21 September 2018

News Flash

१० एकरचा हरितपट्टा धोक्यात

रेतीबंदर गणेशघाट भागातील कांदळवनाचा हरितपट्टा भूमाफियांनी बेकायदा चाळी बांधून नष्ट केला

डोंबिवली पश्चिमेतील रेतीबंदर गणेशघाट भागातील कांदळवनाचा हरितपट्टा भूमाफियांनी बेकायदा चाळी बांधून नष्ट केला.

डोंबिवलीलगतच्या कांदळवनांची सर्रास कत्तल; प्रभाग अधिकाऱ्यांचे सोयीस्कर दुर्लक्ष

HOT DEALS
  • Apple iPhone 6 32 GB Gold
    ₹ 25900 MRP ₹ 29500 -12%
    ₹4000 Cashback
  • Sony Xperia XA Dual 16 GB (White)
    ₹ 15940 MRP ₹ 18990 -16%
    ₹1594 Cashback

खाडीकिनारी भराव टाकून आणि बेकायदा चाळी उभारून डोंबिवली शहराचे निसर्गसौंदर्य व पर्यावरण धोक्यात आणणाऱ्या भूमाफियांनी डोंबिवली पश्चिमेकडील कांदळवनाच्या एकमेव हरितपट्टय़ावर कुऱ्हाड चालवण्यास सुरुवात केली आहे. महाराष्ट्रनगर आणि देवीचा पाडा येथील कांदळवने तोडून त्यावर दगड, मातीचा भराव टाकण्यात येत आहे. या कृत्याला कल्याण-डोंबिवली महापालिकेच्या ‘ह’ प्रभागाच्या अधिकाऱ्यांचे अभय मिळत असल्याचा स्थानिक रहिवाशांचा आरोप आहे.

डोंबिवली पश्चिमेतील रेतीबंदर गणेशघाट भागातील कांदळवनाचा हरितपट्टा भूमाफियांनी बेकायदा चाळी बांधून नष्ट केला. काहींनी कांदळवन नष्ट करून या भागात आपले मालकी हक्क प्रस्थापित केले आहेत. त्यामुळे पर्यावरणस्नेही रहिवाशांनी शतपावलीसाठी आपला मोर्चा महाराष्ट्रनगर, देवीचा पाडा (गणेश विसर्जन घाट) भागातील हिरव्यागार कांदळवनाच्या जंगलाकडे वळविला होता. मात्र, आता या परिसराकडे भूमाफियांची वक्रदृष्टी वळली आहे. गेल्या नऊ महिन्यांपासून या भागातील खारफुटी तोडण्याचे काम सुरू आहे. झाडे तोडल्यानंतर या ठिकाणी दगडमातीचा भराव टाकण्यात येत असून त्यावर चाळी उभारण्यात येत आहे.

या चाळींना पुराच्या पाण्याचा फटका बसू नये, यासाठी हा बंदोबस्त केला जात आहे. शहरातून नाल्याद्वारे वाहून जाणारे सांडपाणी कांदळवनाच्या भागातून जाते. त्या प्रवाहांचे मार्गही येत्या काळात माफियांकडून बांधकामांसाठी बंद किंवा अरुंद केले जाण्याची शक्यता आहे. एक तास मुसळधार पाऊस पडला तरी खाडीकिनाऱ्याचा दलदलीच्या भागात पूरसदृश परिस्थिती निर्माण होते. ही माहिती असूनही सामान्य रहिवाशांना बेकायदा चाळींमधील घरे पाच ते दहा लाख रुपयांना विकून त्यांची फसवणूक माफियांकडून करण्यात येत आहे. पालिकेच्या मुख्य जलवाहिन्यांवरून चोरीच्या नळजोडण्या घेऊन या भागांना पाणीपुरवठा केला जात आहे. गोपीनाथ चौक, सत्यवान चौक भागातील पालिकेच्या मुख्य जलवाहिन्यांवरून ही पाणी चोरी करण्यात येत आहे. पालिका अधिकाऱ्यांच्या संगनमताने हे सगळे बेकायदा व्यवहार सुरू असल्याने पालिका अधिकारी गुपचिळी धरून बसले असल्याचा आरोप होत आहे. दरम्यान, या संदर्भात प्रभाग अधिकारी अरुण वानखडे यांची प्रतिक्रिया जाणून घेण्यासाठी संपर्क साधला असता ते आयुक्तांच्या बैठकीत असल्याचे सांगण्यात आले.

महाराष्ट्रनगरमधील (प्रभाग क्र. ५१) राज्य शासनाच्या मालकीच्या १० एकर जमिनीवर कांदळवनाचे जंगल आहे. हे घनदाट जंगल भूमाफियांनी नष्ट करून तेथे मातीचे भराव टाकले आहेत. त्या ठिकाणी बेकायदा चाळी बांधण्याचे काम सुरू आहे. पालिका आयुक्त पी. वेलरासू, अतिरिक्त आयुक्त संजय घरत, ‘ह’ प्रभाग अधिकारी अरुण वानखडे यांना खारफुटीच्या ऱ्हासाची माहिती देण्यात आली आहे.

– वामन म्हात्रे, स्थानिक नगरसेवक, महाराष्ट्रनगर

कांदळवन संरक्षणाबाबत शासनाचे कठोर नियम आहेत. कांदळवन संवर्धनाबाबत कल्याण महसूल विभागाने डोंबिवली, दिवा खाडी परिसरात जनजागृतीचे फलक लावले आहेत. त्यामुळे कांदळवन नष्ट करून कोणीही तेथे बांधकाम करीत असेल तर ते खपवून घेतले जाणार नाही. डोंबिवली पश्चिमेत असा प्रकार सुरू असेल तर तातडीने त्याची पाहणी करून संबंधितांवर फौजदारी कारवाई केली येईल.

– प्रसाद उकार्डे, प्रांत अधिकारी, कल्याण

बेकायदा बांधकामांवर पालिकेकडून कारवाई सुरूच आहे. कांदळवन नष्ट करून तेथे कोणी बांधकाम करीत असेल तर प्रभाग अधिकाऱ्यांना तातडीने त्या कामाची पाहणी करून तेथे कारवाई करण्याचे आदेश देण्यात येतील.

-सुरेश पवार, उपायुक्त. कल्याण-डोंबिवली महापालिका 

First Published on November 14, 2017 2:02 am

Web Title: ward officers ignore mangrove cutting in dombivali