चिखलोली धरण रिते केल्याने एक दिवसाआड पाणी

लोकसत्ता प्रतिनिधी

अंबरनाथ : दररोज कमी दाबाने, तर अधूनमधून एक दिवसाआड पाणी मिळत असल्याने आधीच हैराण असलेल्या अंबरनाथ पूर्वेतील नागरिकांना आता पावसाळ्यापर्यंत दररोज एक दिवसाआड पाणी मिळणार आहे. त्यामुळे ऐन उन्हाळ्यात पाणीटंचाईच्या झळा नागरिकांना सहन कराव्या लागणार आहेत. चिखलोली धरणाच्या उंची वाढवण्याच्या कामासाठी सलग तिसऱ्या वर्षांत धरण रिकामे केले गेले असून सुमारे ७० हजार ते १ लाख लोकसंख्येला याचा फटका बसणार आहे. त्यामुळे पाणी जपून वापरण्याचे आवाहन महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाकडून करण्यात आले आहे.

अंबरनाथ आणि बदलापूर शहराच्या सदोष पाणीपुरवठा यंत्रणेमुळे पाणी असूनही बारमाही पाणीटंचाईचा सामना नागरिकांना करावा लागतो. गेल्या काही वर्षांत या दोन्ही शहरांतील पाणीपुरवठय़ाची व्यवस्था कोलमडू लागली आहे. अंबरनाथ शहरात तर गेल्या काही वर्षांपासून नागरिक एक दिवसआड पाण्यावर गुजराण करतात. अंबरनाथ शहराला बदलापूर येथील उल्हास नदीवरील बॅरेज बंधारातून सर्वाधिक ५० दशलक्ष लिटर पाणी मिळते. त्यासोबतच एमआयडीसीच्या माध्यमातून मिळणारे १० दशलक्ष लिटर आणि चिखलोली धरणातून ६ दशलक्ष लिटर पाण्यावर शहराची तहान भागवली जाते. भविष्यातील तहान भागवण्यासाठी २०१८मध्ये  चिखलोली धरणाच्या विस्तारीकरणाच्या प्रस्तावाला मंजुरी मिळाली होती. त्यासाठी ७७ कोटींची योजना जाहीर झाली. २०१९ पासून या कामासाठी धरण रिकामे करण्यात येऊ  लागले. मात्र तीन वर्षांपासून धरणाची उंची वाढवण्याचे काम सुरू असून यंदा या कामासाठी धरण रिकामे केले आहे. त्यामुळे चिखलोली धरणातून होणारा ६ दशलक्ष लिटर पाण्याची तूट निर्माण झाली असून त्यामुळे आता अंबरनाथ पूर्वेतील महालक्ष्मी नगर, शिवाजी नगर, वडवली, कृष्णनगर या जवळपास ७० ते १ लाख लोकवस्तीच्या परिसराला एक दिवसाआड पाणी दिले जाणार आहे. महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाने एक पत्रक काढून नागरिकांना याबाबतची माहिती दिली आहे.

पुन्हा पाणीकोंडी

धरणाची उंची वाढवण्यासाठी सलग तिसऱ्या वर्षी हे धरण रिकामे करण्यात आले आहे. त्यामुळे नागरिकांना पुन्हा पाणीटंचाईचा सामना करावा लागणार आहे. विशेष म्हणजे याआधीच एमआयडीसी प्रशासनाने महिन्यातून दोनदा पाणीकपात लागू केली आहे. त्यानंतर चिखलोली धरणातूनही पाणी मिळणार नसल्याने अंबरनाथकरांची पाणीकोंडी होण्याची भीती व्यक्त होते आहे.