ठाणे, कळवा तसेच मुंब्रा या शहरांमधील नालेसफाईची कामे ९६ टक्के पूर्ण झाल्याचा दावा महापालिका प्रशासनाकडून करण्यात येत असला तरी ठेकेदारांनी मात्र नाल्यातील गाळ आणि कचऱ्याचे ढीग रस्त्याच्या कडेलाच रचून ठेवल्याने शहरात अस्वच्छता पसरली आहे. शहरातील अनेक भागांमध्ये रस्ता रुंदीकरणाची कामे सुरू असून ती वेळेत पूर्ण होतील का याविषयी संभ्रमाचे वातावरण आहे. अशा परिस्थितीत गटारातून काढण्यात आलेला गाळ सुकल्यानंतरही उचलला जात नसल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.
पावसाळ्यात शहरातील नाले तुंबून आपत्कालीन परिस्थिती निर्माण होऊ नये म्हणून ठाणे महापालिका प्रशासनाकडून दोन वेळा नालेसफाईची कामे करण्यात येतात. पावसाळ्यापूर्वी आणि पावसाळ्यानंतर अशी दोन वेळा नालेसफाई केली जाते. दरवर्षी ही कामे उशिरा सुरू होत असल्यामुळे पावसाळ्यापूर्वी पूर्ण होत नाहीत. त्यामुळे महापालिका प्रशासनावर टीकेचे आसूड ओढले जातात. आजवरचा हा अनुभव लक्षात घेऊन प्रशासनाने यंदा मात्र मे महिन्यात नालेसफाईची कामे हाती घेतली आहेत. तसेच ही कामे पावसाळ्यापूर्वी पूर्ण करण्यासाठी प्रशासनाने जास्त ठेकेदारांची नियुक्ती केली आहे. येत्या ७ जूनपर्यंत ही कामे पूर्ण करण्याचे आदेश महापालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले आहेत. त्यामुळे गेल्या काही दिवसांपासून शहरात नालेसफाईची कामे जोरात सुरू असल्याचे चित्र आहेत. आतापर्यंत नालेसफाईची कामे ९६ टक्के पूर्ण झाल्याचा दावा करत उर्वरित सफाईची कामे येत्या दोन दिवसांत उरकली जाणार असल्याचे प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.
सफाईच्या कामादरम्यान नाल्याच्या काठावर साचलेले कचरा आणि गाळाचे ढीग येत्या दोन दिवसांत उचलण्यात येतील, असे महापालिका प्रशासनाने स्पष्ट केले.

रोगराई व नाले तुंबण्याची भीती
एकीकडे शहरातील नालेसफाईची कामे पावसाळ्यापूर्वी उरकली जात असल्याचे चित्र असतानाच दुसरीकडे मात्र नाल्याच्या काठावर गाळ आणि कचऱ्याचे ढीग साचलेले आहेत. सफाईची कामे करताना ठेकेदारांनी नाल्यातून गाळ आणि कचरा बाहेर काढला आणि तो नाल्याच्या काठावरच फेकला. त्यामुळे नाल्यांच्या काठावर कचऱ्याचे भलेमोठे ढीग साचले असून त्यामुळे शहरात रोगराई पसरण्याची भीती व्यक्त होत आहे. त्याचबरोबर गेल्या काही दिवसांपासून वातावरणातील बदलांमुळे पाऊस पडण्याची चिन्हे आहेत. हा पाऊस झाला तर कचऱ्याचे ढीग पुन्हा नाल्यात वाहून जातील आणि नाले तुंबून शहरात आपत्कालीन परिस्थिती निर्माण होईल, अशीही भीती व्यक्त करण्यात येत आहे.