विविध भागांमध्ये अजूनही पाण्याचे दुर्भिक्ष : पाण्याचा असमतोल पुरवठा, जलकुंभांची दुरवस्था

कल्याण-डोंबिवली महापालिकेच्या पाच वर्षांपूर्वी झालेल्या निवडणुकांमध्ये अनेक राजकीय पक्षांनी शहरातील नागरिकांना २४ तास पाणीपुरवठा करण्याचे आश्वासन दिले होते. त्यानुसार काही भागांमध्ये ठरावीक वेळेपेक्षा जास्त पाणीपुरवठा करण्याचा प्रयत्न करण्यात आला खरा, मात्र अजूनही अनेक भागांत पाण्याचे दुर्भिक्ष्य असल्याचे चित्र आहे. पाणीपुरवठय़ाच्या दृष्टीने नवे प्रकल्प शहरात राबवण्यात आले असले तरी वितरण व्यवस्थेच्या नावाने अजूनही अनेक भागांमध्ये सावळागोंधळ आहे. गेल्या पाच वर्षांत अपुरे राहिलेले हे आश्वासन यंदाही नव्याने मांडण्याचा प्रयत्न केला जात आहे. त्यामुळे २४ तास नको मात्र गरजेपुरता पाणीपुरवठा करण्याच्या दृष्टीने प्रयत्न करा, असा टोला मतदारांकडून लगावला जात आहे. त्यामुळे या निवडणुकीमध्ये पाण्याच्या प्रश्नावर मतदार आग्रही आहेत.

कल्याण पूर्वेतील कोळसेवाडी, गणेशवाडी, जिम्मीबाग, कर्पेवाडी, विठ्ठलवाडी, मंगलराघोनगर, आनंदवाडी, लोकग्राम, नांदिवली, चक्कीनाका, विजयनगर या भागांमध्ये होणाऱ्या अपुऱ्या पाणीपुरवठय़ामुळे या भागातील नागरिकांनी गेल्या पाच वर्षांमध्ये अनेकदा महापालिका कार्यालयात धडक मोर्चा काढला. याबरोबरच टिटवाळा, शहाड परिसरातील भागांमध्ये सुद्धा वितरण व्यवस्थेतील दोषामुळे कमी पाणीपुरवठा होत असल्याचा आरोप नागरिकांकडून केला जातो. डोंबिवली पश्चिम आणि पूर्वेतीलही काही भागांमध्ये शहराच्या पाणीपुरवठय़ावरून ताशेरे ओढले जात आहेत.

ठोस उपाययोजनांचा अभाव

’शहरातील अनेक भागांमध्ये असमतोल पाणीपुरवठा होत आहे. डोंबिवली पूर्वेत पाणीपुरवठा सुरळीत असेल तर त्याच वेळी कल्याण पूर्वेत मात्र खडखडाट अशी असमतोल परिस्थिती आहे.

’अनेक भागांमध्ये जलवाहिन्या गटारातून गेल्या आहेत. जुन्या वाहिन्या फुटल्यामुळे काही ठिकाणी गटाराचे पाणी नळावाटे घरी आल्याच्या तक्रारीही येत आहेत.

’शहरातील झोपडपट्टय़ांमध्ये मोठय़ा प्रमाणात अनधिकृतपणे नळजोडणी घेऊन पाणीपुरवठा केला जात असल्याने अधिकृत नागरिकांच्या पाणीपुरवठय़ावर ताण पडत आहे.

’महापालिकेची सध्याची पाणी साठवण क्षमता जेवढी मागणी आहे, तेवढीच आहे. केवळ एक दिवस पुरेल इतकेच पाणी त्यातून पुरवले जाते. त्यामुळे अधिक काळ पाणीकपात झाल्यास पाण्याची टंचाई जाणवते.

पाणी साठवणूक

शहरामध्ये ७८ जलकुंभ आहेत. त्यांची साठवणूक क्षमता सुमारे ९२.११ दशलक्ष लिटर आहे. सध्याची पाणीपुरवठय़ाची मागणी पूर्ण करण्यास एकत्रित एमएलडीची संयुक्त क्षमता जवळपास पुरेशी आहे.