२४ तासांऐवजी १२ तास पाणीपुरवठा बंद; पंधरवडय़ातून एकदा अंमलबजावणी

ठाणे महापालिका क्षेत्राला पाणीपुरवठा करणाऱ्या बारवी धरणातील पाणीसाठा येत्या जूनपर्यंत टिकवून ठेवण्यासाठी स्टेम प्राधिकरण आणि महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाने १४ टक्के पाणीकपात लागू केली आहे. या निर्णयामुळे ठाणे शहरात १५ दिवसांतून एकदा २४ तास पाणीपुरवठा बंद ठेवण्यात येणार आहे. मात्र, यामुळे नागरिकांना पाणीटंचाईला तोंड द्यावे लागू नये, यासाठी महापालिका प्रशासनाने पाणीवितरणाचे नवीन वेळापत्रक तयार केले असून त्यानुसार ठाण्यात प्रत्यक्षात १२ तासच पाणीपुरवठा बंद ठेवण्यात येणार आहे.

ठाणे महापालिका क्षेत्रामध्ये विविध स्रोतांमार्फत दररोज ४८० दशलक्ष लिटर इतका पाणीपुरवठा करण्यात येतो. त्यामध्ये स्टेम प्राधिकरण, एमआयडीसी, मुंबई महापालिका आणि महापालिकेची स्वत:ची पाणीपुरवठा योजना या स्रोतांचा समावेश आहे. ठाणे जिल्’ाातील बारवी धरणावरील उल्हास नदीच्या पात्रातून स्टेम प्राधिकरण आणि एमआयडीसी पाणी उचलते तर भातसा धरणावरील नदी पात्रातून महापालिका स्वत:च्या योजनेसाठी पाणी उचलते. गेल्यावर्षी या दोन्ही धरणांच्या क्षेत्रामध्ये मोठय़ा प्रमाणात पाऊस झाल्याने यंदाच्या नागरिकांना पाणी कपातीचा सामना करावा लागणार नाही, अशी शक्यता व्यक्त होत होती. प्रत्यक्षात मात्र ती फोल ठरली असून बारवी धरणातून होणाऱ्या पाणीपुरवठय़ामध्ये १४ टक्के पाणीकपात लागू करण्यात आली आहे. या धरणातील पाणीसाठा जुन महिन्यापर्यंत पुरविण्यासाठी लघु पाटबंधारे विभागाने हा निर्णय घेतला आहे. या कपातीनंतर ठाणेकरांवर १५ दिवसातून एकदा २४ तास पाणी बंदचे संकट ओढावले आहे. असे असले तरी भातसा धरणातून होणाऱ्या पाणीपुरवठय़ामध्ये अजूनही कोणतीच कपात लागू करण्यात आलेली नाही. त्यामुळे महापालिकेच्या स्वत:च्या योजनेतील पाणी पुरवठा बंद ठेवण्याची वेळ प्रशासनावर अजून ओढवली नाही. त्यामुळे बंदच्या काळात ठाणेकरांची गैरसोय होऊ नये म्हणून महापालिका प्रशासनाने या पाण्याचे नियोजन केले आहे.

स्टेमकडून होणारा ११० दशलक्ष लिटर पाणीपुरवठा पंधरा दिवसातून एकदा २४ तासांसाठी बंद राहीला तरी त्या काळात महापालिकेच्या स्वत:च्या योजनेतील पाणी पुरवठा मात्र सुरळीतपणे सुरू राहणार आहे. त्यामुळे नागरिकांची गैरसोय टाळण्यासाठी स्वत:च्या योजनेतील पाणीपुरवठय़ाचे बंदच्या काळात नवे वेळापत्रक तयार करण्यात आले आहे. या नियोजनामुळे २४ तासांऐवजी केवळ बारा तासच पाणीपुरवठा बंद राहणार आहे, अशी माहिती महापालिकेचे उपनगर अभियंता रवींद्र खडताळे यांनी दिली.

नवीन वेळापत्रक

  • बंदच्या काळातील नियोजनानुसार घोडबंदर रोड, पातलीपाडा, पवारनगर, कोठारी कंपाऊंड, आझादनगर, डोंगरीपाडा, वाघबीळ या परिसराचा पाणीपुरवठा १५ दिवसातून एकदा सकाळी ९ ते रात्री ९ वाजेपर्यंत असा १२ तासांसाठी बंद राहणार आहे.
  • समतानगर, ऋतुपार्क, सिध्देवर, जेल, साकेत, उथळसर, रेतीबंदर, मुंब्रा -कोळीवाडा, शैलेशनगर, संजयनगर व कळव्याचा काही भाग पाणीपुरवठा १५ दिवसातून एकदा रात्री ९ ते गुरुवारी सकाळी ९ वाजेपर्यंत असा १२ तासांसाठी बंद राहणार आहे.