खेमाणी सांडपाणी प्रक्रिया केंद्राकडे वळवण्याची मागणी

उल्हास नदीला मिळणाऱ्या खेमाणी नाल्यावरील प्रक्रिया केंद्राचे काम पूर्णत्वास येत असताना या केंद्रापासून काही अंतरावर आणखी एक नाला नदीला मिळत असल्याचे स्पष्ट झाले आहे. म्हारळ ग्रामपंचायत भागातील सांडपाणी घेऊ न येणाऱ्या या नाल्यामुळे नदीचे प्रदूषण कायम राहण्याची शक्यता असल्यामुळे हा नालाही या केंद्राकडे वळवावा अशी मागणी होऊ लागली आहे.

उल्हास नदीच्या प्रदूषणाचा विषय गाजत असताना उल्हासनगर शहरात तीन ठिकाणी सांडपाणी प्रक्रिया केंद्रांचे काम प्रगतिपथावर आहे. या नदीच्या प्रदूषणावरून राष्ट्रीय हरित लवाद आणि सर्वोच्च न्यायालयाने उल्हासनगर महापालिकेला फटकारल्यानंतरही पालिकेच्या वतीने सांडपाण्यावर योग्य प्रक्रिया केली जात नसल्याचे ‘वनशक्ती संघटने’ने सर्वोच्च न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिले होते. उल्हास नदीला थेट मिळणाऱ्या खेमाणी नाल्याचा विषयही गाजला होता. अखेर या नाल्यातील सांडपाण्यावर प्रक्रिया करण्यासाठी ३५ कोटी रुपये खर्च करून सांडपाणी प्रक्रिया केंद्र उभारण्यात आले आहे. त्यामुळे येथील सांडपाण्यावर आता प्रक्रिया होऊ लागली आहे.

या नाल्यापासून काही अंतरावर उल्हासनगर महापालिका आणि म्हारळ ग्रामपंचायत क्षेत्राला लागून आणखी एक नाला उल्हास नदीला मिळतो. म्हारळ ग्रामपंचायत क्षेत्रातून हा नाला घरगुती आणि इतर सांडपाणी वाहून आणतो. म्हारळ ग्रामपंचायत आता शहराकडे वाटचाल करत आहे. गेल्या काही वर्षांत येथील लोकसंख्याही मोठय़ा प्रमाणावर वाढली आहे.

ग्रामपंचायत असल्याने येथे सांडपाण्यावर प्रक्रिया करण्यासाठी यंत्रणा नाही. एकीकडे खेमाणी नाल्यावरून वाद होत असताना अशा नाल्याकडे दुर्लक्ष केले जाऊ  शकत नाही, असे पर्यावरणप्रेमींचे म्हणणे आहे. त्यामुळे खेमाणी नाल्याप्रमाणे या नाल्याच्या सांडपाण्यावरही प्रक्रिया करावी अशी मागणी होते आहे.

या भागात अनेक मोठय़ा गृहप्रकल्पांचे काम सुरू आहे. शेकडो सदनिका तयार होत आहेत. भविष्यात त्यांचेही सांडपाणी यात मिसळले जाईल. त्यामुळे हा नाला नव्या सांडपाणी प्रक्रिया केंद्रात वळवावा, अशी मागणी आता होते आहे. स्थानिक खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी नाल्याची पाहणी केली, त्यावेळी उल्हासनगर महापालिकेचे आयुक्त अच्युत हांगे उपस्थित होते. यावर लवकरच तोडगा काढला जाईल, असे आश्वासन त्यांनी दिले.

पर्यावरणाच्या दृष्टीने महत्त्वाचे

उल्हास नदीला खेमाणी नाला मिळतो त्या भागात सेंच्युरी रेयॉन कंपनी, महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ, स्टेम आणि कल्याण पालिकेचे पंपिंग स्टेशन आहे. येथून जवळपास ५० लाख नागरिकांसाठी पाण्याची उचल केली जाते. त्यावर प्रक्रिया करून ते पुढे पाठवले जाते. त्यामुळे या भागाला पर्यावरणाच्या दृष्टीने मोठे महत्त्व आहे.