तुटलेल्या भिंतीकडे पालिकेचे दुर्लक्ष; वाढत्या प्रदुषणामुळे पर्यावरण प्रेमी नाराज

आधारवाडी कचराभूमी उल्हास खाडी किनारी आहे. कचराभूमीवरील पावसाचा निचरा खाडीत होऊ नये म्हणून खाडी किनारा भागात भिंत बांधण्यात आली आहे. मात्र, गेल्या काही वर्षांपासून या संरक्षक िभतीच्या देखभालीकडे फारसे लक्ष देण्यात आलेले नाही. त्यामुळे कचराभूमीवर सगळी घाण पावसाळ्यात खाडीत वाहून जाण्याची भीती व्यक्त केली जात असून सध्या घाणीचा निचरा खाडीतच होत असल्याने प्रदूषणाने टोक गाठल्याची भीती पर्यावरण प्रेमींमधून व्यक्त केली जात आहे.

कचराभूमीवरील घाण, कचरा खाडीत वाहून जात असल्याने खाडी भागातील माशांनी अन्यत्र स्थलांतर केले आहे. अनेक वेळा खाडीचे कचराभूमी परिसरातील पाणी काळेकुट्ट व दर्प आणणारे असते, असे येथील रहिवाशांनी सांगितले. आधारवाडी कचराभूमीवर कचऱ्याची शास्त्रोक्त विल्हेवाट लावण्याचे आश्वासन पालिकेने उच्च न्यायालयाला दिले आहे. कचराभूमीवर कचऱ्याची शास्त्रोक्त पद्धतीने विल्हेवाट लावली जाते, याचे सादरीकरण १५ जूनला महापालिकेला उच्च न्यायालयात करायचे आहे. शास्त्रोक्त पद्धतीने विल्हेवाट लावणारा कचरा ठेकेदार पालिकेकडे करार करण्यासाठी फिरकत नसल्याने प्रशासनाची कोंडी झाली आहे. त्यात कचराभूमीला भीषण आग लागल्याने आधारवाडी क्षेपणभूमी पुन्हा चर्चेचा विषय झाली आहे. महापालिका हद्दीतील ६५० टन कचरा दररोज आधारवाडी क्षेपणभूमीवर आणला जात आहे. या कचराभुमीची साठवण क्षमता संपली आहे. प्रदूषण नियंत्रण मंडळ, न्यायालयाला आर्जव करुन एक वर्ष या भूमीवर कचरा टाकण्याची मुभा महापालिकेने मिळवली आहे. उंबर्डे, बारावे, मांडा येथे कचराभूमी विकसित करायच्या आहेत. या कचराभूमी सुरू करण्यास स्थानिकांनी विरोध दर्शविला आहे. यामुळे पालिकेचा कचरा येत्या काळात आणखी पेट घेणार असल्याची चिन्हे आहेत.

डोंबिवली एमआयडीसीत स्फोट झाल्यानंतर अनेक कंपन्यांचा पडलेला जळीत मलबा आधारवाडी कचराभूमीवर टाकण्यात आला आहे. त्यामुळे आग लागल्याची चर्चा सुरू झाली होती. हा सगळा मलबा कचरा भूमीवर एका खड्डय़ात स्वतंत्र ठिकाणी टाकण्यात आला आहे. त्याचा आगीशी काहीही संबंध नाही. याशिवाय तुटलेली संरक्षक भिंत ही शाळेची असून त्यांनी दुरुस्त करून घ्यायची आहे.

  विलास जोशी, साहाय्य आरोग्य अधिकारी पालिका