News Flash

पाणीकपात रद्द होणार?

धरण क्षेत्रातील जलसाठा वाढल्यामुळे लवकरच निर्णय

(संग्रहित छायाचित्र)

ठाणे जिल्ह्य़ातील धरणांमधील पाणीसाठय़ाच्या नियोजनासाठी गेल्या सहा महिन्यांपासून ठाण्यासह जिल्ह्य़ातील सर्वच भागांत लागू करण्यात आलेली पाणीकपात लवकरच रद्द होण्याची शक्यता आहे. धरणक्षेत्रात पावसाचे प्रमाण वाढल्याने जलसाठय़ातही चांगली वाढ होऊ लागली आहे. या पाश्र्वभूमीवर गेल्या आठवडय़ातील पाणीकपात रद्द करण्यात आल्याची माहिती पालिकेच्या पाणीपुरवठा विभागातील वरिष्ठ सूत्रांनी दिली. याबाबतची अधिकृत घोषणा अद्याप करण्यात आली नसली, तरी धरणक्षेत्रात पाऊस सुरूच राहिल्यास पाणीकपात रद्द करण्यात येण्याची चिन्हे आहेत.

ठाणे महापालिका क्षेत्रामध्ये विविध स्त्रोतांमार्फत दररोज ४८० दशलक्ष लिटर इतका पाणीपुरवठा करण्यात येतो. त्यामध्ये स्टेम प्राधिकरण, महापालिकेची स्वत:ची योजना, महाराष्ट्र औद्यौगिक विकास महामंडळ आणि मुंबई महापालिका या चार स्रोतांचा समावेश आहे. भातसा धरणाच्या नदीपात्रातून ठाणे महापालिका आणि मुंबई महापालिका, तर बारवी धरणाच्या नदी पात्रातून स्टेम आणि महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ हे स्रोत पाणी उचलतात. या धरणातील पाणीसाठय़ाच्या नियोजनासाठी गेल्या सहा महिन्यांपासून लघुपाटबंधारे विभागाने पाणीकपात लागू केली असून, या कपातीमुळे ठाणे महापालिका क्षेत्राचा पाणीपुरवठा आठवडय़ातून एक दिवस बंद ठेवण्यात येतो. तसेच पुढील एक ते दोन दिवस कमी दाबाने पाणीपुरवठा होतो.

या पाणीकपातीमुळे ठाणेकरांना पाणीटंचाईला तोंड द्यावे लागत होते. घोडबंदरमधील अनेक मोठय़ा गृहसंकुलांना टँकरद्वारे पाणी मागवून पाण्याची गरज भागवावी लागत होती. त्यातच यंदा पावसाने जूनच्या अखेपर्यंत हजेरी न लावल्याने तो महिनाही पाणीटंचाईतच गेला. मात्र गेल्या दोन-तीन दिवसांपासून धरणक्षेत्रात चांगला पाऊस सुरू असल्याने जलसाठय़ात वाढ होऊ लागली आहे. बारवी धरणातील पाणीसाठा २२ टक्के, तर भातसा धरणातील पाणीसाठा २८ टक्के इतका झाला आहे. त्यामुळे ठाणे महापालिका क्षेत्राला पाणीपुरवठा करणाऱ्या स्रोतांकडून पुरेसे पाणी मिळू लागल्याने पालिका प्रशासनाने पाणीकपात रद्द करण्यास सुरुवात केल्याची माहिती सूत्रांनी दिली.

सध्याची कपात

धरण क्षेत्रातील पाणी नियोजनासाठी स्टेम प्राधिकरणाकडून १५ टक्के, तर महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाकडून २० टक्के पाणीकपात करण्यात येते. यामुळे स्टेम प्राधिकरण आणि महापालिकेच्या स्वत:च्या योजनेतून होणारा पाणीपुरवठा दर बुधवारी बंद ठेवला जातो. महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाकडून शुक्रवारी पाणीपुरवठा बंद ठेवला जातो. तर मुंबई महापालिका दररोज १० टक्के पाणीकपात करते, अशी माहिती महापालिका सूत्रांनी दिली.

जिल्ह्य़ातील धरण क्षेत्रातील पाणी नियोजनासाठी लागू केलेली पाणीकपात रद्द करण्याबाबतचा कोणताही निर्णय अद्याप लघुपाटबंधारे विभागाने घेतलेला नाही. मात्र धरण क्षेत्रात सुरू असलेल्या पावसामुळे शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या स्रोतांकडून पुरेसे पाणी मिळत असल्यामुळे बुधवारची पाणीकपात रद्द केली होती. तसेच धरण क्षेत्रात असाच पाऊस सुरू राहिला तर पाणीकपातीचा निर्णय लवकरच रद्द होऊ शकेल.

– अर्जुन अहिरे, उपनगर अभियंता, ठाणे महापालिका पाणीपुरवठा विभाग

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 5, 2019 12:26 am

Web Title: water cut thane reservoir area storage abn 97
Next Stories
1 ठाकुर्लीतील रेल्वेची संरक्षक भिंत धोकादायक
2 ठाण्याला जागतिक दर्जाच्या स्थानकाचा दर्जा द्या!
3 कांद्याच्या दरांची उसळी
Just Now!
X