वनस्पतितज्ज्ञ प्रसाद कर्णिक यांची माहिती

भगवान मंडलिक, कल्याण</strong>

ठाणे जिल्ह्यातील अनेक नदीपात्रांमधील जैवविविधता, जलचर कमी होत चालले आहेत. पाण्याचा उपसा वाढल्याने वाहते पाणी कमी झाले आहे. पाण्यातील गाळ, घाणीचे प्रमाण वाढत आहे. अनेक ठिकाणी प्रदूषित सांडपाणी नदीत येऊन मिसळत आहे. या अनेक कारणांमुळे पाण्यातील माशांसह पाणी स्वच्छ ठेवणारे जलचर नष्ट होत चालले आहेत. जलचर कमी होत असल्याने पाण्याला बाधक असे जीव वाढत आहेत. या जीवांमधून जलपर्णीसारख्या वनस्पती बेसुमार वाढत असल्याचे दिसून येत आहे, अशी माहिती ठाण्यातील पर्यावरण दक्षता मंचचे ज्येष्ठ कार्यकर्ते आणि वनस्पतितज्ज्ञ प्रसाद कर्णिक यांनी ‘लोकसत्ता’ला दिली.

यापूर्वी नद्या बारमाही वाहत असत. गाव परिसरातील ओढय़ांना पाणी असायचे. त्यामध्ये जलचर प्राण्यांची संख्या मोठी असायची. पाणी स्वच्छतेबरोबर पाण्याला बाधक ठरणारा कोणताही जीव जलचरांच्या आक्रमकतेपुढे टिकत नसे. शहराचे झपाटय़ाने नागरीकरण होऊ लागले असून बांधकामासाठी नदीतील पाण्याचा उपसा वाढला आहे. वस्त्या वाढल्याने तेथील सांडपाणी, परिसरातील औद्योगिक वसाहतीमधील प्रदूषित पाणी नद्या, ओढय़ांमध्ये मिसळू लागले आहे. या प्रदूषणामुळे पाण्याला पोषक असणारा जीव नष्ट होऊ लागला आहे. सांडपाणी नदीत येऊ लागल्याने गाळाचे प्रमाण वाढले. गाळ, प्रदूषित पाणी वाढल्याने तेथील प्राणवायूचे प्रमाण घटले. नदीतील वाहते पाणी बंद झाल्याने पाण्यातील गाळ, घाणीवर वाढणारा जीव अधिक प्रबळ होऊन तो जोमाने वाढू लागला. अशा जीवांमधील एक असलेली जलपर्णी ही संधिसाधू वनस्पती पाण्यातील या सर्व परिस्थितीचा लाभ उठवून फोफावू लागली, असे कर्णिक यांनी सांगितले.

उपाययोजना काय?

जलपर्णी समूळ नष्ट करण्यासाठी कायमस्वरूपी उपाययोजना पाटबंधारे विभाग, पालिका, नगरपालिकांनी तयार केल्या पाहिजेत. पावसाळ्यात पाणी वाहते असल्याने नवनवीन जलचर वाहून येतात. त्यामुळे जलपर्णी पावसात तग धरत नाहीत. नदीपात्रातील पाणी सतत खेळते कसे राहील, यासाठी नदीपात्राच्या ठिकाणी कारंजी बसवली. बोटिंग सुरू केले तर पाणी हलण्याचे प्रमाण वाढेल आणि जलपर्णी त्या ठिकाणी वाढणार नाही. ठाण्यात पर्यावरण दक्षता मंचचे  काम सुरू असते. एक दबाव गट म्हणून आमचे काम असल्याने मासुंदा तलाव किंवा ठाणे खाडीकिनारी असे प्रकार होत नाहीत.

नदीपात्रांमधील जलपर्णीचे वाढते प्रमाण हे जलचर कमी होत असल्याचे संकेत देत आहे. जलचर का कमी होत आहेत याचाही यानिमित्ताने विचार झाला पाहिजे. नदीपात्रात काही ठिकाणी शहरातील, औद्योगिक भागातील सांडपाणी मिसळते. त्याचा बंदोबस्त करण्याचे प्रयत्न स्थानिक संस्थांनी केले पाहिजेत. 

-प्रसाद कर्णिक, पर्यावरण दक्षता मंच व वनस्पतितज्ज्ञ.