कल्याण शहरामध्ये असणाऱ्या वालधुनी नदीचा गेल्या काही वर्षांपासून नालाच झाला आहे. रासायनिक कारखान्यांमधील रासायनिक द्रव्यांमुळे ही नदी विषारी बनली आहे. २६ जुलैच्या महापुराच्या घटनेच्या वेळी या नदीचा खरा प्रवाह नागरिकांसमोर आला आणि वालधुनीचा प्रश्न ऐरणीवर आला. राज्य शासनाने मुंबईच्या मिठी नदीच्या धर्तीवर वालधुनी नदी विकास प्राधिकरणाची स्थापना केली. महापालिकेने या उपक्रमांतर्गत ५१२ कोटी रुपये खर्चाचा विकासकामांचा अहवाल तयार केला होता. २००७ मध्ये तयार झालेल्या या अहवालावर गेल्या आठ वर्षांमध्ये कोणताच निर्णाय घेतला नसल्याने लालफितीमध्येच अडकून पडला आहे. औद्योगिक घाण पदार्थ, रासायनिक सांडपाणी, औद्योगिक आणि घरगुती सांडपाणी तसेच घनकचराही नदीच्या प्रवाहात मिळतो. ही नदी पुढे कल्याण खाडीला मिळत असून त्यामुळे खाडीचे प्रदूषणही दिवसेंदिवस वाढत आहे. जलचर प्राण्यांच्या प्रजननसाठी आवश्यक मूळ स्थानके त्यामुळे नाहीशी झाली आहेत. नदीपात्रामध्ये मोठय़ा प्रमाणात झोपडय़ा वाढल्याने पात्र अरुंद बनले आहे. संरक्षण भिंती नसल्याने आजूबाजूच्या परिसरातील घाण नदीत टाकली जाते. त्यामुळे नागरिकांच्या आरोग्याचाही प्रश्न गंभीर बनला आहे.