16 January 2019

News Flash

पहिल्या पावसातच लांबपल्ल्याच्या गाडय़ांमध्ये जलाभिषेक

लांबपल्ल्याच्या रेल्वे प्रवासामध्ये प्रवाशांना एरवी अस्वच्छता, दरुगधीचा सामना करावा लागतो.

एक्स्प्रेसमधील गळतीची समाजमाध्यमांवर प्रसारित झालेली छायाचित्रे. 

प्रवाशांकडून समाजमाध्यमांवर तक्रारींचा पाऊस; रेल्वे प्रशासन निरुत्तर

मुंबईतून देशभरात धावणाऱ्या अनेक लांबपल्लय़ाच्या गाडय़ांमध्ये डब्यांना गळती लागल्याचे चित्र असून आरक्षित डब्यातून प्रवास करणाऱ्या नागरिकांना सध्या पावसाच्या धारांचा सामना करत प्रवास करावा लागत असल्याचे समोर आले आहे. याप्रकरणी रेल्वे प्रशासनावर तक्रारींचा पाऊस पडू लागला आहे. केवळ कारवाई केली जाईल, असे सांगून प्रशासन वेळ मारून नेत आहेत.

लांबपल्ल्याच्या रेल्वे प्रवासामध्ये प्रवाशांना एरवी अस्वच्छता, दरुगधीचा सामना करावा लागतो. मात्र यंदा चक्क लांबपल्लय़ाच्या गाडय़ांच्या डब्यांना गळती लागल्याने अनेक प्रवाशांची गैरसोय झाल्याचे दिसून आले. काही डब्यांमध्ये गळतीमुळे आसनांवर सतत पाणी पडत होते, त्यामुळे लांबपल्लय़ाचा संपूर्ण प्रवास उभ्याने करावा लागल्याच्या प्रतिक्रिया प्रवाशांनी दिल्या आहेत. राजधानी एक्स्प्रेस, कन्याकुमारी एक्स्प्रेस, याबरोबरच कोकणात जाणाऱ्या गाडय़ांमध्येही गळतीचे प्रमाण अधिक असल्याचे स्पष्ट झाले आहे. याप्रकरणी रेल्वे प्रशासनाला टोल-फ्री क्रमांकावरून तक्रार करूनही रेल्वेचे कर्मचारी न आल्याने प्रवाशांनी रेल्वेच्या ट्विटरवर तक्रारींचा पाऊस पाडण्यास सुरुवात केली. मात्र त्यानंतरही रेल्वे प्रशासनाने केवळ संदेश पाठवून आपण संबंधित विभागाला माहिती दिली असल्याचे सांगत लवकरात लवकर आपला प्रश्न सोडवू अशी पोकळ आश्वासने देण्यात आली. परंतु संपूर्ण प्रवास गळक्या आसनांवरून करण्याची वेळ प्रवाशांवर आली होती. लांबपल्लय़ाच्या वातानुकूलित गाडय़ांमध्येही हाच प्रकार अनुभवण्यास मिळाला असून तेथील कर्मचारीही हा प्रश्न सोडवण्यास हतबलता व्यक्त करत होते. रेल्वे प्रशासनाकडून आपली समस्या तात्काळ सोडवण्यासाठी तक्रार करा, ट्वीट करा असे सांगितले जाते. परंतु त्याची तक्रार केल्यानंतरही प्रत्यक्षात एकही कर्मचारी तिकडे फिरकला नाही. यासंबंधी रेल्वेच्या जनसंपर्क अधिकाऱ्यांशी संपर्क होऊ  शकला नाही.

मध्य रेल्वेकडून वापरली जाणारी इंजिन आता जलरोधक (वॉटरप्रूफ) असणार आहेत. त्यामुळे इंजिनमध्ये पाणी जाण्याचे प्रमाण कमी होऊन नादुरुस्त इंजिनचा प्रश्न मार्गी लागला आहे. परंतु त्याचवेळी प्रवाशांच्या प्रवासासाठी वापरले जाणारे डबे गळत असून त्यांच्या वॉटर प्रूफिंगचा विचारही प्रशासनाकडून होत नाही.

राजेश घनघाव, कल्याण-कसारा-कर्जत प्रवासी संघटना

दिवसागणिक लांबपल्ल्याचा प्रवास करणाऱ्या प्रवाशांच्या तक्रारींमध्ये वाढ होत असून रेल्वे प्रशासनाने याकडे गांभीर्याने पाहणे अपेक्षित आहे. अशा तक्रारींसाठी रेल्वे प्रशासनाने एक विशेष पथक तयार करण्याची मागणी रेल्वे प्रवासी संघटनांनी केली आहे.

नंदकुमार देशमुख, ठाणे रेल्वे प्रवासी संघटना

First Published on June 13, 2018 1:31 am

Web Title: water leakage in mumbai local