अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या प्रवेशापूर्वी ओळख पडताळणी; विद्युत, अग्निशमन यंत्रणेची काटेकोर तपासणी

ठाणे : ठाणे महापालिका शहर विकास विभागावरही अनेक गैरव्यवहारांच्या आरोपांमुळे आगीचे सावट असल्याची भीती भाजप नगरसेवक नारायण पवार यांनी दोन दिवसांपूर्वीच व्यक्त केली असतानाच, त्याची गंभीर दखल घेऊन महापालिका प्रशासनाने आता मुख्यालय इमारतीमधील शहर विकास विभागाच्या कार्यालयातील विद्युत आणि अग्निशमन यंत्रणा तपासणी करण्याचा निर्णय घेतला आहे. याशिवाय, कार्यालयाबाहेर चोख बंदोबस्त ठेवण्याबरोबरच सुट्टीच्या दिवशी मुख्यालय इमारतीमध्ये महापालिका अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची ओळख पटविल्यानंतरच त्यांना प्रवेश देण्याचेही लेखी आदेश प्रशासनाने काढले आहेत. त्यामुळे या कार्यालयावर आता जागता पहारा राहणार असल्याचे चित्र आहे.

काही वर्षांपूर्वी मंत्रालयाला आणि त्यानंतर मुंबईच्या जीएसटी भवनाला आग लागली होती. या आगीबाबत संशय व्यक्त करत चौकशी करण्याची मागणी झाली होती. त्याचप्रमाणे ठाणे महापालिकेच्या शहर विकास विभागावरही अनेक गैरव्यवहारांच्या आरोपांमुळे आगीचे सावट असल्याची भीती भाजप नगरसेवक नारायण पवार यांनी दोन दिवसांपूर्वीच व्यक्त केली होती. या संदर्भात त्यांनी महापालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांना लेखी पत्र पाठविले होते. त्यामध्ये गेल्या काही वर्षांत महापालिका शहर विकास विभागाने हजारो इमारतींचे प्रस्ताव मंजूर केले असून त्यानुसार बांधकाम व्यवासायिकांना बांधकाम प्रमाणपत्र, रहिवास प्रमाणपत्र आणि टीडीआर देण्यात आले आहेत. ही सर्व कागदपत्रे कार्यालयामध्ये ठेवण्यात आली आहेत. त्यातील काही वादग्रस्त प्रस्तावांबाबत शासनाकडे तक्रारी दाखल आहेत. काही प्रस्तावांसदर्भात उच्च न्यायालयामध्ये जनहित याचिका दाखल आहेत.

महापालिकेकडून स्मार्ट सिटी प्रकल्पात डीजी ठाणेचा गवगवा करण्यात येतो. मात्र, शहर विकास विभागातील सर्व व्यवहार डिजिटल करण्यात आलेले नाहीत, असा आरोप पवार यांनी केला होता. तसेच शहर विकास विभागाचे आगीपासून संरक्षण करण्यासाठी लवकरात लवकर उपाययोजना करण्याची मागणी केली होती. या पत्राची गंभीर दखल घेऊन महापालिका सचिव अशोक बुरपुल्ले यांनी सुरक्षा विभाग, अग्निशमन विभाग आणि विद्युत विभागाला लेखी पत्राद्वारे महत्त्वाच्या सूचना केल्या आहेत. मुख्यालय इमारतीमधील सर्वच अग्निशमन उपकरणांची तपासणी करण्यात यावी आणि ती योग्य प्रकारे कार्यान्वित आहे का, याची खात्री करावी. तसेच अग्निशमनविषयक काही कामे करणे आवश्यक असेल तर ती तातडीने पूर्ण करण्यात यावी. त्याचप्रमाणे विद्युत विभागाने इमारतीमधील विद्युत कामांची पाहाणी करावी, अशा सूचना सचिव बुरपुल्ले यांनी दिल्या आहेत. याशिवाय, कार्यालयाबाहेर चोख बंदोबस्त ठेवण्याबरोबरच सुट्टीच्या दिवशी मुख्यालय इमारतीमध्ये महापालिका अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची ओळख पटविल्यानंतरच त्यांना प्रवेश देण्याचेही लेखी आदेशही त्यांनी दिले आहेत.