कचऱ्याला लागणाऱ्या आगीमुळे स्थानिकांच्या आरोग्याला धोका
वसई-विरार शहरांतील कचऱ्याची विल्हेवाट लावण्यासाठी महापालिकेने आरक्षित केलेल्या गोखिवरे येथील कचराभूमीवर लागणाऱ्या आगीच्या धुरामुळे स्थानिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. त्यामुळे स्थानिकांनी या ठिकाणी कचरा टाकू देण्यास विरोध दर्शवत आक्रमक भूमिका घेतली आहे. दुसरीकडे, पालिकेनेही स्थानिकांची मनधरणी चालवली असून येथे कचऱ्यापासून वीजनिर्मिती करण्याचा प्रकल्प सुरू करण्याचे आश्वासन दिले आहे.
वसई-विरार महापालिका शहराच्या हद्दीतून दररोज ६०० टन कचरा निघतो. या कचऱ्याची विल्हेवाट लावण्यासाठी पालिकेने गोखिवरे येथे सव्‍‌र्हे क्रमांक ३० अ, २१, ३२ या ठिकाणी १८ हेक्टर जागा आरक्षित केलेली होती. या कचराभूमीवरील घनकटरा प्रकल्प राबविण्यासाठी मे. हंजर बायोटेक एनर्जी या कंपनीला २९ वर्षांच्या करारावर ठेका दिला होता. परंतु २०१३ मध्ये त्याला आग लागली आणि प्रकल्प रद्द झाला. तेव्हापासून येथे साठणाऱ्या कचऱ्याचा त्रास स्थानिकांना होत आहे. दररोज सहाशे मेट्रीक टन कचरा या प्रमाणे दरमहिन्याला सुमारे अठरा हजार मेट्रीक टनापेक्षा अधिक कचरा जमा होतो. या कचऱ्याचे सपाटीकरण करण्यासाठी ४ कोटी रुपयांचा ठेका देण्यात आला होता. परंतु ठेकेदाराच्या हलगर्जीपणामुळे कचऱ्याचे सपाटीकरण योग्य पद्धतीने होत नाही. त्यामुळे गोखिवरा, भोयदापाडा येथील स्थानिक जनतेला त्रास होत आहे. गेल्या काही दिवसांपासून याठिकाणी कचऱ्याला आग लागण्याचे प्रमाण वाढल्याने त्यांच्या त्रासात भर पडली.
या पाश्र्वभूमीवर स्थानिकांनी कचराभूमीविरोधात आंदोलन छेडले आहे. कचऱ्याला आग लावण्याचे प्रकार थांबले नाही तर, या परिसरात एकही कचऱ्याची गाडी येऊ दिली जाणार नाही, असा इशारा शिवसेना नेते वसंत वैती यांनी दिला आहे. घटनेचे गांभीर्य ओळखून पालिका आयुक्त सतीश लोखंडे यांनीही तातडीने पावले उचलली असून आग लावण्याचे प्रकार रोखण्यासाठी याठिकाणी सुरक्षारक्षक तैनात करण्यात आले आहेत, तसेच आग विझवण्यासाठी येथे २४ तास अग्निशमन बंब ठेवण्यात आले आहत.
कचऱ्यापासून वीजनिर्मिती
कचराभूमीचा प्रश्न जटील असल्याचे आयुक्त लोखंडे यांनी सांगितले. मात्र, या कचऱ्यापासून वीजनिर्मिती करण्याचा प्रकल्प अंतिम टप्प्यात असून यासाठी परदेशी तंत्रज्ञानाचा विचार सुरू आहे. याकामी निरी, आयआयटी, बीएआरसी, पर्यावरण आदींची सहभाग असलेल्या समितीची मदत घेतली जात असल्याचेही ते म्हणाले.