01 October 2020

News Flash

ठाण्यात संस्थांचे जलसाक्षरता अभियान

ठाणे शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या विविध स्रोतांमध्ये जेमतेम ४९ टक्के पाणीसाठा शिल्लक आहे.

‘पाणी हे जीवन’ ही संज्ञा आदर्शवत अशी असली तरी दैनंदिन व्यवहारात नागरिकांकडून उपलब्ध पाण्याचा बेसुमार वापर होताना दिसतो. ग्रामीण भागात एकीकडे पाण्यासाठी नागरिक मैलोनमैल पायपीट करत असताना ठाणे, नवी मुंबईसारख्या शहरात मात्र पाण्याची बेसुमार अशी नासाडी होत आहे. यंदा कमी पावसामुळे आतापासून शहरी भागात आठवडय़ातून तीन दिवस पाणी कपात सुरू झाली असून पुढील काही महिन्यांत हे चित्र अधिक गंभीर होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. असे असताना ठाणे शहरातील विविध संस्थांनी पाणी बचतीचे आवाहन करत जलसाक्षरता अभियान हाती घेतले आहे. ठाण्यातील जागृत भारत सेवाभावी संस्थेने गेल्या काही दिवसांपासून ठाणे, कळवा तसेच आसपासच्या परिसरातील रेल्वे स्थानकांवर यासंबंधी प्रभावी मोहीम हाती घेतली आहे.
ठाणे शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या विविध स्रोतांमध्ये जेमतेम ४९ टक्के पाणीसाठा शिल्लक आहे. त्यामुळे ‘पाणी जपून वापरा’, असे आवाहन करणारे भित्तिपत्रक ठाणे, कळवा, मुंब्रा रेल्वे स्थानक परिसरात प्रवाशांचे लक्ष वेधून घेऊ लागले आहे. ठाणे महानगरपालिकेच्या हद्दीमध्ये कोठेही पाणी वाया जात असेल किंवा एखादी जलवाहिनी फुटल्याचे निदर्शनास आल्यास तातडीने संस्थेशी संपर्क करा, असे आवाहनही संस्थेमार्फत केले जात आहे. एखाद्या ठिकाणी पाणीगळती आढळून आल्यास नागरिक पत्रकावर दिलेल्या क्रमांकावर संपर्क साधतात, अशी माहिती संस्थेमार्फत देण्यात आली. संस्थेच्या सदस्यांनी तेथील विभागातील नगरसेवकांना ही बाब निदर्शनास आणून दिल्यावर जलवाहिनी दुरुस्ती होऊन त्या ठिकाणची पाणी गळती थांबवली जाते. कळवा पूर्व येथील तलावपाडा, शास्त्रीनगर, कोलशेत, इंदिरानगर, यशोधन नगर या ठिकाणी संस्थेच्या पुढाकाराने जलवाहिन्या दुरुस्त करण्यात आल्या आहेत.
आकाशवाणीवर प्रसारित झालेल्या पाणी कमतरतेच्या वृत्ताची दखल घेत संस्थेने हा उपक्रम हाती घेतला आहे. ठाणे महानगरपालिकेच्या विभागाशी संपर्क साधत पाण्याची पातळी कमी झाल्यावर भित्तिपत्रकावरील पाणी साठय़ाचे प्रमाण कमी दाखवले जाते. याशिवाय समाजातील दुर्लक्षित समस्येवर सदस्यांच्या पुढाकाराने नाटय़मय पद्धतीने प्रशासनाला समस्येची दखल घेण्यास संस्था प्रवृत्त करते. एका परिसरात मोडून पडलेले झाड संस्थेच्या सदस्यांना लक्षात आल्यावर ‘वाचवा वाचवा मी पडलेले झाड बोलतोय, अजूनही जिवंत आहे, मला जगायचे आहे, पालिका अधिकाऱ्यांनी याची दखल घेऊन मला जगवावे’, अशी विनंती करणारे पत्रक त्या झाडावर लावले.
दुसऱ््याच दिवशी कार्यवाही
संस्थेच्या या उपक्रमामुळे दुसऱ्याच दिवशी या झाडाची पुन्हा लागवड करून ते झाड जगवण्यात आले. पायाभूत सुविधांमध्ये सुधारणा करणे हा संस्थेचा उद्देश असून नागरिकांच्या सहकार्याने पाणी वाचवा हा उपक्रम यशस्वी करण्यास प्रयत्नशील आहे असे संस्थेचे सदस्य मधुकर माने यांनी सांगितले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 2, 2016 12:01 am

Web Title: water education awareness
टॅग Awareness
Next Stories
1 मुंब्य्रातील एका आयसिस समर्थक तरुणाला अटक
2 मीरा-भाईंदर महापालिकेचा आखाडा
3 रस्त्यावरील अतिक्रमणे तातडीने हटविण्याचे आयुक्तांचे आदेश
Just Now!
X