प्रशासनाकडून साफसफाई नाही; दुर्गंधीने पर्यटक हैराण

विरारच्या अर्नाळा येथील समुद्रकिनाऱ्यावर कचऱ्याचे साम्राज्य पसरले आहे. समुद्रकिनाऱ्यावर पर्यटकांची संख्या वाढत असल्याने कचराही वाढत आहे. ग्रामपंचायत प्रशासनाकडून वेळोवेळी कचऱ्याची साफसफाई होत नसल्याने किनारा बकाल होऊ लागला आहे. समुद्रकिनारी फिरण्यासाठी येणाऱ्या पर्यटकांना आणि ग्रामस्थांना याचा त्रास होत असून दरुगधीने ते हैराण झालेले आहेत.

अर्नाळा समुद्रकिनारा ही पर्यटकांची आवडती जागा. अर्नाळा किल्ला, निसर्गरम्य सुरुची बाग, विविध रिसॉर्ट असल्याने वसई-विरारसह मुंबईतील हजारो पर्यटक येथे पर्यटनासाठी येतात. पर्यटकांची संख्या जसजसी वाढत आहे, तशी या किनाऱ्यावर दिवसेंदिवस कचऱ्याचे साम्राज्य पसरत चाललेले आहे. समुद्रच्या बाजूलाच कचराभूमी असल्यामुळे शहरातला जास्तीत जास्त कचरा इथे आणला जातो. हा कचरा वाऱ्याने उडून किनाऱ्यावर पसरत असतो. त्याची दुर्गंधीही पसरत असते.

विरारमधील मोठय़ा गणेशमूर्तीचे विसर्जन अर्नाळा येथील समुद्रात केले जाते. विसर्जनाच्या वेळी होणारा कचरा आता किनाऱ्यावर येऊ लागला आहे. पिंडदान विधीही या किनाऱ्यावर होत असल्याने तो कचरा किनाऱ्यावर साचत आहे. पर्यटकांकडून मोठय़ा प्रमाणावर कचरा टाकला जातो. त्यामुळे येथे अस्वच्छता ही मोठी समस्या बनलेली आहे.

ग्रामपंचायतीकडे असलेल्या अपुऱ्या साधनसामग्रीमुळे हा भलामोठा किनारा स्वच्छ करण्यात अपयशी ठरत आहे. विविध सामाजिक संघटना किनाऱ्यावर स्वच्छता मोहीम राबवत असतात.

दर रविवारी ग्रामस्थ एकत्र येऊन किनारा स्वच्छ करतात. त्यात शालेय विद्यार्थ्यांचाही समावेश असतो. लवकरच यासाठी आम्ही मोठी योजना तयार करणार आहोत. त्यासाठी यंत्रसामग्री मागवली जाणार आहे.

– हेमलता भेल्शी, सरपंच, अर्नाळा