19 November 2019

News Flash

कचराभूमीवर पुन्हा पाण्याचे फवारे

दरवर्षी ऑक्टोबर महिन्यात कडक उन्हामुळे कचराभूमीवरील कचऱ्याने पेट घेतल्याचे प्रकार घडतात व त्यामुळे संपूर्ण शहरभर प्रदूषण वाढते.

 

|| आशीष धनगर

आधारवाडीतील आगीच्या घटना रोखण्यासाठी उपाय :- कल्याण-डोंबिवली महापालिकेच्या आधारवाडी येथील कचराभूमीवर कडक उन्हामुळे आग लागण्याच्या घटनांची शक्यता गृहीत धरून महापालिकेने पुन्हा एकदा कचराभूमीवर पाणी फवारणीचा उपाय अवलंबला आहे. दरवर्षी ऑक्टोबर महिन्यात कडक उन्हामुळे कचराभूमीवरील कचऱ्याने पेट घेतल्याचे प्रकार घडतात व त्यामुळे संपूर्ण शहरभर प्रदूषण वाढते. त्यामुळे यंदाही पालिकेने १४ लाख रुपयांची निविदा मागवून कचऱ्यावर पाणी मारण्याचा निर्णय घेतला आहे.

आधारवाडी कचराभूमीची क्षमता कधीच संपली आहे. त्यामुळे या कचराभूमीचे स्थलांतर केले जावे अशी रहिवाशांची जुनी मागणी आहे. या आघाडीवर कल्याण-डोंबिवली महापालिकेने अजूनही ठोस पावले उचलली नाहीत. असे असताना पाण्याची फवारणी करण्याची वरवरची मलमपट्टी मात्र सलग दुसऱ्या वर्षीही करण्याचा निर्णय महापालिका प्रशासनाने घेतला आहे. यासाठी १४ लाख रुपये खर्च केले जात आहेत. ऑक्टोबर ते जून या कालावधीत उन्हामुळे कचराभूमीला आग लागते. ही आग लागू नये म्हणून त्या ठिकाणी पाण्याची फवारणी करणारी यंत्रणा आणि ती यंत्रणा हाताळण्यासाठी लागणारे मनुष्यबळ या कामांसाठी नुकतीच निविदा काढण्यात आली आहे. आग प्रतिबंध उपाययोजना तात्पुरत्या स्वरूपाची असून त्यासाठी नाहक खर्च महापालिका करत असल्याचे लोकप्रतिनिधींचे म्हणणे आहे. कचराभूमीवर पाण्याची फवारणी केल्यामुळे या भागात अधिक दरुगधी पसरणार असून त्यापेक्षा ही कचराभूमी हटवण्यासाठी महापालिकेने प्रयत्न करावे, अशी मागणी तेथील स्थानिक नागरिक करत आहेत.

आधारवाडी कचराभूमी खत प्रयोग बंद

आधारवाडी कचराभूमीवर कचऱ्याचा मोठा डोंगर तयार झाला आहे. डोंगर कमी करण्यासाठी त्या ठिकाणी कल्याणमधील काही जागरूक नागरिकांनी कंपोस्ट खत तयार करण्याचा प्रकल्प काही महिन्यांपूर्वी सुरू केला होता. या प्रकल्पामुळे कचऱ्याचा ढीग काही अंशी कमी झाला होता. मात्र, या नागरिकांना महापालिकेतर्फे आर्थिक साहाय्य मिळाले नसल्याने हा प्रकल्प काही महिन्यातच बारगळला आहे, अशी माहिती पुढे येत आहे.

आधारवाडी कचराभूमीला ऑक्टोबर ते जून या कालावधीत उन्हामुळे आग लागते. या आगीमुळे धुराचे लोट पसरून प्रदूषण होते. हा प्रकार टाळण्यासाठी कचराभूमीवर पाणी फवारणी करणारी यंत्रणा आणि ती यंत्रणा हाताळण्यासाठी लागणारे मनुष्यबळ या कामासाठी निविदा काढण्यात आली आहे.-  घनश्याम नवांगुळ, कार्यकारी अभियंता,  कल्याण-डोंबिवली महापालिका

First Published on November 6, 2019 1:56 am

Web Title: water fountains wasteland again akp 94
Just Now!
X