23 September 2020

News Flash

गळतीमुळे २० टक्के पाणी वाया?

खापरीक्षणाचा अहवाल प्राप्त झाल्यानंतर पाणीगळती कमी करण्याचे प्रयत्न प्रशासनाकडून करण्यात येणार आहेत.

(संग्रहित छायाचित्र)

पाणीपुरवठा विभागाचे लेखापरीक्षण सुरू

मीरा-भाईंदर शहराला दररोज होणाऱ्या पाणीपुरवठय़ापैकी तब्बल २० टक्के पाणी गळतीमुळे वाया जात असल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. नागरिकांना मिळणारे पाणी आधीच कमी असताना गळतीमुळे मोठय़ा प्रमाणात पाणी वाया जात असल्याने पाणीपुरवठय़ाचे सध्या लेखापरीक्षण सुरू करण्यात आले आहे. या लेखापरीक्षणाचा अहवाल प्राप्त झाल्यानंतर पाणीगळती कमी करण्याचे प्रयत्न प्रशासनाकडून करण्यात येणार आहेत.

स्टेम प्राधिकरण आणि महाराष्ट्र औद्यागिक विकास महामंडळ (एमआयडीसी) यांच्याकडून मीरा-भाईंदरला दररोज १८५ दशलक्ष लिटर पाणीपुरवठा होतो. दुरुस्तीची कामे, शटडाऊनमुळे पाणीपुरवठय़ाचे प्रमाण मागे-पुढे होत असते. मात्र पाणीपुरवठय़ादरम्यान होत असलेल्या गळतीचाही मोठा फटका बसत असल्याने मिळणाऱ्या पाण्यात घट सोसावी लागत आहे. ही गळती सुमारे २० टक्क्यांच्या आसपास आहे, असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. परिणामी, मिळणारे पाणी नागरिकांपर्यंत पोहोचेपर्यंत यातील ३५ ते ३६ दशलक्ष लिटर वाया जात आहे.

स्टेम प्राधिकरणाकडून मिळणारे पाणी महापालिका शहाड टेमघर येथून उचलते आणि एमआयडीसीकडून मिळणारे पाणी शीळफाटय़ाहून घ्यावे लागते. या दोन्ही पाण्यासाठी महापालिकेने सुमारे ८० किमी लांबीच्या जलवाहिन्या अंथरल्या आहेत. त्यामुळे या अंतरादरम्यान गळती होण्याची शक्यता अधिक असते, तसेच शहरात आलेले पाणी साठवून ठेवण्यासाठी बांधलेल्या टाक्या, पाणीपुरवठय़ाची अंतर्गत वितरण व्यवस्था, वितरणासाठी तयार करण्यात आलेले झोन, या प्रत्येक झोनला पाणी देण्यासाठी बसवण्यात आलेले व्हाल्व, इमारतींना देण्यात आलेल्या नळजोडण्या या प्रत्येक टप्प्यावर पाण्याची गळती होण्याच्या शक्यता अधिक असतात.

मीरा-भाईंदरची ७५ दशलक्ष लिटर पाणी योजना कार्यान्वित झाल्यानंतर नागरिकांना सध्या दर ३० तासांनी पाणीपुरवठा होत असला तरी वाढत्या लोकसंख्येच्या तुलनेत काही दिवसांनी हे पाणी कमी पडणार आहे. सूर्या धरण पाणीयोजना पूर्ण व्हायला अद्याप बराच अवधी आहे. त्यामुळे होणारी पाण्याची गळती शक्य तितकी कमी करणे आवश्यक आहे. गेल्या अनेक वर्षांत पाणीपुरवठय़ाचे लेखापरीक्षण करण्यात आलेले नाही. यंदा मात्र महापालिकेने लेखापरीक्षण करण्याचा निर्णय घेतला आहे.

पाणीगळती होण्याची शक्यता असलेली सर्व ठिकाणे लेखापरीक्षणाच्या माध्यमातून तपासण्याचे काम सुरू करण्यात आले आहे. या लेखापरीक्षणाचा अहवाल काही दिवसांतच महापालिकेला प्राप्त होणार असून त्यानंतरच गळतीचे प्रमाण नेमके किती आहे हे नक्की होणार आहे.

– शिवाजी बारकुंड, शहर अभियंता

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 28, 2018 2:31 am

Web Title: wasted 20 percent water due to leakage
Next Stories
1 तुळिंज पोलिसांच्या सापळय़ामुळे बलात्कारी गजाआड
2 विरार गृहप्रकल्प घोटाळय़ातील मुख्य आरोपीला अटक
3 बांगलादेशी घुसखोरांविरोधात मोहीम
Just Now!
X