दोन लहान मुले, दोन महिला जखमी

ठाणे येथील पोलीस परेड मैदानाच्या परिसरातील रस्त्यावर एका भटक्या कुत्र्याने चार जणांना चावा घेतल्याची घटना बुधवारी सकाळी घडली. जखमी झालेल्या चौघांमध्ये सव्वा वर्षांचा बालक, आठ वर्षांचा मुलगा आणि दोन महिलांचा समावेश आहे. या घटनेनंतर महापालिकेच्या आरोग्य विभागाच्या पथकाने त्या कुत्र्याचा शोध घेऊन त्याला पकडले. नागरिकांच्या मारहाणीत तो कुत्रा गंभीररित्या जखमी झाला आहे.

मेयेश माने (८), जया म्हस्कर (५३), पायल वाल्मिकी (२०) आणि रोहीत पवार (सव्वा वर्ष) अशी कुत्र्याच्या चाव्यामुळे जखमी झालेल्यांची नावे आहेत. त्यापैकी जया म्हस्कर या पोलिस दलात कार्यरत आहेत. ठाणे जिल्हा शासकीय रुग्णालयाजवलील पोलीस वसाहतीमध्ये राहणारा मेयेश माने हा बुधवारी सकाळी वडीलांसोबत सलूनमध्ये केस कापण्यासाठी गेला होता. तेथून तो वडीलांसोबत घरी परतत असताना पोलीस परेड मैदानाजवळील रस्त्यावर पाठीमागून आलेल्या एका भटक्या कुत्र्याने त्याच्या मांडीला चावा घेतला. त्यानंतर याच भागातून जात असलेल्या जया म्हस्कर आणि पायल वाल्मिकी या दोघींना चावा घेतला. हा प्रकार सुरु असतानाच त्याने आणखी एका महिलेला चावा घेण्याचा प्रयत्न केला असता, त्यामध्ये ती महिला घाबरून जमीनीवर पडली. त्याचवेळेस तिच्या हातात असलेल्या रोहीत याला कुत्र्याने चावा घेतला. या सर्वाना ठाणे जिल्हा शासकीय रुग्णालय आणि छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात उपचारासाठी नेण्यात आले होते. त्यापैकी पायल आणि रोहीत या दोघांना घरी सोडून देण्यात आले आहे तर मेयेश आणि जया या दोघांवर उपचार सुरु आहेत.