संजय हेरवाडे, अतिरिक्त आयुक्त, वसई-विरार महापालिका

ग्रामस्थांमध्ये पालिकेच्या सेवेबाबत गैरसमज आहेत, परंतु आम्ही एसटीपेक्षाही चांगली सेवा देऊन ग्रामस्थांची मने जिंकू.

-भरत गुप्ता, सभापती परिवहन समिती

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 22, 2017 1:42 am

Web Title: vvmc to run buses on msrtc routes
Next Stories
1 पिण्याच्या पाण्याची गुणवत्ता घसरली!
2 ‘इमानी मित्रां’चा रॅम्पवर रुबाब
3 अंधश्रद्धेच्या फेऱ्यातून २८८  कासवांची ‘घरवापसी’
Just Now!
X