पाणीबिलांची आकारणी सदनिकेच्या क्षेत्रफळानुसारच; महापौरांच्या सूचनेला केराची टोपली

ठाणे महापालिकेच्या आगामी निवडणुकीपूर्वी मतदारांचा रोष नको यासाठी सदनिकांच्या क्षेत्रफळानुसार पाणीबिल आकारण्याच्या निर्णयास विरोध करणाऱ्या सत्ताधारी शिवसेनेला महापालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांनी धुडकावून लावले आहे. यासंदर्भातील ठराव सर्वसाधारण सभेत मंजूर झाला असल्याने घराच्या क्षेत्रफळानुसारच बिलांची आकारणी करण्यात येईल, अशी भूमिका आयुक्तांनी घेतली आहे. त्यामुळे अगदी दोन दिवसांपूर्वी आयुक्त व शिवसेना यांच्यातील संबंध चांगले होत असल्याची चर्चा असताना आता नव्या संघर्षांची बीजे यात रोवली गेली आहेत.

ठाणे महापालिका क्षेत्रातील नागरिकांकडून पाणीपट्टीची रक्कम सदनिकांच्या क्षेत्रफळानुसार वसूल करण्याचा निर्णय दीड वर्षांपूर्वी सर्वसाधारण सभेत घेण्यात आला होता. या निर्णयाची महापालिका प्रशासनाने यंदाच्या वर्षांपासून अंमलबजावणी सुरू केली आहे. महापालिकेच्या मालमत्ता कर विभागाकडे शहरातील नागरिकांच्या सदनिकांच्या क्षेत्रफळाची माहिती उपलब्ध आहे. त्याआधारे पाणीपुरवठा विभागाने पाणी बिले तयार केली आणि ती ग्राहकांना पाठविण्यास सुरुवात केली. बिलांची आकारणी करत असताना काही ठिकाणी पाणी बिलात घराचे क्षेत्रफळ चुकीचे नोंदविण्यात आल्याच्या तक्रारी असून यामुळे ही बिलेच चुकीची असल्याचा आरोप दोन महिन्यांपूर्वी सर्वपक्षीय नगरसेवकांनी सर्वसाधरण सभेत केला होता. तसेच या गोंधळाचा नागरिकांना भरुदड नको म्हणून पाणी वसुली जुन्या पद्घतीनेच करण्याची मागणी सर्वपक्षीय नगरसेवकांनी लावून धरली होती. त्यावेळी महापौर संजय मोरे यांनी पाणी वसुलीच्या नव्या पद्घतीला स्थगिती देऊन जुन्या पद्घतीनेच वसुली करण्याचे आदेश दिले होते. असे असतानाच महापालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांनी मात्र पाणीपट्टीची रक्कम सदनिकांच्या क्षेत्रफळानुसारच वसूल करण्याचे आदेश संबंधित विभागाला नुकतेच दिल्याने या मुद्दय़ावरून पुन्हा एकदा महापौर आणि आयुक्तांमधील संघर्ष उघड झाला आहे.

पालिका निवडणुकांच्या तोंडावर क्षेत्रफळानुसार आकारलेल्या बिलांमुळे नगरसेवकांची चिंता वाढली आहे. या मुद्दय़ावरून नगरसेवकांना नागरिकांच्या रोषाला सामोरे जावे लागण्याची शक्यता आहे. यामुळे ही वसुली थांबवावी असा महापौरांसह सत्ताधारी पक्षाच्या नगरसेवकांचा आग्रह आहे. मात्र, महापौरांचा हा आग्रह आयुक्तांनी धुडकावून लावला असून सर्वसाधारण सभेतील आदेशही मानले जाणार नाहीत असे संकेत दिल्याने सत्ताधारी शिवसेनेचे नेते सध्या मौनात गेल्याचे चित्र आहे.

..तर शिस्तभंगाची कारवाई

ठाणे महापालिका क्षेत्रात झोपडपट्टी वगळता इमारतीमधील नागरिकांकडून पाणीपट्टीची वसुली सदनिकांच्या क्षेत्रफळाप्रमाणे ठरविलेल्या दरानुसारच करावी, असे आदेश आयुक्त संजीव जयस्वाल यांनी पाणीपट्टी विभागाच्या आढावा बैठकीत दिले आहेत. तसेच पाणीपट्टी वसुलीमध्ये कुचराई केल्यास संबंधित अधिकाऱ्यांवर शिस्तभंगाची कारवाई करण्यात येईल, असा इशाराही त्यांनी दिला आहे.

थकबाकीदारांच्या मालमत्ता जप्त

नळ संयोजन कोणाच्याही नावाने असो त्याच्या बिलाची रक्कम प्रत्यक्ष पाणी वापरणाऱ्यांकडून वसूल करावी. तसेच बिगर निवासी दुकानदारांनी थकीत पाणीपट्टीची रक्कम भरली नाहीतर त्यांची दुकाने सील करावीत, असे आदेश आयुक्तांनी संबंधित विभागाला दिले आहेत. मोठय़ा थकबाकीदारांची यादी तयार करून ती वर्तमानपत्रातून प्रसिद्ध करण्याच्या सूचना देत त्यामध्ये राजकीय पक्ष कार्यालये, सामाजिक संस्था थकबाकीदार असतील तर त्यांचाही यादीत समावेश करण्यात यावा, असे आदेशही त्यांनी दिले आहेत.