ठाणे स्थानकातील किळसवाणा प्रकार ल्लसॅटिसच्या बांधकामासाठीच्या पाण्यावर फेरीवाल्यांचा डल्ला
ठाणे रेल्वेस्थानकावरील सॅटिसवर सुरू असलेल्या बांधकामासाठी ठेवण्यात आलेल्या पाण्याच्या टाक्यांमधून मोठय़ा प्रमाणात पाणीचोरी होत असल्याचे उघड झाले असून, हे पाणी परिसरातील फेरीवाले सरबत, शीतपेये तसेच खाद्यपदार्थासाठी वापरत आहेत. महापालिकेच्या पाण्यावर डल्ला मारतानाच फेरीवाल्यांकडून या अशुद्ध पाण्याचा उपयोग पदार्थ बनवण्यासाठी केला जात असल्याने या ठिकाणी खाणाऱ्या प्रवाशांच्या आरोग्याला धोका निर्माण झाला आहे.
ठाणे रेल्वेस्थानक परिसरातील सॅटिसवर सुरू असलेल्या बांधकामासाठी महापालिकेने पाच हजार लिटर क्षमतेच्या पाण्याच्या टाक्या बसवल्या आहेत. या टाक्यांवर झाकणे नसल्याने परिसरातील फेरीवाले तसेच खाद्यपदार्थ विक्री करणारे स्टॉलधारक पाइप टाकून हे पाणी चोरत आहेत. पाइपद्वारे कॅनमध्ये पाणी भरून या पाण्याची वाहतूक केली जात असल्याचे उघड झाले आहे. विशेष म्हणजे, हे अशुद्ध पाणी सरबत, शीतपेये तसेच खाद्यपदार्थ बनवण्यासाठी वापरण्यात येत आहे. त्यामुळे या पदार्थाचे सेवन करणाऱ्या प्रवाशांच्या आरोग्याविषयी प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
सॅटिसवर बसविण्यात आलेल्या टाक्यांमधील पाण्याची चोरी होत आहे, अशास्वरूपाच्या तक्रारी काही प्रवाशांनी तसेच संघटनांनी केल्या आहेत. रेल्वे प्रशासन आणि महापालिकेने याविरोधात कडक कारवाई अवलंबण्याची गरज आहे, अशी प्रतिक्रिया उपनगरीय रेल्वे प्रवासी महासंघाचे नंदकुमार देशमुख यांनी व्यक्त केली आहे.