टंचाईसदृश परिस्थिती मात्र कायम

बदलापूर : अंबरनाथ आणि बदलापूर शहरांतली पाणीकपात कोणतीही घोषणा न करता महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाने दोन दिवसांपासून रद्द केल्याने या शहरातील रहिवाशांना दिलासा मिळण्याची चिन्हे आहेत. गेल्या आठवडय़ात याबाबतचा निर्णय झाला आहे, अशी माहिती प्राधिकरणातील वरिष्ठ सूत्रांनी दिली. गेल्या सात महिन्यांपासून ही कपात लागू होती.

गेल्या वर्षांत पावसाने लवकर ओढ दिल्याने नोव्हेंबर महिन्यातच लघु पाटबंधारे विभाग आणि महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाने पाणीकपातीचे वेळापत्रक तयार केले होते. त्यानुसार जानेवारी महिन्याच्या दुसऱ्या आठवडय़ापासून पाणीकपात लागू करण्यात आली होती. गेल्या सात महिन्यांपासून बदलापूर आणि अंबरनाथ शहरातील साडेपाच ते सहा लाख नागरिक पाणीकपातीचा सामना करत होते. यंदाच्या वर्षांत पाणी पातळी कमालीची खालावल्याने कूपनलिकाही आटल्या होत्या. त्यामुळे पाणीटंचाईने उग्र रूप धारण केले होते. त्यामुळे दोन्ही शहरांतील नागरिक पावसाची आतुरतेने वाट पाहत होते. जून महिन्याच्या अखेरीस सुरू झालेल्या पावसाने पंधरा दिवसांत जोरदार हजेरी लावल्याने जलस्रोत ओसांडून वाहू लागले आहेत. त्यानंतरही पाणीकपात रद्द होत नसल्याने नागरिकांमध्ये नाराजीचा सूर व्यक्त होत आहे.

लघु पाटबंधारे विभाग आणि जीवन प्राधिकरणाच्या संयुक्त बैठकीत ११ जुलैपासून कपात रद्द करण्याचा निर्णय झाला आहे. त्यामुळे सध्या बॅरेज बंधाऱ्यातून १०३ दशलक्ष घनलिटर पाण्याची उचल केली जाते आहे. सध्या बॅरेज बंधाऱ्याची पाणी पातळी १३.१० मीटपर्यंतच पोहोचली आहे. कोणतीही घोषणा न करता पाणीकपात रद्द करण्याच्या निर्णयाची माहिती शहरातील नागरिकांना कळू शकली नाही. कारण पाणीकपात रद्द झाली असली तरी शहरातील विविध भागांत कमी दाबानेच पाणीपुरवठा होत आहे. त्यामुळे भरपावसात पाणीकपात रद्द होऊनही पाणीटंचाईला सामोरे जाण्याची वेळ अंबरनाथ आणि बदलापूरच्या नागरिकांवर आली आहे.

याबाबत जीवन प्राधिकरणाचे कार्यकारी अभियंता सुरेंद्र दशोरे यांना विचारले असता, पाणीगळती ३० टक्क्यांवर आहे. मात्र कपात रद्द केल्यानंतरही काही भागांत पाणी टंचाईसदृश परिस्थिती असल्यास स्थानिक अभियंत्यांकडून उपाययोजना करण्याचे आदेश देण्यात येतील, असे त्यांनी स्पष्ट केले.

ठाण्यात मात्र आज पाणी बंद

ठाणे येथील धर्मवीर मार्गावरील सेवारस्त्यांजवळील मुंबई महापालिकेच्या जलवाहिनीवर जलमापक बसविणे तसेच हाजुरी भागात शुद्धीकरणाविना होणारा पाणीपुरवठा बंद करण्यासाठी बुधवारी शहराच्या काही भागांचा पाणीपुरवठा बंद ठेवण्यात येणार आहे.

’ बुधवार, १७ जुलै रोजी सकाळी ९ ते गुरुवार, १८ जुलै रोजी सकाळी ९ या कालावधीत नामदेववाडी, पाचपाखाडी, टेकडी परिसर, आराधना, सेंट जॉन स्कूल परिसर, बी केबिन, दादा पाटीलवाडी, ठाणे स्थानक परिसर, चेंदणी कोळीवाडा, नागसेननगर, महागिरी, राम मारुती रस्त्यालगतचा काही भाग, जांभळीनाका या भागांचा पाणीपुरवठा २४ तासांसाठी बंद राहणार आहे. या बंदमुळे पुढील एक ते दोन दिवस कमी दाबाने पाणीपुरवठा होणार आहे. तसेच शहराच्या उर्वरित भागात मात्र नियमित पाणीपुरवठा सुरू राहणार असल्याची माहिती महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाने दिली.