26 September 2020

News Flash

करोनाचा वाडा एसटी आगाराला फटका

एकेकाळी सरासरी उत्पन्नामध्ये राज्यात पहिला क्रमांक मिळवणाऱ्या वाडा एसटी बस आगाराचे करोनाच्या संक्रमणात तब्बल पाच कोटी रुपयांनी उत्पन्न घटले आहे.

वाडा एसटी बस आगारा

चार महिन्यांत पाच कोटींचे उत्पन्न घटले;  ७० कर्मचाऱ्यांच्या जिवावर कारभार सुरू

रमेश पाटील, लोकसत्ता

वाडा : करोनाच्या संसर्गजन्य आजारामुळे सर्वच व्यवसाय डबघाईस आले आहेत. ग्रामीण भागाची जीवनवाहिनी म्हणून ओळखली जाणारी महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाची एसटी बसतही यातून सुटलेली नाही. एकेकाळी सरासरी उत्पन्नामध्ये राज्यात पहिला क्रमांक मिळवणाऱ्या वाडा एसटी बस आगाराचे करोनाच्या संक्रमणात तब्बल पाच कोटी रुपयांनी उत्पन्न घटले आहे.

वाडा तालुका ग्रामीण, आदिवासी विभागात आहे. तालुक्यातील प्रत्येक खेडोपाडय़ात एसटीचे जाळे पसरले आहे. विशेषत: या भागात रेल्वेमार्ग नसल्याने वाडा येथून ठाणे, कल्याण, पालघर या शहरी भागांत जाण्यासाठी एसटी बस हाच एकमेव पर्याय आहे. प्रवाशांना सेवा देऊन वाडा आगाराने चांगले उत्पन्नही मिळविले आहे.

फक्त पन्नास बस आणि अवघे ३०० कर्मचारी यांच्या जोरावर दरमहा सरासरी सव्वा कोटी रुपयांचे उत्पन्न मिळविणाऱ्या वाडा एसटी आगाराने गेल्या चार महिन्यांत एकूण १० लाख रुपयांचेही उत्पन्न मिळवलेले नाही. वाडा आगाराच्या सध्या ९० टक्के प्रवासी सेवा बंद असल्याचा परिणाम वाडा बस स्थानकाजवळील छोटय़ा दुकानदारांवर झाला आहे. येथील अनेक व्यावसायिकांना व्यवसाय बंद करावे लागले आहेत.

करोनाच्या पाश्र्वभूमीवर पुकारलेल्या टाळेबंदीचा मोठा फटका वाडा एसटी आगाराला बसला आहे. दररोज ४३ वेळापत्रके (शेडय़ुल) निघणाऱ्या या आगारात सध्या दहा ते बारा वेळापत्रके सुरू आहेत. महिन्याला फक्त सात ते आठ लाख रुपयांचे उत्पन्न मिळवत आहेत.

वाडा आगारात एकूण २९३ कर्मचारी कार्यरत आहेत. सध्या करोनाच्या संक्रमणामुळे काम मिळत नसल्याने २२३ कर्मचारी घरी आहेत. सध्या संपूर्ण आगाराचा कारभार ७० कर्मचाऱ्यांवर सुरू आहे.

कर्मचाऱ्यांचे वेतन रखडले

करोना काळात एसटी महामंडळाला मोठा फटका बसल्याने कर्मचाऱ्यांना वेतनही वेळेवर मिळत नाही. कर्मचाऱ्यांना मे महिन्याचा केवळ अर्धा पगार देण्यात आला आहे. जून महिन्याचा पगार जुलै महिना संपत आला तरी देण्यात आलेला नाही.  करोनाच्या काळात जीव धोक्यात घालून काम करत असेल आणि वेळेवर पगार मिळत नसेल तर बाजारात बसून भाजी विकत बसलेले बरे, अशी संतप्त प्रतिक्रिया एका बसचालकाने दिली.

करोना या संसर्गजन्य आजाराच्या भीतीने प्रवासी बसमध्ये बसायला तयार नाहीत. त्यामुळे अधिक बसफेऱ्या सुरू करता येत नाहीत.

– मधुकर धांगडा, आगार व्यवस्थापक, वाडा बस आगार

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 24, 2020 2:44 am

Web Title: wada st depot got affected due to corona pandemic dd70
टॅग Coronavirus
Next Stories
1 सीमा भागातून गुटख्याची आवक सुरूच
2 व्यायामशाळा अस्थिपंजर अवस्थेत
3 ‘सुट्टी’वरील कैद्यांच्या गुन्हेगारी कारवाया
Just Now!
X