वसई-विरार महापालिकेकडून ९०० खतनिर्मिती प्रकल्पांची उभारणी; गृहसंकुलांमध्ये कचऱ्यापासून खतनिर्मितीसाठी जनजागृती

कचऱ्यापासून खतनिर्मिती करण्यासाठी महापालिकेने ‘मिशन ९००’ ही विशेष मोहीम आखली असून या मोहिमेअंतर्गत या वर्षांअखेरीस शहरात ९०० ठिकाणी खतनिर्मिती प्रकल्प उभारले जाणार आहेत. त्यासाठी पालिकेच्या अधिकाऱ्यांकडून जनजागृती केली जाणार आहे. दरम्यान, ओला कचरा आणि सुका कचरा वेगळा न करणाऱ्या गृहसंकुलांना (सोसायटय़ांना) नोटिसा पाठवण्यास सुरुवात करण्यात आली आहे.

कचऱ्याची भीषण समस्या दूर करण्यासाठी राज्य शासनाने ओला कचरा आणि सुका कचरा वेगळा गोळा करून त्याची विल्हेवाट लावण्याचे आदेश दिले होते. ओल्या कचऱ्याची विल्हेवाट लावण्यासाठी त्यापासून खतनिर्मिती करण्याचे ठरवण्यात आले आहे. वसई-विरार शहरात दररोज ६२५ टन कचरा तयार होतो. त्यापैकी  ४३० टन ओला कचरा तर २०० टन हा सुका कचरा असतो. साडेतीनशेहून अधिक सदनिका असलेल्या गृहसंकुलांना ओल्या कचऱ्यापासून खतनिर्मिती करणे बंधनकारक करण्यात आले आहे. शहरात अधिकाअधिक संख्येने गृहसंस्थांनी खतनिर्मिती करावी यासाठी महापालिकेने आता ‘मिशन ९००’ ही मोहीम सुरू केली आहे. या मोहिमेअंतर्गत डिसेंबर २०१८ पर्यंत शहरातील नऊ प्रभागांत मिळून ९०० ठिकाणी खतनिर्मिती सुरू करण्यात येणार आहे. कचऱ्यापासून खतनिर्मिती करण्यासाठी नागरिकांमध्ये जनजागृती करण्यासाठी पालिकेने सुरुवात केली असून सर्वच्या सर्व स्वच्छता निरीक्षकांना या मोहिमेची जबाबदारी देण्यात येणार आहे.

सध्या विविध प्रभागांत १५ ठिकाणी तर महापालिकेच्या ६० उद्यानात ओल्या कचऱ्यापासून खतनिर्मिती केली जात आहे. महिला बचत गटामार्फत उद्यानात खतनिर्मिती करण्यात येत आहे. हे प्रमाण खूप कमी आहे. त्यामुळे शहरातील नऊ प्रभागांत मिळून खतनिर्मितीची योजना आखल्याची माहिती पालिका अधिकाऱ्यांनी दिली आहे. हे मिशन पूर्ण करण्याच्या दृष्टीने आम्ही काम करीत असल्याचे पालिका अधिकाऱ्यांनी सांगितले. दरम्यान, नायगावच्या प्रभाग समिती ‘आय’मधील फिरोज नगर गृहसंकुलात कचऱ्यापासून खतनिर्मितीचा प्रकल्प पुन्हा सुरू करण्यात आला आहे. काही तांत्रिक कारणांमुळे हा प्रकल्प बंद पडला होता. अखेर पालिका अधिकाऱ्यांनी या अडचणी सोडवल्या असून या गृहसंकुलाचा प्रकल्प आता पुन्हा सुरू होणार आहे. गृहसंस्थेने या कामासाठी दोन लाख रुपयेही खर्च केले होते.

गृहसंकुलांना नोटिसा

ओला आणि सुका कचरा वेगळा करण्यास गृहसंकुलांना बंधनकारक केले आहे. ओला आणि सुका कचरा वेगळा गोळा करता यावा यासाठी पालिकेने गृहसंकुलांना २८ हजार निळ्या आणि हिरव्या रंगाचे कचऱ्याचे डबे पुरवण्यात आले आहेत. मात्र तरीही जे गृहसंकुल कचऱ्याचे वर्गीकरण करीत नसतील त्यांच्यावर कायदेशीर कारवाई केली जाणार आहे. पालिकेने यासाठी असे वर्गीकरण न करणाऱ्या गृहसंकुलांना नोटिसा पाठवण्यास सुरुवात केली आहे. आतापर्यंत ९० गृहसंकुलांना अशा नोटिसा पाठवण्यात आल्याची माहिती महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी दिली.

‘मिशन ९००’ काय?

  • वसई-विरार शहरात पालिकेचे ९ प्रभाग आहेत. प्रत्येक प्रभागात १०० खतनिर्मिती प्रकल्प उभारण्याची पालिकेची योजना आहे.
  • कचऱ्यापासून खतनिर्मिती करण्यासाठी जनजागृती करण्यात येणार आहे.
  • पालिकेच्या स्वच्छता निरीक्षकांना जनजागृतीची जबाबदारी देण्यात येणार असून गृहसंकुलांमध्ये जाऊन ते जनजागृती करणार आहेत.
  • गृहसंकुलांना खतनिर्मितीसंदर्भात मार्गदर्शन करण्यासाठी चार तज्ज्ञांची नियुक्त करण्यात आली आहे.
  • खतनिर्मिती करणाऱ्या गृहसंकुलांना मालमत्ता करात पाच टक्के करसवलत देण्यात आली आहे.
  • तयार होणारे खत हे ‘राष्ट्रीय केमिकल फर्टिलायझर’ आणि ‘दीपक फर्टिलायझर’ या शासनाने नेमून दिलेल्या कंपनीकडून खरेदी केले जाणार आहे.
  • खतनिर्मिती करणाऱ्या गृहसंकुलांना खतावर १५०० रुपयांची सवलतही मिळणार आहे.