News Flash

शहापूर, मुरबाड तालुक्यांवर पाणीसंकट

दोनशेहून अधिक गाव-पाडय़ांना टँकरद्वारे पुरवठा

शहापूर, मुरबाड तालुक्यांवर पाणीसंकट
(संग्रहित छायाचित्र)

दोनशेहून अधिक गाव-पाडय़ांना टँकरद्वारे पुरवठा

बदलापूर : करोना संकटाचा सामना करण्यासाठी ठाणे जिल्ह्य़ातील प्रशासकीय यंत्रणा व्यस्त असताना शहापूर आणि मुरबाड तालुक्यांत पाणीटंचाईचे संकट दिवसेंदिवस गंभीर होऊ लागले आहे. शहापूर तालुक्यात सध्या १८८ गावपाडय़ांमध्ये, तर मुरबाड तालुक्यातील २६ गावपाडय़ांना टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्यात येत आहे. त्यातच टाळेबंदीमुळे अनेक गावांच्या वेशी बंद करण्यात आल्या असल्याने तेथील विहिरींत पाणी सोडण्यासाठी जिल्हा प्रशासनाला कसरत करावी लागत आहे.

शहापूर आणि मुरबाड या तालुक्यांना दरवर्षी उन्हाळय़ात पाणीटंचाईच्या झळा सोसाव्या लागतात. यंदाही मार्चच्या अखेरीपासून शहापूरमधील आठ गावे आणि १३ पाडय़ांमध्ये टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरू करण्यात आला. महिनाभरात शहापूर तालुक्यातील टंचाईग्रस्त गावपाडय़ांची संख्या २१६ पर्यंत पोहोचली आहे. तालुक्यात सध्याच्या घडीला ५६२ गावे आणि १६४ पाडय़ांमध्ये पाण्याची टंचाई आहे. या टंचाईवर मात करण्यासाठी स्थानिक तहसील कार्यालयाकडून प्रांत कार्यालयाला टँकरची मागणी करण्यात आली होती. त्यानंतर तालुक्यातील ४२ गावे आणि १४५ पाडय़ांमध्ये पाणीपुरवठा करण्यासाठी ३३ टँकर उपलब्ध करून देण्यात आले आहेत, अशी माहिती तहसीलदार नीलिमा सूर्यवंशी यांनी दिली आहे. आणखी ३ टँकरची आवश्यकता असून त्यातून १० गावे आणि १९ पाडय़ांना पाणीपुरवठा करण्याचा प्रस्ताव सादर करण्यात आल्याचेही सूर्यवंशी यांनी सांगितले. मात्र ही व्यवस्था पुरेशी नसल्याची ओरड आता होते आहे.

मुरबाड तालुक्यातही पाणीटंचाईच्या झळा बसू लागल्या आहेत. गेल्या वर्षी पाणीटंचाईने मुरबाड तालुक्यातील ग्रामस्थांना मोठा त्रास सहन करावा लागला होता. १८ गावे आणि ३८ पाडय़ांमध्ये भीषण टंचाई होती. यंदा सध्या ५ गावे आणि २१ पाडय़ांमध्ये टंचाई निर्माण झाली आहे. त्यासाठी ५ टँकरच्या माध्यमातून पाणीपुरवठा केला जात असल्याची माहिती मुरबाडचे तहसीलदार अमोल कदम यांनी दिली आहे. टँकरची संख्या वाढवण्याची मागणी अनेक ग्रामस्थांनी केली आहे. त्यामुळे येत्या काळात या भागांतील पाणीप्रश्न बिकट होण्याची भीती व्यक्त होत आहे.

वेशी बंद असल्याने अडचण

करोनाचा प्रादुर्भाव वाढू नये यासाठी ग्रामीण भागातील अनेक गावांच्या वेशी ग्रामस्थांनी पुढाकार घेऊन बंद केल्या आहेत. ज्या ठिकाणी या विषाणूचा प्रादुर्भाव फारसा नाही तेथील निर्बंध शिथिल करण्यात आले आहेत. असे असतानाही काही गावांमधील वेशीबंदीसाठी आग्रह धरला जात असून दादागिरीचे प्रकारही केले जात आहेत. यापैकी काही गावांमध्ये पाण्याची टंचाई जाणवू लागली आहे. त्यामुळे टँकरच्या वाहतुकीवरदेखील अडथळे उभे राहात आहेत. विहिरीत पाण्याचे टँकर रिते केल्यानंतर पुन्हा गावच्या वेशी बंद केल्या जात आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 8, 2020 3:56 am

Web Title: water crisis in shahapur murbad talukas zws 70
Next Stories
1 दररोज ७५ हजार भोजन पाकिटांचे वाटप
2 रस्त्यावर थुंकण्यामुळे रहिवासी हैराण
3 Coronavirus : कल्याण-डोंबिवलीला दिलासा
Just Now!
X