विहिरीजवळ चर खोदून पाणी मुरवण्यासाठी श्रमदान

ठाणे : मुंबईला पाणीपुरवठा करणारी धरणे असूनही शहापूर तालुक्यातील १३० गावपाडय़ांना उन्हाळ्यात पाण्यासाठी अक्षरश: वणवण करावी लागते. शासन स्तरावर त्यावर उपाय शोधण्याचे प्रयत्न सुरू आहेतच, पण त्याचबरोबर काही स्वयंसेवी संस्थांनीही आपापल्या परीने प्रयत्न सुरू ठेवले आहेत. ठाण्यातील काही तरुणांनी मध्य वैतरणा धरणाजवळ डोंगराच्या कुशीत वसलेल्या दापुरमाळ गावात काम सुरू केले आहे. पुढील वर्षी या गावाला पाणीटंचाई भेडसावू नये, यासाठी ‘सीसीटी’ पद्धतीचा वापर केला जात आहे. विहिरीजवळ चर खोदून त्याद्वारे जलसंधारण करण्याची कामे गावात सध्या सुरू आहेत.

कसारा स्थानकापासून २० किलोमीटर अंतरावर दापुरमाळ हे गाव आहे. या गावात पोहोचण्यासाठी धड रस्तेही नाहीत. जेमतेम २०० लोकसंख्या असलेल्या दापुरमाळ गावात सध्या भीषण पाणीटंचाई आहे. मध्य वैतरणा धरण नजरेच्या टप्प्यात असूनही दापुरमाळला पाण्याची टंचाई भेडसावते. या गावातील विहिरीतील पाण्याने आता तळ गाठला आहे. तळाशी एक बारीक झरा आहे. त्यातून झिरपणाऱ्या पाण्याने एक कळशी भरायला साधारण तासभर वेळ लागतो. जानेवारी महिन्यापासूनच गावात पाण्याची बोंब सुरू होते. त्यानंतर पावसाळय़ापर्यंत ग्रामस्थांना पाण्यासाठी वणवण करावी लागते. अशावेळी विहिरीतील लहानसा झरा हाच त्यांच्यासाठी आधार असतो.

गावातील पाणीटंचाईचे हे भीषण वास्तव बदलण्यासाठी ठाणे-डोंबिवलीतील स्नेहल नाईक, दिंगबर आचार्य, स्वराली बुचके, महेंद्र पाटील, राजू वाळवी यांनी ‘सीसीटी’ पद्धतीने काम सुरू केले आहे. ‘राज्यातील विविध गावात पाण्याची उपलब्धतता तपासणाऱ्या सूर्यकांत कांबळे यांनी आम्हाला या कामात मदत केली. त्यांनी गाव परिसराची पाहणी करून ‘सीसीटी’ पद्धतीने या गावात पाणी आणता येईल, असे सांगितले,’ अशी माहिती स्नेहलने दिली. सूर्यकांत कांबळे यांच्या मार्गदर्शनानंतर स्नेहल आणि तिच्या अन्य सहकाऱ्यांनी ‘सीसीटी’ पद्धतीचे प्रशिक्षण घेतले. तसेच गणपत पारधी व सुमित्रा पारधी या ग्रामस्थांनाही या उपक्रमात सहभागी करून घेतले.

१२ मेपासून हे काम सुरू झाले आहे. स्थानिक गावकरी आणि शहरातील नागरिक एकत्रित येऊन श्रमदानाने हे काम करीत आहेत. आतापर्यंत शहरातील ४० नागरिकांनी या भागात श्रमदान केले आहे. पुढील शनिवार-रविवारी २६ आणि २७ मे रोजी पुन्हा गावात श्रमदान केले जाणार आहे. जास्तीत जास्त नागरिकांनी या उपक्रमात सहभागी व्हावे, असे आवाहन स्नेहल नाईक यांनी केले आहे.

‘सीसीटी’ पद्धत..

’ गावातील विहिरीजवळील असणाऱ्या उतारावर ठरावीक अंतराने चर खोदले जातात. त्याद्वारे पावसाचे पाणी जमिनीत मुरते.

’ १५ मीटरच्या एका चरात जवळपास ५४ हजार लिटर पाणी जमिनीत मुरते. त्यामुळे विहिरीतील झऱ्याद्वारे किमान मार्च महिन्यापर्यंत मुबलक पाणी गावकऱ्यांना मिळू शकेल.

’ या चरांच्या आजूबाजूला कमी पाणी लागणारी झाडे लावली जातात. त्यामुळे जमिनीची धूप रोखली जाते.