नीरज राऊत

अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानीच्या भरपाईपासून ९६८ शेतकरी वंचित

गेल्या वर्षी खरीप हंगामात झालेल्या अवकाळी पावसामुळे पालघर तालुक्यातील शेतीचे नुकसान झाल्याप्रकरणी तब्बल ९०० हून अधिक शेतकऱ्यांना आजपर्यंत भरपाई मिळालेली नाही. पंतप्रधान पीक विमा योजनेअंतर्गत विमा उतरवणाऱ्या २४४६ शेतकऱ्यांपैकी ९६८ शेतकरी अजूनही भरपाईच्या प्रतीक्षेत आहे. विशेष म्हणजे, आजूबाजूला शेत असलेल्या दोन शेतकऱ्यांपैकी एकाला विम्याची रक्कम देण्यात आली असताना दुसऱ्या शेतकऱ्याला मात्र भरपाईसाठी सरकार दरबारी खेटे घालावे लागत आहेत.

पालघर तालुक्यातील शेतकऱ्यांनी गतवर्षी कृषीकर्जाला संरक्षण म्हणून ठाणे जिल्हा बँकेकडून पंतप्रधान पीक विमा योजनेअंतर्गत विमा उतरवला होता. गेल्या वर्षी ४ ते ८ डिसेंबर या काळात अरबी समुद्रात आलेल्या ओखी चक्रीवादळाचा मोठा तडाखा जिल्ह्य़ातील विविध भागांना बसला. अवकाळी झालेल्या पावसामुळे शेतातील कापणी केलेले भातपीक सडून गेले, तसेच खळ्यात गोळा केलेले पीकही कुजून गेले. खरिपातील भाजीबागांचेही या वादळामुळे मोठे नुकसान झाले.

नुकसान झालेल्या शेतकऱ्यांनी पालघर तालुका कृषी विकास सहकारी खरेदी-विक्री संघ तसेच काटाळे सेवा सहकारी संस्थेला विमा कंपनीच्या नियमाप्रमाणे वादळानंतर ४८ तासांत पीक नुकसानाची माहिती कळवली. मात्र नुकसानीचे पंचनामे करण्याची प्रक्रिया विलंबाने करण्यात आली, असा शेतकऱ्यांचा आरोप आहे. पंचनाम्यानंतर २४४६ शेतकऱ्यांपैकी १४७८ शेतकऱ्यांनाच विम्याची रक्कम मंजूर करण्यात आली. मात्र शेतीचे नुकसान होऊनही ९६८ शेतकरी भरपाईच्या प्रतीक्षेत आहेत. या शेतकऱ्यांना भरपाई कधी मिळणार, याबाबत विमा कंपनीकडून कोणताही खुलासा करण्यात आलेला नाही. तसेच शेतकऱ्यांकरवी करण्यात आलेल्या पत्रव्यवहारालाही कोणतेही उत्तर देण्यात आलेले नाही.

बाधित शेतकऱ्यांनी काही दिवसांपूर्वीच पालघरचे जिल्हाधिकारी डॉ. प्रशांत नारनवरे यांची भेट घेऊन आपली कैफियत मांडली. त्यावेळी यासंदर्भात कृषी विभागाचे अधिकारी आणि विमा कंपनीच्या अधिकाऱ्यांसोबत पुढील आठवडय़ात संयुक्त बैठक बोलावून शेतकऱ्यांचे म्हणणे कंपनीपर्यंत पोहचविण्याचा प्रयत्न करू, असे आश्वासन जिल्हाधिकाऱ्यांनी दिले.

एकमेकांलगतच्या शेतांबाबत दुजाभाव

डिसेंबर महिन्यात ओखी चक्रीवादळामुळे अवघ्या पालघर जिल्ह्य़ात मुसळधार पाऊस पडला. खरीपाच्या शेतीचे मोठे नुकसान झाले, मात्र पंचनामे करणाऱ्या तसेच विमा भरपाई मंजुरी करणाऱ्या अधिकाऱ्यांनी  विमा भरपाई वाटपात भेदभाव केल्याचा आरोप होत आहे. शेजारी शेते असलेल्यांपैकी एकाला विमा भरपाई मंजूर करण्यात आली. त्याचवेळी दुसऱ्या शेतकऱ्याला अजूनही भरपाई मिळालेली नाही. या दुजाभावाबद्दल शेतकऱ्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. या दुजाभावमुळे पंतप्रधान पीक विमा योजनेवरील विश्वास उडाल्याची प्रतिक्रिया काही शेतकऱ्यांनी दिली.

पाण्याअभावी भातशेतीवर संकट

डहाणू : गेल्या दीड महिन्यापासून पावसाने दडी मारल्याने डहाणू आणि तलासरी तालुक्यांतील भातशेती करपण्याची चिन्हे निर्माण झाली आहेत. डहाणूच्या गंजाड, चारोटी येथे कूपनलिकेच्या पाण्यावर भातशेती पिकवण्याची वेळ शेतकऱ्यांवर ओढवली आहे. तर अनेक ठिकाणी शेतकरी जलवाहिनीद्वारे भातपीक जगवण्याचा प्रयत्न करत आहेत.

डहाणू तालुक्यातील जवळपास सर्वच भागांत भाताचे पीक प्रामुख्याने घेतले जाते. शेती हेच येथील ग्रामस्थांच्या उदरनिर्वाहाचे प्रमुख साधन आहे. यावर्षी जून, जुलै महिन्यांत पाऊस चांगला झाल्याने यंदा शेतकऱ्यांच्या आशा पल्लवित झाल्या होत्या. मात्र सप्टेंबर महिन्यापासून पावसाने पाठ फिरवल्याने उभे राहात असलेले भातपीक संकटात आले आहे. विहिरी, कूपनलिका, नदी-नाल्यातून पाणी आणून भातशेतीला पुरवण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली आहे.