कल्याण-शीळ रस्त्यानजीक जलवाहिनी फुटल्यामुळे पुरवठ्यावर परिणाम

ठाणे / कल्याण : कल्याण-शीळ मार्गावरील काटई येथे शुक्रवारी सायंकाळी महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाची जलवाहिनी फुटली. त्यामुळे ठाणे, नवी मुंबई, मिरा-भाईंदर, कल्याण-डोंबिवली, उल्हासनगर, बदलापूर आणि अंबरनाथमधील नागरिकांना शनिवारी पाणीटंचाईला तोंड द्यावे लागेल.

फुटलेल्या जलवाहिनीतून लाखो लिटर पाणी वाया गेले असून ते रस्त्यावर साचल्यामुळे वाहतुकीस अडथळा निर्माण होऊन मोठी कोंडी झाली होती. दहा मिनिटांचे अंतर पार करण्यासाठी एक ते दीड तास लागत होता.  मुंब्रा, शीळफाटा, महापे, दिवा-आगासन या मार्गांवर होऊन या ठिकाणीही कोंडी झाली.

दुरुस्तीसाठी १० ते १२ तास

‘एमआयडीसी’ने जलवाहिनीच्या दुरुस्तीचे काम सुरू केले असून त्यासाठी १० ते बारा तास लागणार आहेत. यामुळे ठाणे शहर, नवी मुंबई, मिरा-भाईंदर, कल्याण-डोंबिवली, उल्हासनगर, बदलापूर आणि अंबरनाथ या शहरातील काही भागांचा पाणीपुरवठा बंद राहणार आहे. यामध्ये ठाणे शहरातील वागळे इस्टेटचा काही भाग, कळवा, मुंब्रा, दिवा तर, कल्याण-डोंबिवलीमधील एमआयडीसी, २७ गावे आणि शहाड भागाचा पाणीपुरवठा बंद राहील. यामुळे या भागांतील नागरिकांना पाणीटंचाईला तोंड द्यावे लागेल.

झाले काय?

  • ठाणे जिल्ह्यातील विविध शहरांना पाणीपुरवठा करणारी १७१२ मि.मी. व्यासाची ‘एमआयडीसी’ची जलवाहिनी शिळफाटा परिसरातून जाते.
  • शुक्रवारी सायंकाळी साडेपाच वाजता एमआयडीसीने शीळफाटा भागात जलवाहिनी दुरुस्तीचे काम केले आणि अर्ध्या तासानंतर पाणीपुरवठा सुरू केला.
  • परंतु काही वेळातच शीळ मार्गावरील काटई परिसरात जलवाहिनी फुटली आणि काही वेळातच ‘एमआयडीसी’ने या जलवाहिनीतून होणारा पाणीपुरवठा बंद केला.