कचरा, रासायनिक सांडपाण्याची खाडीपात्रात विल्हेवाट

वसई : मुंबई-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर कोपर फाटा येथे तानसा खाडीच्या पात्रात रात्रीच्या सुमारास कचरा व दुर्गंधीयुक्त रासायनिक पाण्याची विल्हेवाट लावली जाते. यामुळे या पात्रातील पाणी प्रदूषित होऊन पात्रातील जैविविधतेला धोका निर्माण झाला आहे.  यामुळे  मासेमारी करणाऱ्या नागरिकांच्या रोजगारावर गदा आली असल्याचा आरोप स्थानिकांनी केला आहे.

वसई-विरार महापालिकेच्या हद्दीतील वसई पूर्वेतील भागातून राष्ट्रीय  महामार्ग गेला आहे. या महामार्गला जोडूनच कोपर फाटा येथे  तानसा खाडीचे पात्र  आहे . या भागातील कोपर गावाच्या भागात असलेल्या व तानसा खाडीला जाऊन मिळणाऱ्या या खाडी पात्रात पावसाळ्यात तुंगारेश्वर येथील जंगलातून पाणी येत असते, तर इतर वेळी समुद्राला येणाऱ्या भरतीचे पाणी खाडीद्वारे येत असल्याने या भागातील नागरिक वर्षभर  मासेमारी करून आपला उदरनिर्वाह करतात.

मात्र महामार्गावरील कोपर फाटा ते खराटतारा या भागात रात्रीच्या वेळी अंधाराचा फायदा घेऊन तानसा खाडीच्या पात्रात व महामार्गाच्या कडेला रासायनिक कचऱ्यासह इतर टाकाऊ वस्तू फेकून दिल्या जात असल्याने पात्रातील पाणी दूषित होऊन त्या पाण्याला उग्र वास येत येतो, असे येथील नागरिकांनी सांगितले. त्यामुळे पाण्यातील मासेही मृत होऊ लागले असून हळूहळू माशांच्या प्रजातींची संख्या कमी झाल्याने या पात्रात मासेमारी करणाऱ्या स्थानिक नागरिकांच्या रोजगारावर याचा परिणाम झाला आहे. शेतीलाही याचा फटका बसला आहे.

दुसरीकडे कचरा महामार्गाच्या कडेला ही टाकून दिला जात असून कधी कधी कचऱ्याला आग लावण्याचे प्रकारही घडत आहे. यामुळे आजूबाजूच्या परिसरातील वातावरण प्रदूषित होऊन येथील नागरिकांना याचा त्रास सहन करावा लागत आहे. येथील प्रदूषण रोखण्यासाठी  संबंधित विभागाने सदर भागात रात्रीच्या वेळी पहारा ठेवून रसायन व कचरा फेकणाऱ्या वाहनचालकांवर कठोर कारवाई करण्याची मागणी येथील नागरिकांनी केली आहे.

ज्या भागात कचरा टाकला व रसायनयुक्त पाणी सोडले जात आहे , तिथे पाहणी करावी लागेल. याबाबतची माहिती  प्रदूषण नियंत्रण मंडळ,  पाटबंधारे विभाग यांना देऊन याबाबत कारवाई करण्यासाठीची पावले उचलली जातील.

– वसंत मुकणे , स्वच्छता आयुक्त महापालिका

या ठिकाणी पाणी कोणत्या ठिकाणाहून सोडले जाते हे पाहावे लागेल. प्रदूषणाशी निगडित असेल तर त्यावर कारवाई केली जाईल. तसेच जर थेट नदीपात्रात कचरा किंवा पाणी सोडले जात असेल त्यावर पाटबंधारे विभागाला कारवाईचे अधिकार आहेत.

– अमर दुर्गुले, प्रदूषण नियंत्रण मंडळ अधिकारी, पालघर