तक्रारी नोंदविण्याची नागरिकांना संधी
बदलापूर आणि अंबरनाथ शहरातील दिवसेंदिवस वाढत्या नागरीकरणामुळे ऐरणीवर आलेल्या पाणीप्रश्नावरील उपाययोजनांची चर्चा करण्यासाठी बदलापूर येथे २८ फेब्रुवारी रोजी पाणी परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. पाणीपुरवठा व जलनिस्सारण प्रकल्पाचे मंत्रालयातील भूजलतज्ज्ञ डॉ. सतीश उमरीकर हे या परिषदेला प्रमुख वक्ते म्हणून उपस्थित रहणार आहेत. कुळगाव-बदलापूर इंजिनीयर्स वेल्फेअर असोसिएशन, बदलापूर शहर पत्रकार संघ व प्रेस क्लब ऑफ बदलापूरच्या संयुक्त विद्यमाने या पाणी परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. बदलापूर पूर्वेकडील कात्रप येथील बदलापूर पालिकेच्या सभागृहात रविवारी सकाळी १० वाजता परिषद आयोजित करण्यात आली आहे.
सध्या बदलापुरातील पाणी प्रश्न गंभीर होत चालला आहे. पाणीकपातीमुळे शहरात आठवडय़ातून एकदा २४ तास पाणीपुरवठा बंद असतो. तसेच इतर वेळीही कमी दाबाने पाणीपुरवठा होत असल्याने नागरिकांमध्ये असंतोषाचे वातावरण आहे. फेब्रुवारी महिन्यात ही अवस्था असल्याने पुढच्या काळात काय परिस्थिती असेल, याची चिंता आता नागरिकांसह सर्व लोकप्रतिनिधींनाही लागली आहे. त्यामुळे या पाणी परिषदेला सर्वपक्षीय नेते एकाच व्यासपीठावर येणार आहेत.
या पाणी परिषदेच्या निमित्ताने नागरिकांना त्यांच्या भागातील पाण्याच्या समस्या लेखी स्वरूपात मांडण्याची संधी मिळणार आहे. त्यासाठी त्यांनी आपल्या समस्या कार्यक्रमस्थळी दोन प्रतीत आणण्याचे आवाहन आयोजकांकडून करण्यात आले आहे. त्याचप्रमाणे पाणी बचतीचे संदेश देणारे घोषवाक्य आणि पाणी टंचाईवर मात करणाऱ्या उपाययोजनांच्या निबंध स्पर्धेचेही आयोजन करण्यात आले आहे. विजेत्यांनो पारितोषिक मिळणार आहे.