प्रत्येक सव्वा मिनिटांनी गाडी चालवण्याचा मुख्यमंत्र्यांचा आग्रह

मुंबई ते ठाण्यादरम्यानचा प्रवास अधिक जलद आणि सुखकर करण्यासाठी उभारण्यात येत असलेल्या वडाळा-घाटकोपर-मुलुंड-ठाणे या मेट्रो प्रकल्पातील मेट्रो अधिक वेगवान असेल, अशी चिन्हे आहेत. ३२ किलोमीटर अंतराच्या या मेट्रो मार्गावर २०३१ पर्यंत प्रति दिन सरासरी १२ लाख १३ हजार प्रवासी प्रवास करू शकतील, असा अंदाज बांधण्यात आला आहे. त्यानुसार सुरुवातीचा दैनंदिन प्रवास आणि गर्दीचा विचार करून प्रति तीन मिनिट ७५ सेकंदांनी एक गाडी स्थानकात पोहोचेल, अशा पद्धतीचे नियोजन करण्यात आले आहे. मात्र ठाण्याची मेट्रो यापेक्षा वेगात धावली पाहिजे, असा आग्रह खुद्द मुख्यमंत्री देवेंद्र  फडणवीस यांनी धरल्याने पहिल्या टप्प्यातच हे प्रमाण प्रति दोन मिनिटांपर्यंत आणण्याचे नियोजन महानगर विकास प्राधिकरणाने सुरू केले आहे.

गेल्या वर्षभरापासून मुंबई महानगर विकास प्राधिकरणामार्फत ठाणे मेट्रोच्या मूळ आराखडय़ावर काम सुरू होते. नुकत्याच झालेल्या एका बैठकीत मुख्यमंत्र्यांनी ३२ किमी अंतराच्या ३२ स्थानके असलेल्या वडाळा-घाटकोपर-मुलुंड-ठाणे-कासारवडवली या मेट्रो मार्गाची निविदा काढण्यास मंजुरी दिली. या प्रकल्पासाठी सद्य:स्थितीत १४ हजार ५७९ कोटी रुपयांचे अंदाजपत्रक तयार करण्यात आले असून निविदा प्रक्रिया वेगाने उरकून आगामी महापालिका निवडणुकीच्या तोंडावर या प्रकल्पाचे भूमीपूजन करण्याचे बेत आहेत.

इतर मेट्रो प्रकल्पांच्या तुलनेत ठाणे मेट्रोचा वेग अधिक असावा असा मुख्यमंत्र्यांचा आग्रह आहे. सद्य:स्थितीत मुंबईतील मार्गावर सुरू झालेल्या मेट्रो प्रकल्पात दर चार ते पाच मिनिटाला गाडी चालवली जात आहे. वडाळा-ठाणे प्रकल्पात तब्बल ३२ स्थानके असून येथील गर्दीचे प्रमाण मोठे असणार आहे.

मुंबई तसेच ठाण्याच्या उपनगरांना या प्रकल्पाद्वारे जोडले जाणार असल्याने या दोन्ही शहरांतील अंतर्गत वाहतुकीसाठीही मेट्रो मार्गाचा मोठा वापर होणार आहे. त्यामुळे या मार्गावर धावणारी मेट्रो किमान दोन मिनिटे

या वेगाने प्रवाशांना उपलब्ध व्हावी, असे स्पष्ट आदेश मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत.