कंपन्यांच्या ‘सामाजिक बांधिलकी’तून ५८ कामे सुरू; बंधारे दुरुस्तीतून २४ हजार घनमीटर गाळउपसा

पश्चिम महाराष्ट्र, विदर्भ आणि मराठवाडय़ात पाणी फाऊंडेशन, नाम आदी स्वयंसेवी संस्थांच्या माध्यमातून जोरदारपणे राबविण्यात येत असलेल्या जलसंधारण कामांच्या चळवळीचे लोण ठाणे जिल्ह्य़ाच्या ग्रामीण भागातही पोहोचले असून त्यांना कॉर्पोरेट विश्वाने मदतीचा हात दिला आहे. ठाणे जिल्ह्य़ातील पाच तालुक्यात सध्या विविध कंपन्यांच्या सामाजिक उत्तरदायित्व योजनेतून (सीएसआर) नदी खोलीकरण, गाव तलाव जीर्णोद्धार, बंधारे दुरुस्ती आदी तब्बल ५८ कामे सुरू असून त्याद्वारे आतापर्यंत २४ हजार घनमीटर गाळ काढण्यात आला आहे. जिल्हा प्रशासन आणि काही स्वयंसेवी संस्थांचे प्रतिनिधी या कामांवर देखरेख करीत असून पावसाळ्यापूर्वी सर्व कामे पूर्ण करण्यात येणार आहेत.

जिंदाल स्टील वर्क्‍स या कंपनीने शहापूर तालुक्यातील ठक्करपाडा, कसारा येथील दोन गाव तलाव व दहागाव येथील गाव तलावाचे काम हाती घेतले आहे. पॉवरग्रीड कॉर्पोरेशनने शहापूर तालुक्यातील वाशाळा नाला बांध, वाशाळा येथील नाल्यावर सिमेंट काँक्रीटचा बंधारा, अंबरनाथ तालुक्यातील करवले येथील नदी खोलीकरण आणि गोरपे गाव तलावाचे काम हाती घेतले आहे.

टेक्नोक्राफ्ट कंपनीने मुरबाडमधील बेसलेपाडा, वैशाखरे, तळवली, बारांगाव तर आयआरबी कंपनीने मुरबाडमधील दुधनोली माती नाला बांध आणि कुंदे येथील गाव तलावाचे काम घेतले आहे. कुंदे येथील आणखी एका तलावाचे काम सेंच्युरी रेयॉन कंपनी करीत आहे. शहापूर तालुक्यातील दहिवली गाव तलावाचे काम कर्म रेसिडेन्सी तर भिवंडी तालुक्यातील वाहुली आणि लाप बु. येथील गाव तलावाची कामे लोढा फाऊंडेशन करीत आहे. अंबरनाथ तालुक्यातील खरड नदी खोलीकरणाचे काम खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्यामार्फत आशुतोष इवले कंपनी करीत आहे.

महसूल विभागातर्फे शहापूर तालुक्यातील चरीव नदी खोलीकरण, मांजरे गाव तलाव, किन्हवली, विहीगाव, भिवंडी येथील एकसालमधील नाला खोलीकरण, अंबरनाथमधील करवले नदी खोलीकरणाचा पहिला भाग, कल्याण तालुक्यातील कांबा गाव तलाव अशी कामे सुरू आहेत. याशिवाय बदलापूर नगरपालिकेने चोण गाव तलाव, लिबर्टी ऑईल मिलने ढेंगणमाळ कोल्हापूर बंधारा, कर्म रेसिडेन्सीने मुळगाव गाव तलाव अशी विविध कामे हाती घेतली असून त्यांच्यावर संबंधित प्रांत अधिकारी आणि तहसीलदार लक्ष ठेवून आहेत.

जिल्हा परिषदेच्या लघु पाटबंधारे विभागाच्या वतीने भिवंडी आणि कल्याण उपविभागातील २४ कामे हाती घेण्यात आली आहेत. त्यामध्ये खनिवली, चिंबीपाडा, कुहे, खांडपे, कुडाचा पाडा, कोशिंबडे, नाडगाव, कोसले, तुळई, चौरे, मोखावणे, टेंभा वाकपाडा आदी ठिकाणी नाल्यांमधील गाळ काढण्याची कामे हाती घेण्यात आल्याची माहिती ठाणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक भीमनवार यांनी दिली.

जलसंपदा विभागाने त्यांच्या ठेकेदारांमार्फत ‘सीएसआर’चा भाग म्हणून अंबरनाथमधील भोज लघू प्रकल्प, उसगांव लघू प्रकल्प, शहापूरमधील वेहळोली, खराडे व मुरबाडमधील जांभुर्डे प्रकल्पातील गाळ काढण्याची कामे हाती घेतली आहेत. जिल्हा कृषी अधीक्षक महावीर जंगटे, जिल्हा परिषद लघु पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता प्रभाकरन आदी अधिकारी, कर्मचारी या कामांवर लक्ष ठेवून आहेत.

जलसंवर्धन योजनेत परिसरातील कंपन्यांनी सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले होते. त्याला खूप चांगला प्रतिसाद मिळाला. त्याचबरोबर स्वयंसेवी संस्था, शासकीय यंत्रणा आणि लोकांचे सहकार्य मिळाले. त्यामुळेच ठाणे जिल्ह्य़ात यंदा कमीत कमी वेळेत मोठय़ा प्रमाणात जलसंधारणाची कामे सुरू होऊ शकली. पावसाळ्यापूर्वी ही सर्व कामे पूर्ण केली जातील.

डॉ. महेंद्र कल्याणकर, जिल्हाधिकारी, ठाणे