मुंब्रा दिशेकडील भिंत उभारण्याचे काम सुरू; आठ दिवसांत काम पूर्ण होण्याची शक्यता

बेकायदा झोपडय़ा आणि नजीकच्या वस्त्यांमधून फेकल्या जाणाऱ्या कचऱ्याच्या भारामुळे खचलेली पारसिक बोगद्यावरील भिंतीच्या उभारणीला अखेर महापालिकेला मुहूर्त गवसला. दोन वर्षांपूर्वी ही भिंत खचल्यानंतरही या ठिकाणी तातडीने उपाययोजना करण्यात आली नव्हती. त्यामुळे मध्य रेल्वेच्या प्रवाशांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला होता. या पाश्र्वभूमीवर महापालिका प्रशासनाने मुंब्रा दिशेकडील भिंतीच्या उभारणीचे काम सुरू केले असून ते आठ दिवसांत पूर्ण होईल, असा दावा करण्यात येत आहे.

मध्य रेल्वेच्या जलद मार्गासाठी असलेल्या पारसिक बोगद्याबाहेरील रेल्वेमार्ग अतिशय असुरक्षित बनला आहे. रेल्वेमार्ग आणि बोगद्याला खेटून अनेक बेकायदा झोपडय़ा उभ्या करण्यात आल्या आहेत. याकडे पालिकेने वर्षांनुवर्षे दुर्लक्ष केले. या वस्त्यांमधून रेल्वेरुळांवर तसेच बोगद्याच्या वरील भागांतील वस्त्यांमधून फेकण्यात येणारा कचरा काही टन वजनाचा असल्याची धक्कादायक माहिती मध्यंतरी उघड झाली होती. त्यातच दोन वर्षांपूर्वी ऐन पावसाळ्यात बोगद्यावरील संरक्षित भिंत खचली. त्या वेळी रेल्वे प्रशासनाने विशेष ‘ब्लॉक’ घेऊन खचलेल्या भिंतीचा उरलासुरला भागही पाडला. मात्र या ठिकाणी नवीन संरक्षक भिंत उभारणे आवश्यक असतानाही दोन वर्षांपासून पालिका प्रशासनाकडून याकडे गांभीर्याने पाहिले जात नव्हते. रेल्वे आणि महापालिका प्रशासनात समन्वयाच्या अभावामुळे हे काम सातत्याने लांबणीवर पडत होते. अखेर दोन वर्षांनंतर महानगरपालिकेला या संरक्षक भिंतीसाठी मुहूर्त मिळाल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.

पारसिक बोगद्याच्या मुंब्रा दिशेकडील अनधिकृत बांधकांवर पालिकेने कारवाई करत ही बांधकामे जमीनदोस्त केली. मात्र या बोगद्याच्या आसपास अजूनही मोठय़ा प्रमाणावर अनधिकृत बांधकामे आणि इमारती शिल्लक आहेत. कारवाई केलेल्या बांधकामांचा कचरादेखील अजूनही तेथेच पडून आहे. या सर्वाचा भार पेलणाऱ्या पारसिक बोगद्यावर काही अपघात घडल्यास हा सर्व भार मध्य रेल्वेच्या रुळांवर पडणार आहे. हे टाळण्यासाठी महापालिकेतर्फे संरक्षक भिंत बांधण्यात आली होती. मात्र पावसाळ्यात मुसळधार पावसामुळे या भागातील माती आणि परिसरातील कचरा या भिंतीवर कोसळला आणि ही भिंत खचली. त्यांनतर आता दोन वर्षांनी महापलिकेला या संरक्षक भिंतीच्या बांधकामासाठी अखेर मुहूर्त मिळाला आहे. या संरक्षक  भिंतीमुळे रेल्वेला काही काळासाठी दिलासा मिळेल अशी आशा मध्य रेल्वेच्या प्रवाशांमार्फत वर्तवली जात आहे.