News Flash

कल्याणची ‘कचराकोंडी’

कल्याण-डोंबिवली महापालिका हद्दीतील कचरा तळोजा येथील ‘मुंबई महानगर विकास प्राधिकरणा’ने उभारलेल्या सामाईक क्षेपणभूमीकडे नेला जावा,

| April 18, 2015 12:30 pm

कल्याण-डोंबिवली महापालिका हद्दीतील कचरा तळोजा येथील ‘मुंबई महानगर विकास प्राधिकरणा’ने उभारलेल्या सामाईक क्षेपणभूमीकडे नेला जावा, अशा स्वरूपाच्या सूचना राज्याच्या नगरविकास विभागाने महापालिका प्रशासनाला दिल्या आहेत. तळोजा येथील क्षेपणभूमीत महानगर विकास प्राधिकरणाने आखून दिलेला दर कल्याण महापालिकेला परवडणारा नाही. त्यामुळे कल्याण-डोंबिवली महापालिकेची कचराकोंडी झाली आहे.
कल्याण-डोंबिवली महापालिका हद्दीतील कचरा तळोजा येथील भरावभूमी प्रकल्पात शास्त्रोक्त पद्धतीने विल्हेवाट लावण्यासाठी येणारा खर्च महापालिकेला परवडणारा नाही. त्यामुळे महापालिकेने तळोजा प्रकल्पात सहभागी न होण्याचा निर्णय घेऊन उंबर्डे येथे घनकचरा प्रकल्प राबवण्याचा ठराव दीड वर्षांपूर्वी मंजूर केला होता. ठराव करून गप्प बसलेल्या महापालिकेला नगरविकास विभागाने नुकत्याच घनकचऱ्याची विल्हेवाट लावण्यासाठी तळोजा येथील प्रकल्पात सहभागी होण्यासाठी प्रस्ताव पाठवा, अशा सूचना दिल्या आहेत. तळोजा मान्य नसेल तर आपला प्रस्तावित प्रकल्प काय आहे, याची सविस्तर माहिती द्या, असे आदेशही नगरविकास विभागाने दिले. त्यामुळे नियोजनाच्या आघाडीवर मागास राहिलेल्या कल्याण-डोंबिवली महापालिकेची अवस्था ‘इकडे आड तिकडे विहीर’ अशी झाली आहे.
मुंबई महानगर प्रदेश प्राधिकरण क्षेत्रातील महापालिका हद्दीतील कचऱ्याची विल्हेवाट लावण्यासाठी तळोजा येथे सामाईक भरावभूमी प्रकल्प मागील पाच वर्षांपासून प्रस्तावित आहे. या प्रकल्पासाठी शासनाने २४१ हेक्टर जमीन संपादित केली आहे. राज्यात भाजप सरकार आरूढ होताच भरावभूमी प्रकल्पातील आघाडी सरकारमधील ठेकेदारीचे राजकारण मोडून काढून नव्याने निविदा प्रक्रिया करून हा प्रकल्प यशस्वी करण्यासाठी मुंबई महानगर विकास प्राधिकरणाकडून हालचाली सुरू झाल्या आहेत.

शिवसेनेचे आस्तेकदम
उंबर्डे येथील ३१ एकर जमीन पंधरा वर्षांपूर्वी महापालिकेने भूमिपूत्रांना जमिनीचा मोबदला देत ताब्यात घेतली. या प्रकल्पाच्या एका कोपऱ्यावर महापालिकेने जैववैद्यकीय कचऱ्याची विल्हेवाट लावण्याचा प्रकल्प तब्बल १५ वर्षे राबवला, तो नंतर बंद पडला. उंबर्डे, सापर्डे भागात शिवसेनेचे नगरसेवक आहेत. या नगरसेवकांनी उंबर्डे कचरा प्रकल्पाला कडाडून विरोध केला आहे. सेनेचा बालेकिल्ला असलेल्या या भागातील लोक नाराज होतील. म्हणून शिवसेनेने उंबर्डे प्रकल्पाबाबत आस्तेकदम भूमिका घेतली.

* तळोजा येथील भरावभूमी प्रकल्पात सहभागी होण्यासाठी महापालिकेला दररोजच्या कचरा उचलणे शुल्कासाठी दररोज टनामागे १०५७ रुपये मोजावे लागणार आहेत.
*या शुल्कापोटी दरवर्षी पालिकेला २५ कोटींचा खर्च
* प्रकल्पाच्या २५ वर्षांच्या काळात या शुल्कापोटी पालिकेच्या तिजोरीवर मोठा भार पडणार आहे.
* या खर्चात महापालिकेचा स्वतंत्र घनकचरा प्रकल्प आकाराला येईल, असे लोकप्रतिनिधींचे मत आहे.
* हे चढे दर कल्याण डोंबिवली महापालिकेला परवडणारे नाहीत, अशी ओरड करीत सर्वपक्षीय नगरसेवकांनी तळोजा प्रकल्पात सहभागी व्हायचे नाही, असा निर्णय घेतला आहे, तसेच उंबर्डे येथील जागेत क्षेपणभूमी प्रकल्प उभारण्याचा प्रस्ताव मंजूर केला आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 18, 2015 12:30 pm

Web Title: waste deadlock in kalyan
Next Stories
1 मनसे नगरसेवकाला शिवसेनेचा ‘बेकायदा’ आधार
2 भूतकाळाचे वर्तमान : ठाणेकरांच्या आरोग्याची किल्ली!
3 अभ्यास करू ‘टॅब’वर!
Just Now!
X