कल्याण-डोंबिवली महापालिकेच्या निवडणुकीबाबत उत्कंठा

कल्याण : कल्याण-डोंबिवली महापालिकेचा कार्यकाळ संपून तीन महिन्यांचा कालावधी लोटल्यानंतरही निवडणुकीसाठी आवश्यक प्रभाग आरक्षणाची प्रक्रिया अद्याप पूर्ण झालेली नाही. त्यामुळे शहरांतील राजकीय वर्तुळात संभ्रम निर्माण झाला आहे. नवी मुंबईसह राज्यातील महापालिका आणि नगरपालिकांच्या निवडणुका लवकरच जाहीर होतील, अशी शक्यता व्यक्त केली जात असताना कल्याण-डोंबिवलीत मात्र काहीच हालचाली झालेल्या नाहीत.

कल्याण डोंबिवली महापालिकेतील राजकीय राजवटीची मुदत ऑक्टोबर महिन्यात संपुष्टात आली. करोनामुळे नवी मुंबई, औरंगाबाद महापालिका तसेच अंबरनाथ व बदलापूर नगरपालिका निवडणुकाही लांबणीवर पडल्याने लवकरच या निवडणुकांच्या तारखा जाहीर होतील अशी अटकळ बांधली जात आहे. त्यामुळे या महापालिका आणि नगरपालिकांसह कल्याण डोंबिवली महापालिकेच्या निवडणुकाही जाहीर होतील का याविषयी राजकीय वर्तुळात कमालीची उत्सुकता आहे. राज्यातील सत्ताधारी महाविकास आघाडी तसेच विरोधी बाकांवरील भाजपकडून नवी मुंबई महापालिका निवडणुकांसाठी जोरदार मोर्चेबांधणी सुरू झाली आहे.   असे असताना कल्याण डोंबिवलीतील राजकीय मैदानात अजूनही निवडणुकीचे रंग भरलेले नाहीत. काही ठिकाणी क्रिकेटचे सामने, हळदीकुंकू समारंभासारखे कार्यक्रम सुरू असले तरी राजकीय वर्तुळात फारशा हालचाली नाहीत.

या पार्श्वभूमीवर मागील २० ते २५ वर्ष पालिकेत निवडून येणारी सर्व पक्षांतील दिग्गज नगरसेवक मंडळी आपल्या प्रभागाचे आरक्षण काय पडते याकडे डोळा लावून बसली आहेत. २७ गावांमध्ये १८ गावांची नगरपरिषद होणार तसेच ही गावे पुन्हा पालिकेत समाविष्ट होणार नाहीत, असे गृहीतक धरून पालिकेने निवडणूक आयोगाच्या आदेशाप्रमाणे १८ गाव वगळून मे-जूनपर्यंत प्रभाग रचना करून घेतली. कोणत्याही परिस्थितीत १८ गाव वगळून महापालिका निवडणूक होणे गरजेचे आहे हे लक्षात आल्याने शिवसेना नेत्यांच्या आग्रहामुळे कल्याण डोेंबिवली पालिका प्रशासन शासन, न्यायालयाचा कोणताही आदेश नसताना सर्वेच्च न्यायालयात उच्च न्यायालयाच्या निर्णयाला आव्हान देत याचिकाकर्ती झाली आहे. उच्च न्यायालयाने १८ गावे पालिकेत समाविष्ट करून घेण्याचा आदेश देताना शासन, निवडणूक आयोगाने जुन्या रचनेप्रमाणे पालिका निवडणूक घेण्याचे आदेश दिले आहेत. असे असताना कल्याण डोंबिवली पालिका प्रभागांची आरक्षण सोडत का घेत नाही हा सवाल अनुत्तरित आहे.

नवी मुंबईमुळे विलंब?

शिवसेनेने नवी मुंबई महापालिकेची निवडणूक प्रतिष्ठेची केल्याने कल्याण डोंबिवली आणि नवी मुंबईची निवडणूक एकाच वेळी होणे पक्षाच्या जिल्हा नेतृत्वाला सोयीचे नसल्याची चर्चा आहे. त्यामुळे १८ गावाच्या मुद्दयावरून ही निवडणूक पुढे गेल्यास दोन्ही शहरांकडे लक्ष देण्यास पुरेसा वेळ मिळेल असा मतप्रवाह शिवसेना नेत्यांमध्ये आहे. त्यादृष्टीने राज्य सरकारची आखणी सुरूअसून यामुळेच प्रभाग आरक्षण सोडतीदेखील पुढे ढकलल्या जात असल्याची चर्चा आहे.

आयोगाच्या आदेशाप्रमाणे प्रभाग रचना करण्यात आली आहे. जुन्या प्रभाग रचनेप्रमाणे निवडणुका घेण्याचे आदेश निवडणूक आयोगाने दिले आहेत. लवकरच प्रभागांचे आरक्षण सोडत काढण्यात येईल. आयोगाच्या आदेशाप्रमाणे निवडणुका पार पडतील. पालिका प्रशासन निवडणुकीसाठी सज्ज आहे.  – संजय जाधव,  सचिव, कडोंमपा

पालिका निवडणुकीचा विचार करून कार्यकत्र्यांच्या बैठका सुरू केल्या आहेत. निवडणुका कोणत्याही क्षणी जाहीर होऊ द्या शिवसेना त्यासाठी सज्ज आहे. प्रकरण न्यायप्रविष्ट असल्याने न्यायालयाच्या आदेशापुढे जाता येणार नाही. न्यायालय जो निर्णय देईल त्याप्रमाणे प्रशासन निवडणूक प्रक्रिया सुरू करील. – गोपाळ लांडगे, कल्याण जिल्हाप्रमुख, शिवसेना.’

पालिका निवडणूक लढविण्याची १०० टक्के तयारी भाजपने पूर्ण केली आहे. प्रभाग रचना, आरक्षण कसेही असो पक्षाने कोणत्या प्रभाग कोण उमेदवार असू शकतो याची चाचपणी केली आहे. यापुढेही ती कायम राहील. त्यामुळे न्यायालयाचा निकाल काही येवो भाजप निवडणुकीसाठी सज्ज आहे. – शशिकांत कांबळे, जिल्हाध्यक्ष, भाजप कल्याण जिल्हा.