पाणीपुरवठा बंद झाल्याने उद्योगांची दैना

ठाणे : ठाणे शहरातील वागळे इस्टेट औद्योगिक पट्टय़ातील पाणी टंचाईसदृश परिस्थिती दूर व्हावी यासाठी यंत्रणांकडून वेगवेगळ्या उपाययोजना आखण्याचे आश्वासन दिले जात असले तरी गेल्या काही दिवसांपासून या भागात होणारा पाणीपुरवठा जवळपास ठप्प झाल्यामुळे उद्योजक हवालदिल झाले आहेत. करोनाचा संसर्ग रोखण्यासाठी स्वच्छतेचा आग्रह सरकारकडून धरला आहे. प्रत्यक्षात पाणीच नसल्याने स्वच्छतेचा प्रश्नही ऐरणीवर आला आहे, असे उद्योजकांचे मत आहे.

एकेकाळची आशिया खंडातील सर्वात मोठी औद्योगिक वसाहत अशी ओळख असणाऱ्या ठाण्यातील वागळे औद्योगिक वसाहतील गेल्या काही वर्षांपासून मोठय़ा प्रमाणात पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे. वागळे औद्योगिक वसाहत परिसरात एकूण सहाशे औद्योगिक भूखंड असून एक हजार एवढे लघु व मध्यम स्वरूपाचे उद्योगधंदे या भागात कार्यान्वित आहे. तर, ५५ आयटी पार्क आहेत. या औद्योगिक वसाहतीला बारवी धरणातून दररोज ५ दशलक्ष लिटर इतकाच पाणीपुरवठा होतो. प्रत्यक्षात वागळे औद्योगिक वसाहतीला दररोज १० दशलक्ष लिटर पाण्याची आवश्यकता आहे. पुरेशा प्रमाणात पाणी मिळावे यासाठी उद्योजक गेल्या वर्षभरापासून महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाकडे मागणी करत आहेत. आश्वासनाशिवाय कोणत्याही ठोस उपाययोजना करण्यात आल्या नसल्यामुळे वागळे औद्योगिक परिसरातील उद्योजक हवालदिल झाले आहेत. त्यातच गेल्या पाच दिवासांपासून वागळे औद्योगिक वसाहतीत पाण्याचा थेंबही नसल्याने उद्योजक आणि कर्मचाऱ्यांना पिण्यासाठी पाणी उपलब्ध नाही.

वागळे औद्योगिक वसाहतीत दररोज हजारो उद्योजक आणि कामगारांचा राबता असतो. यामध्ये महिला कामगारांची संख्याही मोठी आहे. या भागात पाणीटंचाई निर्माण झाल्याने हात धुण्यासाठी पाणी आणायचे कोठून असा प्रश्न उद्योजकांसमोर उभा राहिला आहे.

वागळे औद्योगिक वसाहत ही उंचावर असल्याने या भागात पाणी पोहोचताना अडथळा निर्माण होतो. त्यामुळे या भागात पुरेशा प्रमाणात पाणीपुरवठा होण्यासाठी पाणी बूस्टरच्या साहाय्याने खेचणे गरजेचे आहे. हे बूस्टर बसवण्याच्या मागणीसाठी ऑगस्ट २०१९ मध्ये वागळे औद्योगिक वसाहतीतील उद्योजकांची महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या अधिकाऱ्यांसोबत बैठक झाली होती. हे बूस्टर तात्काळ बसवण्यात येतील, असे आश्वासन अधिकाऱ्यांकडून उद्योजकांना देण्यात आले होते. प्रत्यक्षात सात महिने उलटून गेले तरी महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाने अद्याप कोणतेही काम हाती घेतलेले नाही. त्यामुळे उद्योजकांमध्ये नाराजीचे वातावरण पसरले आहे. या बाबत अधिक माहिती घेण्यासाठी महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाचे मुख्य अभियंता राजेंद्र सोनजे यांच्याशी वारंवार संपर्क साधला असता संपर्क होऊ शकला नाही.

गेल्या पाच दिवसांपासून पाणीटंचाई असल्याने पिण्यासाठीही पाणी उपलब्ध नाही. त्यामुळे कामगारांना पिण्यासाठी पाणी विकत आणावे लागत आहे. पाणीटंचाई असल्याने कंपनीमध्ये स्वच्छता तरी कशी ठेवायची, असा गंभीर प्रश्न आमच्या समोर उभा राहिला आहे.

सुजाता सोपारकर, उद्योजिका, वागळे औद्योगिक वसाहत, ठाणे