इमारतीच्या आवारात कचरा जाळण्याचा प्रकार, आगीच्या झळा दुसऱ्या मजल्यापर्यंत

वसईतील एका इमारतीत कचरा जाळल्यामुळे लागलेल्या आगीत बाजूच्या नारळाच्या झाडाने पेट घेतल्याने आगीच्या झळा दुसऱ्या माळ्यापर्यंत पोहोचल्या होत्या. यामुळे कोणतीही जीवितहानी झाली नसली तरी इमारतीच्या बाजूला असलेल्या रोहित्रालाही आगीची झळ पोहोचण्याची शक्यता होती. पण अग्निशमन दलाने वेळीच हस्तक्षेप केल्याने पुढील अनर्थ टळला.

वसई पूर्वेच्या एव्हरशाइन नगरातील सत्यम शिवम नावाची इमारत आहे. या इमारतीतील रहिवासी कचऱ्याची विल्हेवाट लावण्यासाठी इमारतीच्या आवारातच हा कचरा पेटवतात. मंगळवारी दुपारी नेहमीप्रमाणे कचरा पेटवण्यात आला होता. आग लावली त्या आवारात नारळाची झाडे होती. आगीमुळे नारळाच्या झाडांनी पेट घेतला आणि आगीच्या ज्वाळा थेट दुसऱ्या मजल्यापर्यंत पोहोचल्या. आगीचे लोट पाहून इमारतीतील रहिवाशांचे धाबे दणाणले.

परिसरातील लोकही जमा झाले. तेथील रहिवाशांना हा नेहमीचा प्रकार वाटला होता; परंतु आगीच्या ज्वाळांच्या बाजूला महावितरणचे उच्च दाबाचे रोहित्र होते. आगीच्या ज्वाळा जर त्या रोहित्रापर्यंत पोहोचल्या असत्या तर मोठा अनर्थ घडला असता. आगीमुळे मोठा धूर तयार झाला होता. यामुळे रहिवासी काही काळ घाबरले होते. परंतु पुढील अनुचित प्रकार घडला नाही. आम्ही नेहमी अशा पद्धतीने कचरा पेटवतो असे इमारतीच्या सुरक्षारक्षकाने सांगितले. याबाबत इमारतीच्या पदाधिकाऱ्यांनी कुठल्याही प्रकारचे भाष्य करण्यास नकार दिला.

हा अत्यंत गंभीर प्रकार असून मुळात इमारतीच्या आवारात अशा आगी लावणे चुकीचे आहे. कचऱ्याची विल्हेवाट लावायची असेल तर महापालिकेचे सफाई कर्मचारी आहेत. कचऱ्यात अनेक ज्वलनशील पदार्थ असतात. त्यामुळे आग पसरू शकते. आम्ही या प्रकरणी तपास करून संबंधित इमारतीवर कारवाई करू.  – दिलीप पालव, अग्निशमन विभागप्रमुख, वसई विरार महापालिका