१५ दिवसांपासून पाणी नसल्याने टँकरवर गुजराण; पिण्याच्या पाण्याचीही वानवा

ऋषीकेश मुळे, ठाणे</strong>

पाणीटंचाईची झळ जिल्ह्य़ातील गावपाडय़ांसह शहरातील उद्योगधंद्यांनाही बसू लागल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. वागळे औद्योगिक परिसरात विविध उद्योगधंद्यांना गेल्या १५ दिवसांपासून  नियमित आणि पुरेसा पाणीपुरवठा होत नसल्याने अनेक कारखान्यांमध्ये टँकर मागवून पाणी विकत घ्यावे लागत आहे. महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाने लागू केलेल्या पाणी कपातीचा फटका या उद्योगांना बसत असून ठाणे महापालिकेची वितरण व्यवस्थाही विस्कळीत झाल्याने अनेक कारखान्यांमध्ये पिण्याचे पाणीही विकत आणावे लागत आहे.

ठाणे जिल्ह्य़ाला पाणीपुरवठा करणाऱ्या आंध्र आणि बारवी धरणातील पाणीसाठय़ात १० टक्के तूट असली तरी गेल्या तीन महिन्यांपासून लागू असणारी प्रतिआठवडा ३० तासांची पाणीकपात ही यापुढेही कायम राहणार असल्याचे नुकतेच ठाणे लघुपाटबंधारे विभागाकडून सांगण्यात आले. ठाणे जिल्ह्य़ाला १५ जुलैपर्यंत पाणीपुरवठा होऊ शकेल इतका पाणीसाठा धरणांमध्ये असून पाणीपुरवठा समतोल राखण्याचा प्रयत्न लघुपाटबंधारे विभागाकडून होत असल्याचे लघुपाटबंधारे विभागाने जाहीर केले. असे असले तरी वागळे औद्योगिक वसाहतीतील अनेक उद्योगांना गेल्या १५ दिवसांपासून पाणीटंचाई सोसावी लागत आहे.

वागळे औद्योगिक वसाहत परिसरात एकूण सहाशे औद्योगिक भूखंड असून एक हजार एवढे लघु मध्यम स्वरूपाचे उद्योगधंदे या भागात कार्यरत आहेत. या परिसरात मोठय़ा प्रमाणावर माहिती तंत्रज्ञानाच्या बडय़ा कंपन्याही आहेत. दररोज हजारोंच्या संख्येने कामगार या ठिकाणी कामानिमित्त येत असतात. असे असताना गेल्या पंधरवडय़ापासून या ठिकाणी मोठी पाणीटंचाई निर्माण झाली असून त्याचे कारणही प्रशासकीय यंत्रणांकडून दिले जात नसल्यामुळे कारखानदारांमध्ये नाराजीचा सूर व्यक्त होत आहे. कामगारांना, कर्मचाऱ्यांना पिण्यासाठी तसेच इतर वापरासाठी पाणी, टँकर बोलावून विकत घ्यावे लागते. त्यामुळे रोजच्या आर्थिक गणितात लघु आणि मध्यम उद्योगचालकांना पाणी विकत घेण्यासाठी ४ ते ५ हजार रुपये खर्च करावे लागत असल्याचे सूत्रांकडून सांगण्यात आले आहे. वागळे परिसराला दररोज १० दशलक्ष लिटर पाण्याची आवश्यकता असते. मात्र हा पुरवठा सध्या कमी झाला असून लोकवसाहतींमध्ये पाणीटंचाई भासत असल्याचे स्थानिक रहिवाशांकडून सांगण्यात आले आहे.

पाणीपुरवठा सुरळीत होण्यास विलंब

सद्य:स्थिीत ठाणे शहरातील पाणीपुरवठा दर बुधवारी सकाळी नऊ ते गुरुवारी सकाळी नऊ वाजेपर्यंत बंद ठेवण्यात येत आहे. गुरुवार नंतर पाणीपुरवठा कमी दाबाने होत असून पाणी सुरळीत होण्यास शनिवार उजाडत असल्याचे स्थानिक नागरिकांकडून सांगण्यात येते. त्यामुळे पाणीपुरवठा नियोजित अवधीपेक्षा अधिक काळ कमी दाबाने होत असल्याने पाणी समस्या निर्माण झाल्याचे स्थानिक नागरिकांनी सांगितले.

वागळे भागात पाणी कमी आहे, याची येथील उद्योगांना जाणीव आहे. उन्हाळ्याच्या दिवसात येथील पाणीपुरवठा रोडावतो. प्रशासकीय यंत्रणांनी पाणी वितरणाचे योग्य नियोजन करण्याची आवश्यकता आहे.

-आर.डी.कोल्हटकर,ठाणे लघु उद्योजक संघटना (टिसा)

नियोजित पाणीकपात असल्यामुळे बुधवारी आणि गुरुवारी पाणीपुरवठा होत नाही. मात्र पाणीकपातीच्या दिवसानंतर इतर अन्य दिवस पाणीपुरवठा सुरळीत पद्धतीने वागळे भागात होत आहे.

– माधव जागडे, कार्यकारी अभियंता, ठाणे महापालिका वागळे पाणीपुरवठा विभाग