प्रभागातील बेकायदा बांधकामांची पाठराखण करीत असल्याचा ठपका ठेवत तीन प्रभाग क्षेत्र अधिकाऱ्यांना प्रशासनाने निलंबन कारवाईच्या नोटिसा बजावल्या आहेत. समाधानकारक खुलासे या अधिकाऱ्यांनी केले नाहीत तर त्यांना सेवेतून निलंबित केले जाईल, असा इशारा प्रशासनाने दिला आहे.  
डोंबिवलीतील दोन व कल्याणमधील एका प्रभाग क्षेत्र अधिकाऱ्याला या नोटिसा प्रशासनाने बजावल्या आहेत. डोंबिवली पूर्व भागातील आयरे, कोपर पूर्व रेल्वे स्थानक, भोपर भागात भूमाफियांकडून राजकीय आशीर्वादाने बेकायदा चाळी उभारल्या आहेत. या चाळींना महापालिकेच्या जलवाहिन्यांवरून चोरीच्या नळजोडण्या घेण्यात आल्या आहेत. प्रभाग क्षेत्र अधिकारी, प्रभाग सभापती, कर्मचारी, दलाल यांच्या संगनमताने ही बांधकामे उभी राहत असल्याच्या तक्रारी जागरूक नागरिकांनी प्रशासनाकडे केल्या आहेत. डोंबिवली पश्चिमेत कुंभारखाण पाडा, गरिबाचा पाडा, मोठागाव, रेतीबंदर खाडी किनारा, देवीचा पाडा भागात बेकायदा बांधकामे उभारण्यात आली आहेत. त्यांच्यावर प्रशासनाकडून कोणतीही आक्रमक कारवाई करण्यात आलेली नाही.