ठाणे महापालिकेचे प्रस्ताव येत्या सर्वसाधारण सभेत; शिवसेनेसह राष्ट्रवादीचा विरोध

ठाणे : ठाणे महापालिका क्षेत्रातील घरगुती तसेच व्यावसायिक पाणी वापराच्या दरात ४० ते ५० टक्क्य़ांनी तर ठाणे परिवहन उपक्रमातील बसगाडय़ांच्या तिकीट दरात २० टक्क्य़ांनी वाढ करण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे. यासंबंधीचे दोन्ही प्रस्ताव प्रशासनाने येत्या २० फेब्रुवारी रोजी होणाऱ्या सर्वसाधारण सभेपुढे अंतिम मान्यतेसाठी सादर केले आहेत. मात्र, सत्ताधारी शिवसेनेसह विरोधी पक्षातील राष्ट्रवादी काँग्रेसनेही या प्रस्तावांना विरोध दर्शविला आहे.

ठाणे महापालिका क्षेत्राची लोकसंख्या २४ लाखांच्या घरात गेली असून महापालिकेकडून शहरात दररोज ४८५ दशलक्ष लिटर इतका पाणीपुरवठा करण्यात येतो. त्यात २० टक्के पाणीगळती होत असल्याने शहरात प्रत्यक्षात ३८४ दशलक्ष लिटर इतका पाणीपुरवठा होतो. शहरातील घरगुती तसेच व्यावसायिक पाणी वापराच्या दरात ४० ते ५० टक्क्य़ांनी वाढ करण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे.

त्याचप्रमाणे ठाणे परिवहन उपक्रमाच्या बसगाडय़ांच्या तिकीट दरात २० टक्क्य़ांनी वाढ करण्यात येणार असून यामुळे सर्वसाधारण बसगाडय़ांसाठी किमान २ रुपये ते कमाल १२ रुपयांपर्यंतची भाडेवाढ सुचविण्यात आली आहे. त्यामुळे ठाणेकरांवर दुहेरी कर वाढीचा बोजा पडण्याची चिन्हे आहेत.

पाणी दरवाढीचा प्रस्ताव

  •  झोपडपट्टी आणि चाळींना यापूर्वी पाणी वापरासाठी प्रतिमहा १३० रुपये आकारले जात होते. महापालिकेने प्रस्तावित केलेल्या नव्या दरानुसार त्यांना २०० रुपये आकारले जाणार आहेत.
  •  गृहसंकुलातील सदनिकांना घराच्या आकारमानानुसार पैसे आकारले जात आहेत.महापालिकेने प्रस्तावित केलेल्या नव्या दरानुसार २५० ते ५०० चौरस फूट आकाराच्या सदनिकांना महिन्याला ३१५ रुपये, ५०० ते ७५० चौरस फुटाच्या सदनिकांना ३४५ रुपये, ७५० ते १००० चौरस फुटाच्या सदनिकांना ३९० रुपये, तर त्यापेक्षा अधिक आकाराच्या सदनिकांना त्यापेक्षा अधिक  दर भरावे लागणार आहेत.

महापालिका प्रशासन विविध प्रस्ताव सादर करण्याचे काम करीत असते. मात्र, या प्रस्तावांवर सर्वसाधारण सभेत काय भूमिका घ्यायची, हा निर्णय आमचा असतो. त्यामुळे पाणी दरात आणि बसच्या तिकीट दरात प्रशासनाने भाडे वाढ प्रस्तावित केली असली तरी ठाणेकरांवर अन्यायकारक करवाढ लादली जाणार नाही.  -नरेश म्हस्के, महापौर, ठाणे

ठाणे शहरात आजही सुरळीतपणे पाणीपुरवठा होत नसतानाही ठाणेकरांवर पाणी दरवाढ लादणे, हे योग्य नाही. त्यामुळे या दरवाढीस आमचा विरोध आहे. तसेच बेस्ट उपक्रमाने तिकीट दरात कपात केली आहे. त्यामुळे टीएमटी बस तिकीट दरात वाढ केली तर ठाणेकरांवर अन्याय होईल.  -प्रमिला केणी, विरोधी पक्षनेत्या, ठाणे