दुरुस्तीच्या कामामुळे कमी दाबाने पुरवठा

ठाणे तसेच मुंबई महापालिकेस पाणी पुरवठा करणाऱ्या भातसा नदीवरील पीसे येथील बंधाऱ्याच्या देखभाल दुरुस्तीचे तातडीचे काम हाती घेण्यात आल्याने पुढील आठ दिवस संपुर्ण ठाणे शहराला कमी दाबाने पाणी पुरवठा केला जाणार आहे.

पिसे बंधाऱ्याची जलसाठवण क्षमता वाढवण्यासाठी गेल्या काही वर्षांपासून सातत्याने लहानमोठी कामे सुरू आहेत. आज, शनिवारपासून अशाच पद्धतीची कामे हाती घेण्यात येणार असल्याने या बंधाऱ्यातील पाण्याची पातळी कमी करण्यात आली आहे. त्यामुळे पुढील आठ दिवस ठाणे शहराला कमी दाबाने पाणीपुरवठा होणार आहे, अशी माहिती महापालिकेचे जनसंपर्क अधिकारी महेश राजदेरकर यांनी दिली. या काळात कोणत्याही भागात पाणीपुरवठा बंद केला जाणार नाही. केवळ कमी दाबाने पाणी पुरवठा होईल, असेही राजदेरकर यांनी स्पष्ट केले. या काळात नागरिकांनी जपून पाणी वापरावे, तसेच साठवणुकीचे योग्य नियोजन करावे, असे आवाहन पाणी पुरवठा विभागामार्फत करण्यात आले आहे.

मुंबई महापालिकेच्या मालकीच्या असलेल्या भातसा प्रकल्पातून दररोज ५० ते ७० दशलक्ष लिटर अशुद्ध पाणी ठाणे महापालिकेच्या जलशुद्धीकरण केंद्रात येते. या पाण्यावर प्रक्रिया करून ते शहरातील विविध भागांत पुरविले जाते. भातसा नदीवर पिसे येथे बंधारा बांधण्यात आला असून याच ठिकाणाहून ठाणे शहरात पाण्याचा पुरवठा होत असतो. पिसे बंधाऱ्यात पाणी साठवण क्षमता वाढविण्यासाठी या ठिकाणी उंची वाढविण्याचे तसेच देखभाल दुरुस्तीचे काम केले जात आहे. शनिवारपासून याच बंधाऱ्याच्या वार्षिक देखभाल व दुरुस्तीचे काम सुरू करण्यात येणार आहे.