वाडा: वाडा नगरपंचायतीच्या उपनगराध्यक्ष पदाची आज निवडणूक बिनविरोध पार पडली. शिवसेनेच्या वर्षा गोळे यांची यावेळी बिनविरोध निवड झाल्याचे पिठासन अधिकारी तथा मुख्याधिकारी रिताली परदेशी यांनी जाहीर केले.

उपनगराध्यक्ष पदासाठी नगरपंचायतमध्ये सत्ताधारी असलेल्या महाविकास आघाडीमधील तिन्ही पक्षाने इच्छा व्यक्त केली होती. त्यामुळे या आघाडीत बिघाडी होण्याची शक्यता निर्माण झाली होती. या बिघाडीचा लाभ उठविण्यासाठी नगरपंचायतीमधील विरोधी पक्ष असलेल्या भाजपाने जोरदार तयारी करुन या निवडणुकीत उमेदवारी अर्ज देखील दाखल केला होता. मात्र ऐनवेळी महाविकास आघाडीमधील सर्व नगरसेवक एकत्र आल्याने भाजपाच्या उमेदवार रिमा गंधे यांनी अर्ज मागे घेतला. व आघाडीमधील शिवसेनेच्या वर्षा गोळे ह्या बिनविरोध निवडून आल्या.

वाडा नगरपंचायत मध्ये एकुण 17 सदस्य संख्या असुन शिवसेना (6), भाजपा (6), काॅंग्रेस (2), राष्ट्रवादी काॅग्रेस, आर.पी.आय. व बहुजन विकास आघाडी यांचे प्रत्येकी एक सदस्य संख्या आहे. नगराध्यक्षा गितांजली कोलेकर ह्या शिवसेनेच्या असुन त्या जनतेमधून निवडून आलेल्या आहेत.

उपनगराध्यक्ष पदासाठी इच्छुक असलेल्या महाविकास आघाडीमधील नगरसेवकांची विविध विषय समित्यांच्या सभापती पदावर वर्णी लावण्यात येणार असल्याचे बोलले जात आहे. दरम्यान वाडा नगरपंचायत मध्ये नगराध्यक्ष, उप नगराध्यक्ष व मुख्याधिकारी या महिलाच आहेत. तसेच वाडा प्रांत अधिकारी, गटविकास अधिकारी व सहाय्यक गटविकास अधिकारी ह्या सुद्धा महिलाच असल्याने वाड्यात महिलाराज सुरु झाले आहे.